*सृष्टि विधात्यावर विश्वास*
*सृष्टि विधात्यावर विश्वास*
भूतलावर प्रत्येक गोष्टीला पाया आहे आणि त्यावर ती उभी राहते. उदाहरण घ्यायचे झाले तर झाडे ज्यांचा पाया त्यांची मुळे आहेत. ही मुळे जितकी खोलवर रुजतात तितके ते भक्कमपणे उभे राहतात मग परिस्थिती कशीही असुद्यात...कडक उन्हाळा असो वादळ वारे वा अवकाळी पाऊस या परिस्थितींचा सामना ते करतात कारण मुळांवरचा *विश्वास*!
जसे मंदिराचा, वस्तूचा अथवा कोणतेही बांधकाम करायचे असेल तर आपण त्याचा पाय आधी बांधतो, भक्कम करतो मग ते बांधकाम यशस्वीरित्या पार पडते. म्हणजेच काय तर पाया हा खूप महत्वाचा असतो ज्यावर सारेच अवलंबून असते. मानव सृष्टी म्हंटले की भावना, नाते हे आलेचं ! ते एकमेकांच्या परस्परसंबंधीत आहेत. जसे सजीव सृष्टी हवा,पाणी याशिवाय जगू शकत नाही तसे भावनाविरहित नाते अस्तित्वात नाहीचं. *योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य प्रकारची भावना योग्य प्रकारे व्यक्त झाली की जीवनात योग्यता प्राप्त होते आणि माणूस खऱ्या अर्थाने समृद्ध बनतो.* अनेक प्रकारच्या भावना असतात पण त्यातील सर्व श्रेष्ठ भावना *विश्वास* होय.
याच विश्वासाच्या बळावर माणूस खूप काही करू शकतो. स्वतः वरच्या विश्र्वासाला *आत्मविश्वास* संबोधतात अन् हाच आत्मविश्वास प्रगल्भ असेल तर स्वप्न, इच्छा, आकांक्षा पुर्ण होतातच. परंतु, आत्मविश्वासाला जोड हवी ती प्रयत्नांची, जिद्दीची आणि सहवासातील व्यक्तींच्या विश्वासाची ! हाच विश्वास आपल्याला प्रगती पथावर घेऊन जातो.
विश्वास जीवनात बऱ्याच गोष्टी शिकवतो.
अनुभव हा आयुष्याचा गुरु आहे आणि विश्वास आयुष्याची गुरुकिल्ली आहे.* पूर्वी लोक दिलेल्या शब्दाला जगायचे आणि समोरचा व्यक्तीने शब्द दिला म्हणजे तो पूर्ण होईलच हा विश्वास असायचा. आता हा विश्वास कमी होत असल्याचे वास्तवात दिसते. विश्वास कोणावर ठेवावा हे देखील तितकेच महत्त्वाचे ! चांगल्या व्यक्तीवर विश्वास ठेवून प्रगती होते पण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास सर्वच विस्कटते. म्हणूनच, योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवा असा सल्ला मला द्यावासा वाटतो.मी सल्ला द्यायला खूप मोठी कोणी नाही पण माझ्या आयुष्यातील प्रसंग,अनुभव यावरून सांगावेसे वाटले. प्रत्येकाच्या वाट्याला कटू गोड अनुभव येत असतात त्यात कटू अनुभवातून शिकत गोड आठवणी सोबत घेत जगायचं.
माझ्या आयुष्यात विश्वास संबंधित चांगले वाईट दोघे अनुभव आहेत, मी म्हंटले ना चांगले आठवणीत ठेवून जगावे. मग, मी माझा विश्वासावरचा अनुभव सांगते..... जीवनाच्या खूप सुंदर वाटेवर असतांना एक कठीण प्रसंग माझ्यावर ओढवला माझ्या आरोग्य संबंधित जो कदाचित कधी बरा होईल माहीत नाही. खूप वाईट वाटले की आता भरारी घ्यायची वेळ आली आणि अचानक पंखांना ईजा झाली. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची पायाखालची जमीन सरकली. पण, आम्ही सावरलो माझ्या कुटुंबीयांनी मला विश्वास दिला की तू यातून बाहेर पडशील.
म्हणतात ना, *परमेश्वर त्यालाच संकटं देतो ज्याच्यात संकटांना तोंड देवून त्यातून मार्ग काढण्याची ताकद असते.* माझा देवावर विश्वास आहे, मी विचार केला जर देवाने मला हे संकट दिले तर त्याचा माझ्यावर विश्वास आहे की मी ते पेलू शकते असा सकारात्मक विचार करून माझ्यात *आत्मविश्वास* निर्माण झाला.
ते एक मराठी गाणे सर्वांनीच ऐकेलं असेल,
*जीवन गाणे गातच रहावे*
*झाले गेले विसरून जावे*
*पुढे पुढे चालावे...........*
मी माझ्या पुढील वाटचालीस सुरूवात केली.
मला खात्री नाही *विश्वास* आहे की परमेश्वर आलेल्या / येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देईल आणि मार्ग दाखवेल.
शेवटी एकच सांगते, त्या *सृष्टी विधात्यावर विश्वास* ठेवा. आयुष्याचा आनंद घ्या आणि आयुष्यात आनंद द्या देखील. त्याच्या वरचा *विश्वास आत्मबळ* देईल जे सर्व गोष्टींशी लढायला मदत करेल.
