दिशा आणि दशा
दिशा आणि दशा
*दिशति अवकाशं ददाति इति म्हणजे अवकाश देते ती दिशा होय.*
दिशा शब्द उच्चारताच मनात येतात मुख्य चार दिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. लहानपापासूनच शिकवतात सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो आणि हळू हळू दिशांची ओळख व्हायला सुरुवात होते. जसे आपण मोठे होत जातो तसे दिशेचा गहन अर्थ समजत जातो की फक्त भौगोलिक दिशा नाही तर जीवनाची दिशा देखील तितकीच महत्त्वाची आहे.
आयुष्य म्हणजे वळणवळणाचा रस्ता आहे. या वाटेवर अनेक दिशा दिसतात, दिशा दर्शक असतात पण ते समजण्याची आपली क्षमता असली पाहिजे नाहीतर दिशाभूल होते आणि सर्वच चुकते. योग्य दिशेची निवड करत योग्य मार्गावर चालत राहावे किंवा चुकून दिशा चुकल्याचे लक्षात आल्यास योग्य दिशेवर वाटचाल करावी.
प्रत्येक थोर व्यक्तिमत्त्व त्यांचा जीवनपट सांगताना दिशा आणि दिशा दर्शक संगताताच!
त्यांच्या जीवनाला कोणी दिशा दिली ती कशी मिळाली याचा उल्लेख असतो आणि यातून ते कसे यशस्वी झाले हे सांगतात.
एकूणच काय तर *दिशा* मानवी जीवनाचा महत्वाचा भाग आहे. परंतु, हीच दिशा चुकली ना तर मानवाची काय *दशा* होते ते त्यालाच माहीत असते. म्हणून चांगली माणसे आयुष्यात असणे अहोभाग्य म्हणावे!
*सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो* असे कवी मोरोपंत म्हणतात. चांगल्या माणसे असले की चांगली दिशा मिळते आणि आयुष्याचे सुंदर पर्व अनुभवायला मिळते. तसेच पुस्तके वाचा यामुळे जीवनात योग्य दिशेची निवड करण्यास मदत होते.
ही दिशा जर चुकली तर दशा काय होते हे सर्वांनाच ठाऊक आहे बरं....
दिशा आणि दशा यात मराठी व्याकरणानुसार फक्त एक वेलांटीचा फरक पण अर्थ किती वेगळे आहेत बघा!
पूर्व असो वा पश्चिम
दक्षिण असो वा उत्तर !
आनंदी जीवन जगावे
सोडून राग, द्वेष, मत्सर !!
दिशा कोणतीही असली तरी ती योग्य असली की आनंदाने जीवन जगता येते अन्यथा जी दशा होते ती वाईटच म्हणावी लागेल.योग्य दिशेला वाटचाल करतांना अनेक अडथळे निर्माण होतात अशा वेळी मन व मनातील सकारात्मक विचार यावर ठाम रहायचे.
दिशा दर्शक म्हणजे कुटुंब आणि आपले हितचिंतक आपल्या सोबत आहेत म्हणजे आपली दिशा योग्य आहे हे नक्की !
