नासा येवतीकर

Others

2.5  

नासा येवतीकर

Others

सरपंच

सरपंच

4 mins
1.8K


खारपूर गाव नदीच्या काठावर वसलेले जेमतेम पंधराशे लोकवस्तीचं छोटेसे गाव. त्या गावात सर्वच जाती धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने नांदत होते. कुठल्याही प्रकारचा भांडण तंटा, वाद विवाद नव्हते. हिंदू असो वा मुस्लिम असो किंवा अन्य कोणी प्रत्येकाचे सण उत्सव आनंदात साजरे होत असे. त्याला कारण ही तसेच होते, त्या गावचा सरपंच म्हणजे नामदेव. नामदेव हा त्या गावातील सर्वांचा आवडता व्यक्ती, त्याला या जगात कोणीच नव्हते. लहान असतांना म्हणजे नामदेव पाच वर्षांचा असताना त्याचे वडील कॅन्सरने गेले आणि आणि नामदेव दहाव्या वर्गात शिकतांना त्याची आई त्याला सोडून गेली. तसा तो अनाथ झाला. पण गावातील लोकांनी त्याला कधीच अनाथ असल्याची जाणीव करून दिली नाही. म्हणून नामदेव आज त्या गावाचा एक आदर्श सरपंच होऊ शकला. तो सरपंच कसा झाला ? खरंच नामदेव नशीबवान माणूस होता, लहानपणापासून त्याला गावाचा सरपंच व्हावे असे त्याला वाटत राही. त्याच्या पूर्वीचे जे सरपंच होते रामजी पाटील, एक रुबाबदार व्यक्तिमत्व, पिळदार मिश्या, पांढरा शुभ्र पोशाख, केस पांढरे झाले असतील तरी रंग लावून काळे केलेले, पायात कोल्हापुरी चप्पल, आवाजात देखील भारदस्तपणा, त्यांना पाहून नामदेव ला नेहमी वाटत असे की, आपण सरपंच व्हावं. 

शंकरराव आणि नर्मदा हे दोघे ही संत नामदेवांचे अस्सीम भक्त होते. पण लग्न झाल्यावर त्यांना पाच वर्षे कोणतेच मूल झाले नाही. म्हणून ते नामदेवांची आराधना केली. त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव ठेवले नामदेव. शंकररावाला खूप आनंद झाला. त्याने सर्व गावाला बुंदी च्या लाडूचे जेवण दिले. शंकररावाला तंबाखू खाण्याची खूप सवय होती. रात्री झोपताना देखील त्याच्या तोंडात तंबाखू कोंबलेले असायचे. या गोष्टीवर त्या दोघांचे अनेकदा भांडण देखील होत असे मात्र शंकरराव त्या गोष्टीकडे काना डोळे करत. शेवटी व्हायचे तेच झाले. तंबाखूने शंकररावला कॅन्सर झाले आणि नामदेव पाच वर्षांचा असतांना त्याचा मृत्यू झाला. नामदेवांची संपूर्ण जबाबदारी आत्ता नर्मदे वर येऊन पडली. पडेल ते काम करणे, लोकांच्या शेतात मजुरीला जाणे, शेजारच्या घरी कोणतेही काम करणे असे करत ती नामदेवाला शिक्षण देऊ लागली. नामदेव देखील तिच्या आईसारखाच खु कष्टाळू होता. आईसोबत सर्वाना कामात मदत करत होता. गावातल्या प्रत्येक लोकांच्या तोंडात एकच नाव " नाम्या ". 

" नाम्या, इकडे ये, थोडसं दळून आण, दुकानातून सामान घेऊन ये, कपडे इस्त्री करून आण, पेपर घेऊन ये, दूध घेऊन ये, " अशी नाना प्रकारची कामे त्याला लोकं सांगायची आणि नामदेव कुरकुर न करता सर्वांची कामे करायचं. त्यामुळे तो सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला होता. वयोवृद्ध लोकांची कामे करतांना त्याला विशेष आनंद वाटत होता. तर सरपंच रामजी पाटील काही काम सांगितले की अजून जास्त आनंद वाटायचा आणि उड्या मारत ते काम पूर्ण करायचं. एके दिवशी सकाळी सकाळी रामजी पाटलांनी नामदेवाला पेपर आणायला पाठविले. तो पळत गेला आणि पेपर घेऊन आला. रामजी पाटील पेपर वाचू लागले. पेपरमधली ठळक बातमीने रामजी पाटलांचे लक्ष वेधून घेतलं. पुढील वर्षीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार. ही बातमी रामजी पाटलांनी मोठ्या आवाजात वाचली. लगेच नामदेवाकडे पाहून रामजी पाटील नामदेवाला म्हणाले, " नाम्या बातमी एकलंस का ? पुढच्या वर्षी सरपंचाची निवड जनताच करणार आहे. तुला सर सगळं गाव ओळखते, तू होशील काय सरपंच ? सरकार भी लई येड्यावानी वागतंय, आताची पद्धत काही चूक हाय का ? " यावर नामदेव काय बोलणार. तो तसाच निघून गेला. दहावीच्या वर्गात असतांना नामदेवासोबत अजून एक दुर्दैवी घटना घडली. त्यादिवशी नर्मदेच्या अंगात खूप ताप चढला होता, कामाला जाऊ नको असे म्हटले तरी ती बाजीराव पाटलांच्या शेतात कामाला गेली. दुपारपर्यंत काही वाटले नाही मात्र दुपारनंतर तिला कसे तरी होऊ लागले. म्हणून पाटलांनी तिला बैलगाडीत बसवून घरी पाठविले. नामदेव शाळेत गेलेला होता. नर्मदेला दवाखान्याची गरज होती पण कोणी तिला दवाखान्यात नेले नाही. तिला घरी सोडून सालगडी निघून गेला. तिचा ताप चढतच होता. सायंकाळी पाच वाजता नामदेव घरी आला. बघतो तर काय आईचा ताप खूप चढलेला होता. लगेच त्याने दवाखान्यात नेण्यासाठी आजूबाजूच्या मदतीने बैलगाडी मागविली. दवाखान्याकडे तो निघाला. मात्र अर्ध्या रस्त्यातच नर्मदेने आपला जीव सोडली. नामदेवाला पोरके करून ती देवाघरी निघून गेली. नामदेव आता आई-बाबा विना अनाथ आणि पोरका झाला होता. दहावीचं वर्ग पूर्ण होणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र गावातल्या लोकांनी त्याला धीर दिलं. सर्वतोपरी त्याला मदत केली. म्हणून तो जगू शकला. कसेबसे दहावी उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षण बंद करून गावातच तो पडेल ते काम करू लागला. ज्यांच्या घरचे काम केले त्यांच्याच घरी त्या दिवशी त्याला जेवायला मिळू लागले. काही वर्षे उलटली आणि गावात सरपंच पदासाठी निवडणूक जाहीर झाले. यावर्षी थेट लोकांमधून सरपंचाची निवड होणार होती. तसेच सरपंच पदाची जागा नामदेवच्या जातीसाठी सुटला होता. त्या गावात त्याचे एकच घर होते. त्याला प्रतिस्पर्धी कोणीही नव्हता. सर्व गावकऱ्यांनी एक बैठक घेतली आणि बिनविरोध सरपंचाची निवड करण्याचे ठरविले. अर्थात सरपंच म्हणून फक्त एकच नाव ते म्हणजे नामदेव. ग्रामसभेचा ठराव जिल्हा कार्यालयाला पाठविण्यात आले. कालचा नाम्या आज सरपंच नामदेव झाला. त्यासोबत गावाची लॉटरी लागली. निवडणूक बिनविरोध झाली म्हणून सरकार तर्फे एक लाख रुपयांचे बक्षीस देखील मिळाले. गावाला देखील खूप आनंद झाला. नामदेवाने ते लाख रुपये सर्वात पहिल्यांदा शाळेला देऊन त्या गावातल्या शाळेची डागडुजी आणि दुरुस्ती केली. शाळा हेच प्रत्येक गावाचे दैवत व्हायला पाहिजे अशी त्याची धारणा होती. ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीतून नामदेवाने यापूर्वी कोणी केले नाही असे कार्य करायला सुरुवात केली. तो एकटाच होता. त्याच्या मनात कसलाच स्वार्थी विचार नव्हता. त्यामुळे कुठे ही भ्रष्टाचार न करता नामदेवाने गावाचा पूर्ण कायापालट केला. म्हणूनच खारपूर गावच्या सरपंच नामदेवांचे नाव सर्वजण आदराने घेतात. रामजी पाटील एकदा सहज म्हटले होते की, नाम्या तू सरपंच होशील का ? त्या दिवशीपासून त्याच्या मनात ते वाक्य घोळत होतं. मी एके दिवशी या गावचा सरपंच होणार. त्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि बातमी पेपरात देखील आली पण ती बातमी वाचायला रामजी पाटील हयात नव्हते. मनोमानी रामजी पाटलांना नमस्कार करून नामदेव नित्यनेमाच्या कामाला लागला. गावातल्या सर्वांच्या मदतीचे उपकार या माध्यमातून फेडण्याचे त्याने ठरविले होते. 


Rate this content
Log in