Sunita madhukar patil

Others

4.2  

Sunita madhukar patil

Others

रेल्वे आणि ती - भाग - २

रेल्वे आणि ती - भाग - २

4 mins
23.8K


(भाग - 2)


शुभदा आणि सागर पठानकोटला निघाले, दोघांचे ही आईबाबा त्यांना सोडवायला रेल्वे स्टेशन वर गेले होते. आपली मुलगी पहिल्यांदा इतक्या लांब जाणार म्हणून शुभदाची आई थोडी काळजीत होती.रेल्वे आली, शुभदा आणि सागर रेल्वेत चढले. ती रेल्वेला अगदी हळुवारपणे अलगद प्रेमाने स्पर्श करीत होती. तिला पाहून असं वाटत होतं जणु दोन जिवाभावाच्या मैत्रिणी प्रेमाने गळाभेट घेत आहेत. शुभदा अगदी लहान बाळाप्रमाणे प्रवासाचा आनंद घेत होती, नानातऱ्हेची लोकं, वेगवेगळ्या भाषा, वेगळे पेहराव खिडकीतून दिसणारी पळणारी झाडे, मध्येच वाहणारी एखादी नदी, सगळं निसर्गसौंदर्य मनात साठवत होती. सागरसोबतचे हळवे प्रेमळ क्षण, तिच्या सानिध्यात(रेल्वे) घालवलेला एक एक क्षण ती मनाच्या मनाच्या कप्प्यात कैद करून ठेवत होती. दोघांचा प्रवास सुखरूप झाला, रेल्वेतून उतरताना शुभदा तिचे आभार मानायला विसरली नाही. " धन्यवाद तुझे, तु आमचा प्रवास सुखरूप पार पडलास, आपण असेच नेहमी भेटत राहू, माझ्या सागरची नीट काळजी घेत जा हं!!! त्याला सुखरुप माझ्यापर्यंत पोहचवण्याची जवाबदारी तुझी हं!!! तु अशीच आमची नेहमी साथ दे. तुला भेटून मला खुप आनंद झाला.चल निघते मी." म्हणत तिने तिचा निरोप घेतला.


दोघांचा नवीन राजराणीचा संसार सुरू झाला. नवा प्रदेश, नवी लोकं, नवी संस्कृती, नवा अनुभव, तिला खुप काही शिकवून जात होता. हळूहळू ती तिथे रमायला लागली. कधी प्रेम, तर कधी छोटे मोठे रुसवे फुगवे, तर कधी लुटुपूटुची भांडणं या सगळ्यात दिवस सरत होते. थोडक्यात काय तर दोघांचा संसार अगदी सुखात चालु होता. दोघांना तिथे येऊन जवळपास सहा महिने होत आले. दरम्यान शुभदाने गोड बातमी दिली. त्यांच्या घरी नवा पाहूणा येणार होता. ती गरोदर होती. गावी सगळ्यांना फोन करून कळवण्यात आलं. सगळे खुप खुश होते. सगळीकडे आनंदाला उधाण आलं होतं. शुभदाची तब्येत आजकाल थोडी नरमच असायची. सागर तिची योग्य ती काळजी घेतच होता. दोघांनी मिळून येणाऱ्या बाळाची त्याच्या भविष्याची खुप स्वप्न रंगवली. दोघांनी मिळून येणाऱ्या बाळाचं नाव देखील ठरवलं.

शुभदाला आता सातवा महिना होता. बाळंतपणासाठी गावी जाण्याचा निर्णय दोघांनी घेतला. दोघे गावी निघाले, परत रेल्वेचा प्रवास, ती खुप खुश होती. " अगं ऐक ना, आमच्या घरी ना नवीन पाहुणा येणार आहे. तुला ही गोड बातमी मला कधीपासून सांगायची होती, पण आपली भेटच झाली नाही. आता परत येताना सागर एकटेच असणार आहेत बर कां, तु त्यांची नीट काळजी घे." शुभदा मनातल्या मनात तिच्याशी बोलत होती. दोघे सुखरुप घरी पोहचले.


घरी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती, डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाचा घाट घालण्यात आला होता. कार्यक्रम एकदम थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडला. सागरची सुट्टी संपत आली होती. तो दोन दिवसांनी परत जाणार होता. शुभदा खुप हळवी झाली होती. डिलिव्हरीच्या वेळेस तो तिला तिच्यासोबत हवा होता. म्हणून ती त्याला परत-परत डिलिव्हरीच्या वेळी सुट्टी घेऊन येण्यासाठी सांगत होती. "आपल्या जीवनातील अनमोल क्षण, ज्यावेळी आपल्याला आईबाबा म्हणून नवीन ओळख मिळेल, तो क्षण मला तुमच्यासोबत जगायचा आहे. प्लिज तुम्ही त्यावेळी रजा घेऊन नक्की या." ती त्याला विनवत होती. 


नऊ महिन्यानंतर शुभदाने छान गोंडस, गुटगुटीत मुलाला जन्म दिला, पण सागर ला सुट्टी मिळाली नसल्यामुळे तो येऊ शकला नव्हता. त्यामुळे शुभदा खूप नाराज होती. पण काय करणार ना त्याचाही नाईलाज होता. शुभदाची डिलिव्हरी तिच्या आईकडे झाल्यामुळे ती माहेरीच होती. अशा अवस्थेतही ती रेल्वेचा आवाज ऐकला की गच्चीवर जात असे, आणि एकटक तिच्याकडे पहात उभा राही. " माझ्या सागरला लवकर घेऊन ये गं." म्हणत ती रडायची. रेल्वेला पाहिलं की तिला सागरची आठवण होई. सागरला अजून दोन तीन महिने तरी सुट्टी मिळणार नव्हती. 

सव्वा महिन्यानंतर बाळाचं बारसं केलं, बाळाचं नाव अद्वैत ठेवण्यात आलं. दोन महिन्यानंतर शुभदा बाळाला घेऊन सासरी परतली. सगळेजण सागरच्या येण्याची वाट पहात होते. सागरला यायला अजून एक महिना बाकी होता. शुभदा सागरच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. हा एक महिना तिला संपता संपत नव्हता. 

सागरची सुट्टी मंजूर झाली होती, तो घरी यायला निघाला होता. दोन दिवसात तो घरी पोहचणार होता. दुपारी सगळे जेवण करून वामकुक्षी घेण्याच्या तयारीत असतात, इतक्यात सागरच्या आर्मी युनिटच्या हेड क्वार्टर मधुन त्याच्या बाबानां फोन येतो." सागरला मुंबईच्या मिलिटरी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे, तरी तुम्ही ताबडतोब तिथे पोहचा."


" अहो!!!पण काय झालं, तो तर गावी येण्यासाठी निघाला होता ना. तो तर रेल्वेनी प्रवास करत होता आणि अचानक तो मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये कसा काय पोहचला? काय झालं त्याला, कसा आहे तो, प्लिज सांगा." त्यांचा हात थरथरत होता. तोंडातून शब्द कसेबसे बाहेर पडत होते. " नक्की काय झालं ते आम्हालाही माहीत नाही, मुंबईच्या आसपास तो रेल्वेत प्रवास करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळला. रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याला त्वरित उपचारासाठी जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्याला प्रथमोपचार देऊन मिलिटरी हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. तो आता व्यवस्थित आहे काही काळजी करू नका. तरी तुम्ही ताबडतोब तिथे पोहचा." पलीकडून ही माहिती देण्यात आली. हे सगळं ऐकून त्यांचं आवसानच गळालं, ते मटकन खाली बसले. सगळं छान चाललं असताना हे अचानक काय घडलं, त्यांच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली आणि डोळ्यात अश्रू. सगळं बळ एकवटून ते उठले आणि मुंबईला जायच्या तयारीला लागले.


Rate this content
Log in