kanchan chabukswar

Children Stories

4.0  

kanchan chabukswar

Children Stories

रामू हत्ती.......... सौ कांचन चाबुकस्वार.

रामू हत्ती.......... सौ कांचन चाबुकस्वार.

4 mins
358


सकाळी नेहमीप्रमाणे बाबा आराम खुर्ची वरती बसून पेपर वाचत होते, गणू आणि सोनू दोघेही खालीच खेळत होते, पेपर वाचताना एक डोळा त्यांच्याकडे ठेवून बाबा मस्त बसले होते. उंच इमारतीच्या दहाव्या मजल्यावर बाबांचा फ्लॅट होता, अभिजीत चा फ्लॅट त्यांच्या बाजूलाच होता, ठरवलं होतं तसं, मुलाला आणि सुनेला पण मोकळीक आणि बाबांना आणि माईला पण. मात्र नातवंड माई आणि बाबा सांभाळत.  मागच्या फ्लाय ओव्हर ब्रीज वरुन मंजुळ घंटेचा आवाज आला, घंटा लयीत पडत होती, फायर ब्रिगेडचि तर वाटत नव्हती, बर बुड्डी का बाल तसेच बर्फ वाला, कांदे बटाटे वाला, हे काय घंटा वाजवत नसत. कोण बरं घंटा वाजवतोय.

   गणू आणि सोनू दोघही खिडकीकडे धावले, " बाबा बाप्पा, बाबा बाप्पा!" सोनू म्हणाली, छोटा होता गणू, अजून बोलत नव्हता, सोनू चार वर्षाची,

   अरेच्या! खरंच की! एका मोठ्या हत्तीची स्वारी डुलत डुलत फायर ब्रिगेड वरून चालली होती. पाठीवर लाल रंगाची रंगीत चमचमणारी झुल . जाड जड सोंडे वरती, खडूने चितारलेली नक्षी, पायावरती पण पांढऱ्या खडूने काढलेले पैंजण, महाकाय हत्तीची स्वारी मस्त डुलत डुलत ब्रिज वरून खाली येत होती. लईत वाजणारी घंटा आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेत होती, महाकाय हत्तीला मान देत वाहने देखील धीमे-धीमे चालत होती.

शनिवारचा दिवस सुट्टीच, त्यामुळे बऱ्याच वाहनांमध्ये बालगोपाळ मंडळी होती. थांबवून लहानग्यांना हत्ती दाखवण्यात येत होता. बाप मंडळी हत्ती च्या वर बसलेल्या माहुताला दिल खोलून पैसे देत होती. ब्रिज उतरून हत्ती रिक्षा स्टँड वर आला, रिक्षावाल्यांनी पटापट पैसे काढून शेजारी बसलेल्या केळीवाली कडून सगळी टोपलीच विकत घेतली, येणारे हत्तीच्या समोर टोपली ठेवून दिली. हत्तीच्या पाठीवरती रामू हत्ती असं त्याचं नाव पण लिहिलं होतं, केळी खाण्यासाठी हत्ती क्षणभर थांबला, त्याला शिकवल्या प्रमाणे एक घड उचलून त्याने आधी माहुताला दिला, माहूतने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवल्यावर मगच हत्तीने सगळी टोपली आपल्या तोंडात रिकामी केली.

   हे बघून बघणार्‍यांना पण उत्साह आला, हळूहळू हत्ती बाजाराच्या दिशेने निघाला, साडेदहाची वेळ होती, बाबा पण कडेवर गणूला घेऊन, हाताशी सोनु पकडून हत्तीच्या मागे मागे जात होते. कडे वरचा गणू टाळ्या पिटत होता. सोनुने जवळून हत्ती बघितला आणि तोंडात बोट घातलं. केवढे मोठे पाय, केवढं पोट, बारीक शेपटी, मोठे मोठे सुपासारखे कान, इकडे तिकडे वळणारी सुंड. सगळे बघून भीतीयुक्त आश्‍चर्य वाटत होतं, बाबा जवळ असल्यामुळे सोनू धीटपणे चालत होती.


  रामू हत्ती आता बाजारात आला, बाजारातली गर्दी आपोआपच पांगली, पालकाची टोपली घेऊन बसलेल्या म्हातारीने आपली टोपली रामू हत्ती पुढे ठेवली. पपई वाल्याने पपईचा घास भरवला, अननस वाल्याने खटाखट अननस सोलून हत्तीच्या तोंडात भरवला. हरी ओम चा मालक" गणपती बाप्पा आला! गणपती बाप्पा आला!" असे म्हणत धावत बाहेर आला. त्यांनी हत्ती च्या समोर ताजे पेढे ठेवून दिले. माहुताला विचारले "अजून काही पाहिजे का?" माहुताला ब्रेडचे सँडविच, वडापाव असं सामान पिशवीत घालून पोचतं केलं.

बाजारात हरिओम च्या मालकाची एकच चर्चा. सगळे दुकानदार बडबडू लागले, "हत्तीला खाऊ घातलं की बरकत येते म्हणे."

" मलापण पेढा" असे म्हणत सोनू बाबांच्या हाताला लटकली.

बाबाने दुकानातून दोघाही नातवंडांना काय पाहिजे ते खाऊ घातले.

दोन्ही लहान मुले हत्तीला काही दृष्टीआड होऊ देत नव्हती.

गणू सारखा हत्ती कडे बोट करून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, माहुताने बघितले होते की म्हातारा आपल्या नातवंडांना घेऊन मागे मागे येतो आहे.

त्याने हत्ती ला थांबवले, बाबांना विचारले," बच्चे को बिठाना है क्या?"

 समजल्याचा अविर्भाव करून गणू टाळ्या पिटू लागला. बाबांनी विचार केला," हो "

माहुताने रामू हत्तीच्या कानात काहीतरी सांगितले. हत्तीने आपली सोंड अलगत गणूच्या कमरे-कमरेभोवती घालून त्याला अलगद उचलून घेतले आणि त्याला अलगदपणे उचलून माहूतI जवळ दिले. गणू आनंदाने टाळ्या पिटू लागला, त्याला मुळीच भीती वाटली नाही, हत्तीच्या सोंडेचा गरम गरम श्वास त्याला फारच मजेशीर वाटला. थोडावेळ त्याला हत्तीवर बसवून माहुताने अलगदपणे त्याला परत बाबांजवळ सोडले.

आता हत्ती वर बसायची पाळी सोनूची, रामू हत्ती ने तिला लडीवाळपणे कमरेमध्ये धरून अलगद उचलून आपल्या डोक्यावर ठेवले.

सोंडेतून येणाऱ्या गरम श्वास तिच्या कमरेला लागल्यावर ती तिला मजेशीर गुदगुल्या झाल्या. अतिशय आनंदाने सोनू पण हत्तीवर स्वार झाली. बाजाराच्या टोकापर्यंत सोनू नि हत्तीवर रपेट केली. बाबांनी खिशात हात घालून शंभर रुपये माहुताला दिले. मुलांची मज्जा आणि हत्तीची पण कमाई झाली. आता हत्ती ची स्वारी हळूहळू बाजारपेठेतून बाहेर पडू लागली. बहुतेक रामू हत्तीचं पोट थोड्याफार प्रमाणात भरलं होतं.  बाजाराच्या शेवटाला ऊसाच्या रसाचे गुऱ्हाळ चालूच होतं. तिथला मालक पण धावत बाहेर आला, गड्याला सांगून, हत्तीच्या समोर, त्याने गाडाभर उसाचे कांडके टाकले. ऊस, गूळ, तर हत्ती ला फारच आवडत.

हत्ती येता पुढे पुढे चालू लागला, लोकं परत परत विचारू लागले," फिर कब आओगे"?

माहुताने हसून उत्तर दिले," अगले आदित्य वार को" बाजारातल्या मंडळींनी ठरवून ठेवले की पुढच्या रविवारी हत्ती आला की त्याला काय काय खाऊ घालायचे सगळ्यांनी आपल्या मुलांना देखील बाजारात आणायचे ठरवले.अचानक बाबांच्या लक्षात आले की त्यांनी मोबाईल वगैरे घरी ठेवला आहे, अभिजीत विनया काळजी करत असतील असं वाटून त्यांनी घाईघाईने रिक्षाला हात केला. रिक्षात बसायच्या आधी, दोघाही नातवंडांना उसाचा रस पाजला. आज बच्चेकंपनी एकदम खुश होती.. ना त्यांना

आजीची आठवण येत होती ना आई-वडिलांची.

पुढच्या रविवारचा बेत पक्का करूनच सोनू, गणू आणि आबा रिक्षा मध्ये बसले.


Rate this content
Log in