फेरफटका
फेरफटका


सध्या मार्चच्या पहिल्या आठवड्या पासून भारतात... महाराष्ट्रात...पुणे..मुंबईत करोनाचा शिरकाव झाला.. गंभिरता लक्षात घेऊन प्रशासनाने कंबर कसली .. पंतप्रधानांनी जनता कर्फ्यु २२ मार्चला जाहिर केला.. सगळ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.
२५ मार्च पासुन २१ दिवस, ... वाढतच गेला १३० उलटलेपण.. ह्या लॉकडाऊनच्या दिवसात प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आले असतीलच... आठवणींना लॉकडाऊनचे कोणतेही बंधन नव्हते... किंबहुना त्या चांगल्या आठवणींनी जगण्यासाठी नवी उमेद दिली असेल... स्वतःला नव्याने ओळखायला सुरवात झाली असेल...
किती लहानपणीच तुम्हाला आठवत असा नकळत पडलेला प्रश्न बातम्या पाहता पाहता चक्क लहान म्हणजे ४-५ वर्षाचे असतांना अस केल तस केल करत आठवत गेल!! स्वतःलाच एक छान शाब्बासकी!!
बातम्या पाहत असतांना इतर काम पण करत असतो. तसेच मी काही जुनी फोटो पाहत होते, जुने म्हणजे ६५-७० वर्षापुर्वीचे!! आणि त्याच वेळी बातम्यात टोपेनगर, अमरावती नाव कानावर पडले व वर टिव्हीकडे बघतांच १-२ सेकंदातच तो परीसर दाखवला...व लागलीच दुसरी बातमी, खाली ब्रेकिंग न्युज जी सरकती पट्टी... असो आजकाल टिव्हि बघणे त्रास दायक वाटत!
आठवणींचा खजिना कधी उघडला गेला हे कळले पण नाही...
हातातला फोटो छोटासा २ इंच बाय २ इंच असेल. त्यात आजोबा व अजुन ३ मुली व एक बाई.. कारण ती साडी नेसली होती म्हणुन बाई एका खुर्चीवर बसली आहे... व आजोबा मागे पडदा पकडुन आहे... नंतर कळले हो फोटो काढतांचा फोटो आहे... फोटोत फक्त खुर्चीवर बसलेल्या बाईचाच फोटो घ्यायचा होता... पण फोटो तीथे असलेल्या आजुबाजुवाल्यांचापण आला!!... आईशी बोलतांना आजोबांचा फोटो बघ म्हटले तेंव्हा तीने फोटोत कोण कोण आहे ते सांगीतले. फोटोत चक्क आई पण होती ७-८ वर्षाची असतानांचा... मी बर्याच वेळा तो फोटो बघीतला होता पण मला माहितच नव्हते की आई आहे त्यात ते... परत स्वतःलाच शाबासकी.. फोटो जपुन ठेवल्या बद्दल..
टोपे नगर वरून आठवण आली ती आजोबा अमरावतीला आमच्याकडे आले की रोज सकाळी फिरायला जायचे.. माझापण हट्ट असायचा त्यांच्या बरोबर फिरायचा. आजोबा नाही म्हणायचे कारण मी सोबत असेल तर त्यांना हळु चालावे लागे तर कधी शी सू लागली की लवकर घरी चला म्हणत भोकाड पसरायचे..
पण माझा हट्ट चालुच रहायचा, बरेच वेळा त्यांच्या आधी उठुन तयार रहायची फिरायला जाण्यासाठी.
आजोबा उंच, पांढरा शुभ्र धोतर झब्बा घातलेले, हातात काठी... ह्या काठीचा उपयोग उंचावरची फुले तोडतांना होत असे.
टोपेनगरच्या तीन मजली इमारतीच्या तीसर्या मजल्या वरून खाली पटापट उतरायच व चालायला लागायच कधी आजोबांचा हात धरून तर कधी त्यांच्या मागे मागे, तर कधी पुढे...
आजोबांच्या लक्षात आल मी काही आपला हट्ट सोडणार नाही... मग आमचा मुड सांभाळत सांभाळत फिरायचा रस्ता ठरायचा... कधी छोटीशी चक्कर टोपेनगर मध्येच... छान स्वतंत्र बैठी घरे होती... सरकारी वसाहत होती... एक मोठा हॉल होता.. ज्यात सांस्कृतीक कार्यक्रम होत असे गणपती व इतर वेळी. सकाळी आता सारखे योगा क्लास होत. तेव्हा योगासने म्हणत... बालमंदिर भरत असे... व त्याच्या समोर मोठ मैदान... फिरतांना रस्त्यावरून फिरतांना फुल वेचायचा छंद लागला म्हटले तरी चालेल... आजोबांशी गप्पाही चालायच्या...
टोपेनगरच्या समोर अजुन एक डांबरी नविन रस्ता होता त्या वरून एका बाजुला मांगिलाल प्लॉट वसाहत होती व दुसर्या बाजुला प्राध्यापक कॉलनी ... मालटेकडी... तो डांबरी रस्ता शास्री नगरचा होता..
मांगिलाल प्लॉट कडे जातांना पहिले एक म्हैशीचा गोठा होता... म्हैशीने आवाज काढला की आजोबांचा हात पकडायचा व सोबतच त्यांच्या धोतराचा भाग जो माझ्या छोट्या हातात येईल तसा पकडायचा... शेणाचा वास यायचा मग तोंड वाकड असायच.
मग मांगिलाल प्लॉट कॉलनीतुन पुढे लायन्स क्लबची एक बाग होती, तीथे संध्याकाळी खेळायला जायचो!...
कॅम्प रोडने पोलिस वसाहत मग कधी टोपेनगरच्या दुसर्या बाजुने परत तीन मजली मधे... तर कधी पोलीस वसाहती वरन पुढे मालटेकडीच्या पायथ्याच्या रस्त्याने शास्रीनगर... तीन मजली मधे घरी...
ह्या प्रत्येक रस्त्यावर काही ना काही लॅडमार्क होतेच... मांगिलाल प्लॉट वरच्या रस्त्यावर छोटस मंदिर उंबराच्या झाडाखाली... ती उंबराचे फळ उचलुन खालेले आठवत ... त्यात बराच मुंग्या असायच्या... पण चावतील याची भिती न वाटता त्या हाताने फळातुन बाजुला करत तोंडात पटकण टाकणे... मोठा राजवाडा सारख घर, मोठे मोठे कुत्रे होते त्यांच्याकडे... बोंडेच घर होत का ते? असेल..नाव आठवत नाही आता.
मग अमरावती कॅम्प रोडवर बरेच बुचाची झाडे होती त्याची फुल गोळा करायची झाडाखाली पडलेली!
पोलिस वसाहतीत एक हणुमान मंदिर होत... कधी त्याच ही दर्शन घ्यायच.. एक ब्रिटिश कालीन एकाकी बंगला होता त्याला भुत बंगला म्हणायचो... एक छोट दुकान होत श्रीखंडाच्या गोळ्या, लिमलेट गोळ्या, छोटे छोटे बिस्किट.. कधी आजोबा विकत घेऊन देत असे.. विकत घेतांना घरात असणार्या सगळ्यांचा विचार करून खाऊ घेतला जायचा!...
मालटेकडीचा पायथा... नाला ओलांडतांना पाय घसरून, घराब पाण्यात पाय ओला व्हायचा तर कधी चिखल लागायचा... घरी गेल्यावर आईला सांगायचे मायचे पाय निट धुऊन देशिल आंघोळ करतांना...
आजोबां बरोबर सकाळी फिरून घरी येतांना हातात बरीच वेगवेगळी फुले - तेरडा, कण्हेर, पीवळी बिट्यांची घंटीच्या आकाराची फुले, जाई-जूई-चमेली, वैगरे फ्राकचा ओचा करून त्यात भरलेली फुले.. एका हातात खाऊची पुडी.. व प्रसन्न आनंदीमुख असा अवतार असायचा...
मोठे झाल्या नंतर सकाळी फिरायला जाणे बंद झाले ते बंदच...
पण आता लॉकडाऊन मधे अंगणातल्याच झाडे, फुले, आकाशातले रंग, ढग , कमळाच फुल कसे उगत... जास्वद कसे उगत व किती दिवस झाडावर राहत... पावसात उगवणारी फुले, पक्षी, कोकिळेचा आवाज, कावळा, चिमणी, कबुतर, आकाशात फिरणिरी घार, बगळे.. बगळ्यांची माळ, काळे बगळ्यांसारखे दिसणारे पक्षी, बुलबूल, यांची छोटी पिल्लं, दयाळ पक्षी.. रंगीबे रंगी फुलपाखरे... आकाशात दिसणारे ग्रहतारे त्यांच्या युतीच्या वेळीस आकाशात साध्या डोळ्यांनी पाहाता येणारे दृश्य...मोबाईल कॅमेरात बंद करणे, मित्रमैत्रिणींना आपला अनुभव फोटो शेअर करणे... अश्या छोट्या छोट्या गोटीतुन स्वतःला आनंदी ठेवण्यात खूप मदत होत आहे... आहे त्या परीस्थितीत कसे घरीच राहता येत... प्रत्येकवेळी घराच्या बाहेर पडलच पाहिजे असे नाही!! बघता बघता १३० दिवस झाले... करोना लॉकडाऊन.. अन् लॉक ३.०!!!
नविन शब्द भंडार तयार झाला!!!