नावाची लक्ष्मी
नावाची लक्ष्मी
"सर" ....असा दुरवरून आवाज ऐकू आला. तसे आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं तर कडेवर एक लहान मूल घेवून येणारी बाई दृष्टीस पडली. जेमतेम वीस-बावीस वर्षाची ती पोरगी; परंतु वयाने वयस्कर वाटावी अशी दिसत होती. जवळजवळ पळतच ती माझयाजवळ आली. मी काही बोलण्याच्या अगोदरच ती म्हणाली, "सर मला ओळखलं नाही का?" मी नकारार्थी मान हलवून नाही एवढंच उत्तर दिलं. ओळखीचा चेहरा वाटत होता, परंतु नाव व गाव लक्षात येत नव्हते. शेवटी तिनेच सांगितले "सर, मी वर्गात उशीरा येणारी आणि अर्धा तास आधीच जाणारी... " तिचे शब्द अर्धवट तोडत मला तिचे नाव आठवले आणि म्हटलो "तुझे नाव लक्ष्मी ना!" जवळजवळ दहा-बारा वर्षानंतर तिची भेट झाली. तिची ती अवस्था पाहून तिला अनेक प्रश्न विचारून तिची माहिती काढली. मनोमन खूप दु:ख वाटलं. तेवढ्यात माझी बस आल्यामुळे मी तिचा निरोप घेतला आणि शाळेला जाणा-या बसमध्ये एका खिडकीपाशी येऊन बसलो.
बस वेगात धावत होती. अनेक लहान-मोठी झाडे त्याच वेगात मागे जात होती. माझे मन सुद्धा दहा-बारा वर्षापूर्वीच्या गावातील शाळेला जाऊन पोहोचले. गावात पहिली ते सातवी वर्गापर्यंतची सरकारी शाळा होती. गावात सर्वच जातीतील लोक समसमान अशी होती. परंतु हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक सधन होते. तर बाकी सर्व मजुरी करून उदरनिर्वाह करणारी कुटूंबे होती. शाळेतील मुलांचा गणवेश, त्यांचे दप्तर, राहणीमान पाहून मनाला थोडा उत्साह आला. याठिकाणी काही तरी निर्माण करायचे आहे. या निश्चयाने सातव्या वर्गाची हजेरीपट घेवून वर्गात प्रवेश केलो. वर्गात एकूण वीस मुले, त्यापैकी आठ मुली होत्या. उपस्थिती ब-यापैकी. मुलांची हजेरी घ्यायला सुरूवात केली. एकानंतर एक हजरी देत होते. लक्ष्मी, असे नाव उच्चारताच तिची मैत्रीण म्हणाली, सर ती येईल एवढ्यात. थोड्याच वेळानंतर ती आली. मी तिच्यावर रागावणार होतो, परंतु तिची अवस्था पाहून मला तिच्यावर कीव आली आणि वर्गात बसण्याची परवानगी दिलो.
गरगरीत गोल चेहरा, केस विस्कटलेले, अंगावर फाटलेले कपडे आणि घाईघाईत ती शाळेला आली आहे, असे वाटत होते. यापुढे उशिरा यायचे नाही अशी तंबी देऊन तिला वर्गात बसवावे. वर्गातील मुलांची चाचणी घेऊन कोण कसा आहे? हे पाहण्यासाठी काही प्रश्न विचारले तेव्हा सर्वच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी तिचे हात वर होते. लक्ष्मी चुणचुणीत, चाणाक्ष व हुशार आहे, हे माझ्या बुद्धीने तेव्हाच हेरले. दुपार टळली होती, शाळा सुटायला जेमतेम अर्धा तास बाकी असतांना. ती दबक्या पावलांनी माझ्या जवळ आली आणि घरी जाण्याची परवानगी मागू लागली. हे असे तिचे रोजचेच होते, परंतु या गोष्टीचा छडा लावायचा या हेतूने एके दिवशी शाळेत लवकर आलो आणि सरळ लक्ष्मीचे घर गाठले.
मारूतीच्या पारासमोर असलेलं झोपडं म्हणजे लक्ष्मीचे घर. लक्ष्मी, अशी हाक दिल्याबरोबर ती झोपडीच्या बाहेर आली. हात पिठाने माखलेले. ती भाकरी करीत होती. बाजूलाच तिचे दोन भावंडे खेळत होती. घरात दुसरे कोणी नव्हते. मी म्हटलं, लक्ष्मी, तुझे आई-बाबा कुठे आहेत? यावर ती मना
त दु:ख आवरून म्हणाली. गावच्या पाटलांच्या मळ्यात आई-बाबा मजुरी करतात. सकाळी लवकर मळ्यात जातात. शाळेची घंटा वाजल्यावर आई मळ्यातून येते आणि बाबांसाठी भाकरी घेऊन जाते, सोबत यांना पण नेते. तेव्हा मला कळाले की, लक्ष्मी ही शाळेत उशिरा का येते. घरातील झाडलोट, धुणीभांडी, स्वयंपाक हे सर्व तिलाच करावी लागत असे. घरच्या गरीब परिस्थितीमुळे तिच्या शिक्षणात अनेक संकटे येत होती. परंतु तिचा शिकण्याचा निर्धार पक्का होता. तिची खरीखुरी परिस्थिती सर्वांना कळाल्यावर वर्गातील सर्व मुले आणि शाळेतील शिक्षकांनी तिला सर्वतोपरी मदत करण्याचा ठाम निश्चय केला आणि शालेय गणवेश, काही वह्या, कंपासपेटी, दप्तर, पेना तिला मदत म्हणून दिल्या. खरोखरच ती खूप हुशार आणि एकपाठी होती. प्रथम सत्र परीक्षेत तिने प्रथम क्रमांक मिळविला होता.
दिवाळीच्या सुट्टया संपल्या आणि शाळेला सुरूवात झाली. सुट्ट्यानंतर शाळेचा पहिला दिवस. वर्गात जेमतेम मुले उपस्थित होती. वर्गात प्रवेश केला आणि हजेरी घ्यायला सुरूवात केली. एकानंतर एक मुले हजेरी देत होती. लक्ष्मी, नाव उच्चारताच मीच म्हटलं, येईल ती थोड्या वेळात. यावर तिची मैत्रीण म्हणाली, "ती येणार नाही." तिच्या घरचे सर्व जण गेलेत, दुसरीकडे राहायला. मी म्हणालो, म्हणजे काय? मुलांना काही माहित नव्हतं. म्हणून तिच्या व कुटुंबाविषयीची विचारणा गावातल्या मोठ्या लोकांशी केली असता गावच्या पाटलानं कामावरून कमी केल्यामुळे ते कामाच्या शोधात गेली आहेत; दुस-या गावाला अशी माहिती मिळाली. तसा मी हताश झालो. मनात वाटलं की, प्रजासत्ताक दिनी सा-या गावक-यासमक्ष तिचा सत्कार करावा आणि तिचं भविष्य घडवावं. परंतु नियतीला काही दुसरेच मान्य होते, सत्र संपले. तिच्या नावापुढे सतत अनुपस्थित असा शेरा मारून त्या वर्षांच्या सारी पानं बांधल्या गेली.
दहा-बारा वर्षानंतर आज तिची भेट झाली. त्यात तिच्या सोबत झालेल्या बातचितीमुळे मन विषण्ण झालं. ती सांगत होती, "त्या दिवशी पाटलांकडे बाबा दिवाळी खरेदीसाठी पैसा मागायला गेला होता. परंतु पाटलांनी पैसे देण्याऐवजी बाबांवर चोरीचा आळ ठेवून पंचायत बसविली आणि आमचं घर क्षणभरसुद्धा येथे थांबू नये असा पंचांनी निर्णय दिला. त्याच रात्री आम्ही तेथून निघालोत आणि मिळेल तिथं काम करून राहू लागलो. या रस्त्यावरच माझी सोयरिक झाली, लग्न झालं आणि मूलंही जन्मलं. सर, मला खूप शिकायचं होत पण..." म्हणत ती डोळ्यातून पाणी आणू लागली. तिच्यासोबत माझेही डोळे पाणावले. ती फक्त नावाची लक्ष्मी होती. प्रत्यक्षात तिच्याकडे जर लक्ष्मी असती तर ती आज एका चांगल्या पदावर दिसली असती. आज देशात अश्या कित्येक लक्ष्मी गरीबी व दारिद्रयामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडतात. त्यांच्याजवळ असलेली बुद्धीमत्ता त्यांनाही वापरात येत नाही ना देशाच्या काही कामी येत नाही.
याच तंद्रीत माझ्या शाळेचे गाव आले. बसच्या घंटीने मी भानावर आलो. तसाच खाली उतरलो. शाळेत गेलो आणि चिमुरड्या मुलांसोबत खेळण्यात रंगून गेलो.