Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Sunita madhukar patil

Others


4.0  

Sunita madhukar patil

Others


मनाची घालमेल

मनाची घालमेल

3 mins 94 3 mins 94

आदल्या दिवशीच कांद्या पोह्याचा कार्यक्रम झाला होता आणि ठरल्याप्रमाणे कावेरी आज प्रतिकला एकटीच भेटणार होती. ती तिच्याच तंद्रीत होती, कुठल्यातरी विचारात मग्न होती. आईने मारलेल्या हाका देखील तिच्या कानात घुसत नव्हत्या.

काल तिला एका गोष्टीची भयंकर चीड आली होती, ती म्हणजे कोणाहीसमोर असं नटून-थटून बसायचं. जशी काही एखादी बाहुली सजवुन प्रदर्शनात मांडलेली आहे. मुलाच्या, त्याच्या नातेवाईकांच्या त्याच्या आई-बाबांच्या प्रश्नांचे मारे झेलत मान खाली घालून निमूटपणे उत्तर द्यायची आणि आपण काय? आपले आईने सांगितले तितकेच मोजके बोलुन नेहमीचेच ठरलेले प्रश्‍न मुलाला विचारायाचे आणि गप्प बसायचं आणि नंतर घराच्या एका खोली मध्ये पाच मिनिटे एकत्र बसून बोलण्याची संधी इतकंच!!!.

काल सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. कावेरी तिच्या आईने सांगितल अगदी तसचं वागली आणि बोलली. आईला प्रतिक खूपच आवडलेला दिसत होता. हे स्थळ शोधण्यासाठी तिने खूप धावपळ केली होती.

कांद्यापोह्याच्या कार्यक्रमानंतर ती कावेरीला मुलगा आवडला की नाही, तिच्या मनात प्रतीकबद्दल काय आहे हे जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण कावेरी काहीच थांगपता लागू देत नव्हती.

प्रतीक हा तिला पहायला आलेला पहिलाच मुलगा होता. त्यामुळे ती थोडी अस्वस्थ होती तिच्या मनाची घालमेल वाढली होती. आपल्या आई वडिलांचं घर सोडून सासरी जायचं दुसऱ्याच्या घरी जायचं, कायमचं!!! ज्या माणसाला आपण धड मान वर करून नीट बघितलं पण नाही अश्या माणसासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं. त्याला आपण आपला जीवनसाथी मानायचा आयुष्यभरासाठी ? तो आपल्याला सुखी ठेवेल का? त्याला एखादं व्यसन तर नसेल ना? त्याचा स्वभाव कसा असेल? हा आपल्यासमोर आणि आई-बाबांसमोर मुद्दाम चांगल वागण्याचं नाटक तर करत नसेल ना? त्याच्या घरचे कसे असतील? मला नीट सांभाळून तर घेतील ना? आणि भांडखोर असला तर मग काय? त्याच्या मित्रांचा गोतावळा कसा असेल? हे आणि असे अनेक प्रश्न कावेरीच्या मनात पिंगा घालत होते. हे सगळ त्याला कसं विचारायचं? आणि जर हे प्रश्न मी त्याला विचारले तर तो मला उद्धट तर नाही म्हणणार ना? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे जोवर तिला मिळणार नव्हती तोवर ती कोणत्याच निर्णयावर पोहचणार नव्हती. 

एका नामांकित कंपनीमध्ये कावेरी काम करायची. तिथे काम करताना तिने अनेक प्रेज़ेंटेशन्स दिली होती. पण आज मात्र ती खूपच अस्वस्थ झाली होती मनाची चलबिचल वाढतच चालली होती. काल रात्री धड नीट झोपही लागली नव्हती तिला. त्याला उद्या भेटायचं आहे या विचाराने आणि एका अनामिक भीतीने तिच्या मनात थैमान घातलं होतं.

तिने शेजारीच झोपलेल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिले, तिला जाणवलं आईच्या चेहर्‍यावर एक समाधानाचं हास्य आहे. तिला आईने दिवसभर केलीली धावपळ आठवली, प्रतिकला पाहून हातानेच मुलगा चांगला आहे असा केलेला इशारा, सारं तिला आठवतं होतं. आईचा निजलेला हसरा चेहरा पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळुच कुस बदलली आणि डोळ्याच्या कडा पुसल्या. विचार करता करता कधी झोपं लागली कळलंच नाही तिला.

तर मैत्रिणींनो ही अशी मनाची घालमेल लग्न होऊन सासरी जाण्याच्या विचाराने प्रत्येक मुलीच्या मनात होत असेल नाही??

तुम्हाला हा कावेरीचा पहिला कांद्यापोह्यांचा कार्यक्रम आणि तिच्या मनाची घालमेल आवडली असेल तर मला नक्की कळवा, लाईक कमेंट आणि शेअर करून.

कावेरीला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील का आणि तिचा निर्णय काय असेल पाहुयात पुढील कथेत.


या कथेचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव, कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासहित शेअर करावी.Rate this content
Log in