मन पाखरू पाखरू !!!
मन पाखरू पाखरू !!!


स्वराचं मन आज पाखरासारखं सैरभैर झालं होतं. इकडून तिकडे, तिकडून इकडे उगीचंच डौलात मिरवत होतं. कारण एकच सकाळीच आईचा फोन येऊन गेला होता. श्रावण महिना सुरू झाला आहे, नागपंचमी, रक्षाबंधनसाठी स्वराला माहेरपणाला नेण्यासाठी तिची आई तिच्या दादाला पाठवणार होती. सासूबाईंनी देखील परवानगी दिली होती. असंही लग्नानंतरचे सगळे पहिले सण म्हणजे हौसमौज पुरवून घेण्याचे सोनेरी दिवस. रिमझिम कोसळणाऱ्या श्रावणसरी वसुंधरेला जसे ओलेचिंब करतात अगदी तसेच एका सासुरवाशिणीचं मन माहेरच्या आठवणींनी चिंब होतं.
तिला वाटत होतं ती पाखरू असती तर भुर्रकन उडून माहेरच्या अंगणात गेली असती, आणि सगळ्या मायेच्या माणसांना, आई वडिलांना, दादाला भेटली असती. सासरी असलेल्या मुलीचे मन माहेरच्या माणसांची वाट पाहताना अगदी सैरभैर होते.
स्वराच्या चंचल मनाची अवस्था कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी वर्णन केलेल्या मनाच्या अवस्थेसारखी झाली होती. मन वढाय वढाय... उभ्या पिकातलं ढोरं... किती हाकला हाकला... फिरी येतं पिकांवर... तिला माहेरी जाण्याची ओढ लागली होती. नागपंचमी, मंगळागौर, नारळीपौर्णिमा, हे सगळे सण तिच्या मनात रुंजी घालत होते. दुसऱ्या दिवशी तिचा दादा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने तिला माहेरी घेऊन गेला. घरी वाट पाहणाऱ्या तिच्या आईच मन देखील आज सारखं आत बाहेर करून मुलीची वाट पाहण्यात मग्न झालेलं होतं. ती घरी पोहचताच तिच्या आईने तिला उंबरठ्यातच थांबवून तिच्यावरून मीठ, मोहरी काढून तिला आत घेतलं आणि मायेनं कुशीत घेतलं. मग काय दोघी माय लेकी आसवांनी चिंब झाल्या. न बोलताच त्यांना एक मेकींच्या मनीचे भाव उमगू लागले.
स्वराला माहेरी आणायला गेल्यानंतर दादाला पाहून डोळ्यात दाटलेलं पाणी हे माहेरच्या आठवणींना उजाळा देणारं आणि मनांची सांगड घालणार होतं.
माहेरी आल्यावर मग काय गोडधोड पदार्थांची आरास, मैत्रिणींचा घोळका, मंगळागौरीची गाणी, झुल्यावर झुलणं, फुगड्या, या सगळ्यात छान माहेरच्या अंगणात तिचं मन रमलं. सासरी तिला भरपूर सुख होत, सासरची माणसं ही खुप चांगली होती, पण माहेरची ओढ नाही सुटत आणि माहेरचं नात ही नाही ना हो तुटत!!! माहेरचं अंगण, तुळशीवृंदावन, घराचा प्रत्येक कोपरा मनाच्या सोनेरी कप्प्यात तिने कैद करून घेतला, ज्याची चमक कधीच फिकी पडणार नव्हती, उलटं दिवसेंदिवस वाढणारच होती.
स्वरा एक माहेरवाशीण बनून माहेरपण उपभोगत होती. माहेरच्या अंगणात पुन्हा एकदा लहान होऊन बागडत होती. रक्षाबंधनला मस्त भावासोबत मस्ती मजा करत रक्षाबंधन पार पडलं.
एक थंड हवेची झुळूक यावी आणि शांत, स्वच्छ, नितळ पाण्यावर जलतरंग उठावे, अगदी तसेच तिला कधीतरी सौमित्रची आठवण येई, सौमित्र तिचा पती आणि तिचं मन परत पाखरू बनुन त्याच्या आठवणीत भिरभिरत राही. मग तिचा जीव वेडापिसा होई आणि त्याच्या आठवात आसवे गाळी. सारे जग तिला भकास वाटी. आणि परत तिला त्याच्या मिलनाची ओढ लागे. काय करणार ना!!!
मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.
© copyright
All rights reserved.
कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासहित पोस्ट करावी.