STORYMIRROR

Madhuri Sharma

Others

3  

Madhuri Sharma

Others

मला भेटलेली ती

मला भेटलेली ती

5 mins
187

आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात त्यांचे अनुभव आपल्याला जगण्याची एक नवी उमेद देऊन जातात.. अश्याच एका स्त्रीची प्रेरणादायी कहाणी... अशी एखादी व्यक्ती भेटली त्यांचे अनुभव ऐकले की वाटतं आपलं दु:ख यापुढे काहीच नाही... मला जगण्याची नवी दिशा मिळाली कदाचित हा लेख वाचल्यावर तुम्हाला ही काहीतरी नक्कीच प्रेरणा मिळेल...

     

        जालना सारख्या शहरात मी जन्माला आले. लहानपणापासूनच आजी-आजोबा भावंडासोबत मोठी झालेली मी नेहमीच संस्कारांनी परिपूर्ण राहीली. याचं महत्त्व आज मला कळतं. आजच्या पिढीला बघतांना आमच्या लहानपणी आम्ही कमी सुख-सोयीतही किती आनंदाने जगायचो याचं अप्रुप वाटतं. लहानपणी साधं समोसा ही खायला मिळाला तर प्रचंड आनंद व्हायचा. तो आजच्या या बर्गर-पिझ्झा सहज दर आठवड्याला खायला मिळणाऱ्या पिढीला कधीच कळणार नाही. लहानपणी खुप मागं लागल्यानंतर मिळणाऱ्या वस्तुचं आमच्या आयुष्यात किती महत्त्व होतं ते आज सर्वं मागायच्या आधीच मिळणाऱ्या पिढीला कधीच कळणार नाही.


लहानपणापासूनच शाळेतल्या प्रत्येक गोष्टीत फार हुशार होते मी, फक्त अभ्यासातच नव्हे तर रांगोळी, मेहंदी, चित्रकला, खो-खो, सर्वांमध्ये मला हमखास बक्षिसं मिळायची. आई-वडील दोन्ही कडक स्वभावाचे असल्याने मी लहानपणापासूनच एका मर्यादेत मोठे झाले.असंचं वर्ष सरत होते. मी १९८८ मध्ये बी.काॅम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आज ग्रेजुएट होणं सोपं आहे. पण आजच्या ३२ वर्षांपूर्वी परिस्थिती फार वेगळी होती. बारावी झाल्यानंतर बाबांनी सांगितलं आता शिक्षण बस्सं झालं. अभ्यासात हुशार असुनही त्यावेळी मुलींना एवढं शिकवलं जायचं नाही. म्हणुन माझे बाबा मला पुढे शिकवायला तयार नव्हते. त्याचं म्हणणं होतं मुलींनीच जर जास्त शिक्षण करून घेतलं तर मग त्यांना चांगला मुलगा मिळत नाही.त्यांचे विचार असे होते कारण त्या वेळची सामाजिक परिस्थितीच तशी होती. म्हणुन बाबांना दोष देण्यात काहीच अर्थ नव्हता. पण मला फार राग येत होता. कारण मला पूढे शिकायचे होते.मला आलेला राग मला कोणाकडेच व्यक्त करता येत नव्हता कारण मला समजून घेईल असं कोणीच नव्हतं त्यावेळी.


मी पुढे शिकत नाही हे कळल्यावर माझ्या शाळेतील सर्व शिक्षक घरी आले होते. त्यांनी माझ्या बाबांची समजूत काढली‌. फक्त मुलींचं काॅलेज आहे तुम्ही पाठवा रेखाला शाळेत म्हणुन त्या सर्वांनी फार प्रयत्न केले.आणि शेवटी नाही नाही म्हणत बाबा तयार झाले. त्यादिवशी मला फार आनंद झाला. मी अजून मन लाऊन अभ्यास करू लागले. आमच्यावेळी आम्ही पुढे शिकायला मिळावं म्हणून फार संघर्ष केला. मी बी.काॅमला टाॅपर होते. तेव्हा आमच्या बाजुला राहणारे बापूसाहेबांनी पूर्ण गल्लीत पेढे वाटले आणि जेव्हा त्यांच्या मुलीला नौकरी लागली तेव्हा माझ्या बाबांनी पूर्ण गल्लीत पेढे वाटले. त्यावेळी इतकी एकी होती की आजूबाजूला राहणारे सर्वं एकाच परिवारखसारखे आहेत असे राहायचे. आम्ही सर्व सण-उत्सव सोबत साजरे करायचो. त्यावेळी कुठल्याच प्रकारची सुविधा नसतांना देखील आम्ही फार आनंदी रहायचो. आता असं बघायला मिळत नाही. आत्ताच्या मुलांना तो आनंद अनुभवता येणार नाही. ते तारक मेहता सिरियल मध्ये दाखवता ना अगदी तसचं वातावरण आमच्यावेळी बघायला मिळायचं.


इथे मी बी.काॅम पास झाले आणि इथे माझ्यासाठी मालेगांवचं स्थळ आलं. आमच्यावेळी मुलं काय अन् मुली काय दोघांचीही लवकरच लग्न होत. मला लग्न करायचं नव्हतं असं नाही पण जो मुलगा माझ्यासाठी आला होता तो फक्त दहावी शिकलेला होता. मी माझ्या लग्नाची जी स्वप्नं बघितली होती त्यात मला माझ्यापेक्षा जास्त शिकलेला मुलगा मला हवा होता. म्हणुन मी त्या मुलाला नकार दिला. पण नियतीला ते मान्य नव्हतं. आई-वडीलांना स्थळ आवडलं आणि माझं लग्न ठरलं. १९८९ साली नोव्हेंबर महिन्यात माझं लग्न झालं.


माझं लग्न होऊन मी जेव्हा सासरी आले तेव्हा तिथलं सर्वंच माझ्यासाठी नवीन आणि वेगळं अनुभव देणारं होतं. नवऱ्याकडून असलेल्या माझ्या सर्वं अपेक्षा एक-एक करून भंग झाल्या. नवरा व्यसनी निघाला. विनाकारण हात उगारायचा. सतत शिवीगाळ करणं, राग आला की मारणं हे रोजचंच झालं होतं‌. माहेरी ही परिस्थिती सांगण्याची मूभा नव्हती कारण मोठ्या भावाचं लग्न बाकी होतं, बाबा आजारी होते आणि मोठी बहीण पहिलेच तिचं सासर सोडून आली होती. माझ्या वाटल्या आलेलं सर्वं मी सहन केलं. लग्नानंतर लगेच एका महिन्याने मी गर्भवती राहीले. अनेकवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रोज रोज मन मारून जगण्यापेक्षा एकदाचं हे आयुष्य संपवलेले बरे असे वाटायचे.. पण गर्भवती राहिल्यानंतर तो ही विचार मला सोडावा लागला. आपलं आयुष्य आता फक्त आपलं न राहता ते आता दुसऱ्या कोणाचंही आहे. या जाणीवेने मी फक्त त्या येणाऱ्या बाळासाठी जगायचं ठरवलं. माझ्या आयुष्याचं एकच ध्येय होतं ते म्हणजे त्या येणाऱ्या बाळासाठी जगावं. माझं पूर्ण शिक्षण वाया गेलं. एका चूकीच्या माणसांसोबत लग्न केल्याचा त्रास मी आजतागायत भोगत आहे.


मला दोन मुली आणि एक मुलगा झाला. त्यांच्या अनेक लहान-लहान गरजा पूर्ण करण्यासाठी मला माझ्या नवऱ्याचा मार खावा लागत असे. मी फार कष्ट करून माझ्या मुलांना मोठं केलं‌. मी त्यांच्या शाळेची फी भरता यावी म्हणुन एक तास, दोन तास मिळेल ते काम करून पैसे जमवायचे हे मी माझ्या मुलांनाही नाही सांगितलं अजून. मी केलेल्या कष्टांचं मला कधीतरी फळ मिळेल या आशेवर मी जगत होते. आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत मी पुढे चालत राहीले. असंच एक सर्वांत मोठं आलेले झंझावात म्हणजे माझ्या नवऱ्याचे सततचे मारणे, भांडणे यामुळे माझ्या मोठ्या मुलीला हार्टअटैक आला आणि ती मला कायमची सोडून गेली. माझं आयुष्य तेव्हाच संपलं. त्यानंतर मी फक्त जगायचं म्हणून जगत होते. पण ते म्हणतात ना, "सबका एक दिन आता हे"


तसंच माझा तो एकदिवस आला जेव्हा माझ्या मुलाला मोठ्या कंपनीत नोकरी लागली. पैश्यांमुळे बघितलेल्या अनेक अडचणी त्यामुळे बऱ्यापैकी संपल्या आणि माझ्या धाकट्या मुलीने ही बी.काॅम आणि त्यानंतर एम.काॅममध्ये टाॅप केलं. माझ्या या दोन्ही मुला-मुलीने माझं जीवन सार्थक केलं. मी केलेल्या कष्टांचं चीझ झालं. आज जेव्हा माझ्या दोन्ही मुला-मुलीचं कौतुक करतात तेव्हा माझा उर अभिमानाने भरून येतो. आयुष्यभर मी जे काही ज्यांच्यासाठी सहन केलं तर या माझ्या पोरांनी माझी लाज राखली. आजही माझं आणि माझ्या नवऱ्याचं एक क्षणही पटत नाही पण मी आता त्याची मारहाण, शिवीगाळ सहन करत नाही. माझ्या मुलांनी माझ्यात तो आत्मविश्वास निर्माण केला आहे.


एका स्त्रीचं आयुष्य सोपं नसतं पण ते माझ्यासारखं इतकं खडतर ही नसावं‌. संबंध आयुष्य हिंसा सहन करत जगणं फार अवघड आहे. जे माझ्या वाटल्या आलं ते कोणाच्याच वाटल्या येऊ नये. मी सर्वांना एकच सांगेन तुमची चूक नसेल तर अन्याय सहन करू नका. माझं शिक्षण माझ्या काहीच कामी आलं नाही कारण सासरच्यांनी संधी असतांनाही मला कधी नोकरी करू दिली नाही पण ते शिक्षण वाया गेलं असंही म्हणता येणार नाही कारण मी माझ्या मुलांना सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवण्यासाठी त्याचं वापर केलं.


आज माझ्या मुलाचं-मुलीचं लग्न झालंय. माझा मुलगा चांगल्या कंपनीत जाॅबला आहे. मुलगीही तिच्या सासरी सुखी आहे. आज मागे वळताना बघितलं तर कळतं जे छोटंसं रोपटं होतं ते आज चांगले वृक्ष झालं आहे ज्याला गोड फल लागली आहेत. हे माझ्या बाबतीत घडलं यावर विश्र्वास बसत नाही. कारण सतत दु:ख बघितलेल्या व्यक्तिला सुख आलं की त्यातही काहीतरी वाईट होईल असंच वाटतं राहतं. 


Rate this content
Log in