काहुर दाटलं अंतरी.
काहुर दाटलं अंतरी.
दारी मंडप सजला होता...घरात लगीन घाई सुरू होती... पाहुण्यांची लगबग सुरू झाली होती...दारात बांगड्यांचा कार्यक्रम सुरू झाला होता...उद्या सई ची हळद होती...परवा ती लग्न होऊन सासरी जाणार होती... जात्यावर हळद दळणाऱ्या बायका ओव्या गात होत्या...
आई बापाची गं लाडी । उद्या निघाली सासुरा ।
बाप होई हळवा । आईचा गं जीव वारा ।।
बंधुराजा तालेवार । देई संकटी आधार ।
भावजय माझी भोळी । झाली जिवाभावाची सोबती ।।
ओव्या ऐकून सईचा जीव व्याकुळ हॊत होता...ती घरातल्या कानाकोपऱ्यात जाऊन बालपणापासूनच्या आठवणींची शिदोरी बांधून घेत होती...जी तिला आयुष्यभरासाठी पुरणार होती...जगण्याचं नवीन बळ देणार होती...तिच्या मनात विचारांचं काहुर माजलं होतं...तिचे आई बाबा ही आपल्या मनात चाललेल्या भावनांच्या कल्लोळाला आवर घालत लग्नाची तयारी करीत होते... त्यांच्या एकुलत्या एका लाडक्या लेकीचं लग्न होत...सईच्या मनात नानातऱ्हेचे प्रश्न थैमान घालत होते...उठलेलं विचारांचं काहुर थांबायचं नाव घेत नव्हतं...एक अनामिक हुरहुर दाटली होती...हे काहुर प्रत्येक लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलीच्या मनात थैमान घालतच असत...
सई साऱ्या घरात फिरून सारं घर नजरेत सामावून घेत होती...इतक्यात आईने तीला आवाज दिला...तीने धावतच जाऊन आईला मिठी मारली...आणि तिच्या कुशीत शिरली...
माय लेकीने आतापर्यंत बांध घालून आवरलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली...सईचं मन राहून राहून एकच सवाल करत होतं , आईला विचारतं होतं...
काहुर लेकीच्या मनातलं...😥
आई !!! तुझ्या कुशीत विसावू वाटतयं गं , गुज माझ्या मनाचं तुझ्या कानात सांगावस वाटतयं . मनात एक अनामिक हुरहुर ,
काहूर दाटलयं , उद्या माझी हळद , परवा मी लग्न होऊन सासरी जाणार . हे माझं लाडकं घर मी कसं सोडू गं . आज इथे मी सगळ्यांची लाडुली आहे , बाबांच्या काळजाचा तुकडा आहे , तुझी सावली आहे . माझ्या लाडक्या दादाची लाडकी सोनूली आहे . ह्या घरची मिनमिनती पणती आहे . उद्या मी राजाची राणी बनणार ...
तुझ्या अंगणीची ही लाडकी तुळस उद्या दुसऱ्यांच्या अंगणी बहरणार . ज्या अंगणी मी वाढले तिथे परकी होणार . तुम्ही दिलेली ओळख पण मी इथेच सोडून जाणार . अशा कशा ह्या चालीरीती आई , ज्या लेकींचा अंत पाही , ज्या मनाने जवळ असतानाही तनाने दूर नेई . नव्या अंगणी नव्याने फुलेन मी , बहरेन मी , पण ज्या मातीत मी रुजले , अंगणात खेळले , लहानाची मोठी झाले त्याचा गौरव चारी दिशांत वाढवीन मी .
माय लेक दोघींची ही मन ओथंबली होती...अश्रूंच्या सरीत न्हाऊन दोघीही मोकळ्या झाल्या...बाबा ही बाहेर उभे राहून माय लेकीच्या प्रेमाचा सुख सोहळा पाहून डोळे टिपत होते...ते ही भाव विव्हळ झाले होते...शेवटी त्यांच्या काळजाचा तुकडा होती ती...त्यांची लाडकी सई होती...
सई तुळशीवृंदावना जवळ गेली...दिवा लावला...आणि हात जोडून प्रार्थना करू लागली...आपण दोघी या अंगणात एकत्र खेळलो...बहिणीसारख्या दोघी एकत्र वाढलो...पण आता वेळ आली आहे मी हे घर सोडून सासरी जाणार...मी तनाने जरी दूर असले तरी मनाने इथेच असणार आहे...आजवर या घरच्या सगळ्या सुखदुःखाची तु साक्षीदार आहेस...आणि पुढे भविष्यात ही असणार आहेस...घराची काळजी घे...तू या घरची रक्षणकर्ती हो... सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घे...आई बाबांचा आधार बनं...या अंगणात बहर...तुझा सुगंध या अंगणात असाच नेहमी दरवळू दे...तिच्या डोळ्यात अश्रू होते...आणि तिने हात जोडले...