जवाबदारी आणि कर्तव्य
जवाबदारी आणि कर्तव्य
रेवा आणि मी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेलो होतो. मस्त गुलाबी थंडीत, थंडगार हवेचा शहारा आणणारा स्पर्श अनुभवत रस्त्याच्या कडेने चाललो असताना अचानक बाजूने जाणाऱ्या बसमधून कोणीतरी थुंकलं. थोडक्यात बचावले नाहीतर अंगावरच उडालं असतं. "अरे ये!!! दिसत नाही का? कुठे ही थुंकता, बापाचा रस्ता वाटला काय रे!!! घाणेरडे कुठचे..." मी ओरडले, पण माझं बोलणं ऐकायला बस थोडीच थांबणार होती.
" अगं!!! गप्प गं काय ओरडतेस तुझ्या अंगावर तर नाही उडालं ना, मग का गोंधळ करतेस." रेवा मला म्हणाली.
" असं कुठे ही रस्त्यावर थुंकायचं का ? सगळीकडे घाण करून ठेवायची. अगं!!! वागायची काही रीत असते की नाही. वाटेल तिथे थुंकायचं, वाटेल तिथे रस्त्यावरच एखादा कोपरा पाहून मूत्र विसर्जन करायचं. बिस्कीट, चॉकलेट खाऊन झाले की कागद कुठेही भिरकावून द्यायचे. गुटखा, पान, मावा, खाऊन वाटेल तिथे पिचकाऱ्या मारायच्या. सगळे रस्ते, जिन्याचे कोपरे, कंपाऊंडच्या भिंती, सगळीकडे घाणीघाण करून टाकायचं. हे योग्य नाही, अशा लोकांनी थोड तरी सामाजिक भान जपलं पाहिजे." माझी बडबड चालूच होती.
बाजूलाच रस्त्यावर झाडू मारणाऱ्या सफाई कामगाराकडे बोट करून रेवा मला म्हणाली " तो बघ झाडू मारतोय, तो करेल साफ, तु चल, जास्त लोड नको घेऊस. आणि तुला काय झालं एवढं चिडायला, तुझ्या घरात तर घाण करत नाही ना कोणी येऊन.
" हो!!! तो स्वच्छता दुत करतोय साफसफाई, मारतोय झाडू, त्याचं कर्तव्य तो अगदी चोख पार पडतोय. खरचं!!! एखाद्या दुतासारखं सगळे रस्ते, गल्ल्या चमकवुन काढतोय. पण या देशाचे जवाबदार नागरीक म्हणुन आपलं काही कर्तव्य आहे की नाही. सरकारने आपल्याला ज्या सोयी, सुविधा देऊ केल्यात त्यांचा योग्यप्रकारे वापर करणे, त्यांची निगा राखणे हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. आपणच त्यांचा योग्यप्रकारे वापर करत नाही आणि नंतर सरकारच्या नावाने बोंबा मारतो. पण आपल्या आजुबाजुचा परिसर साफ ठेवायला कशाला हवंय सरकार. प्रत्येकांनी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ, सुंदर ठेवला तर आपोआपच देश स्वच्छ आणि निरोगी राहील ना. मग कोणत्याच अभियानाची गरज भासणार नाही."
" झालं तुझं भाषण सुरू." वैतागुन रेवा म्हणाली.
" अगं भाषण काय म्हणतेस, हे फक्त रस्त्यावर थुंकणे, आणि कचरा करणे इथं वर मर्यादित नाही आहे. वाढतं शहरीकरण, इंडस्ट्रीयलायजेशन यामुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे. परिणामी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे प्रदूषण आणि पृथ्वीचा उष्मा वाढतोय आणि ओझोन वायूच्या थराचा ऱ्हास होत चालला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. वृक्षतोडीचा परिणाम पावसावर ही होत आहे, कमी पाऊस पडल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे आपल्याला पाणी ही जपुन वापरायला हवं. हे सगळं जर थांबवायचं असेल तर आधी होणारी वृक्षतोड थांबवली पाहिजे. दुर्मिळ होत चाललेल्या झाडांच्या प्रजातींचे जतन करून त्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करायला हवं. हे आपलं आद्य कर्तव्य आहे. निसर्ग भरभररून दान आपल्या ओटीत टाकतोय. त्याची काळजी घेणे ही आपली नैतिक जवाबदारी आहे. आणि जर असं केलं नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देखील मिळणार नाही." मी बोलत होते, आणि रेवाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.
" बरोबर बोलत आहेस गं तु. खरचं पुढच्या पिढीचा विचार करायला हवा."
" इतकंच नाही, आपल्याला प्लॅस्टिकचा वापर ही कमी करायला हवा. प्लॅस्टिकच विघटन होत नसल्यामुळे ते वर्षानुवर्षे तसेच जमिनीच्या आत दबुन राहते, त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते, परिणामी शेतातून मिळणारे उत्पन्न कमी होते. पेट्रोल, डिझेल सारखी खनिज द्रव्य ही कमी वापरायला हवीत. विजेचा वापर कमी करायला हवा. आता जर आपण या सगळ्या गोष्टींवर आळा नाही घातला तर पुढच्या पिढीला काहीच शिल्लक राहणार नाही." काय बरोबर बोलत आहे ना मी. घुसतयं का काही डोक्यात.
" हो घुसलं, आणि डोळ्यात चांगलं जळजळीत अंजन ही घातलसं. उघडले गं बाई माझे डोळे आणि आज पासून कुठेही सार्वजनिक ठिकाणी कचरा करायचा नाही. पाणी जपून वापरायचं, झाडे लावायची, विजेचा वापर कमी करायचा, आणि हो प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही." असं म्हणत रेवा हसू लागली.
रेवाला तर समजलं, पण तुमचं काय, तुम्हाला समजलं की नाही. चला तर मग सगळे मिळून उचलूयात एक पाऊल आपल्या देशाला स्वच्छ, सुंदर, सुजलाम, सुफलाम, बनवण्याचा दिशेने, आणि पुढच्या नवीन पिढीला एक चांगलं भविष्य देण्याच्या दिशेने.