Sunita madhukar patil

Others

4.8  

Sunita madhukar patil

Others

दोन घडीचं सुख

दोन घडीचं सुख

4 mins
379


प्रतापराव आज खुप खुश होते. डोळे मिटून मस्त आराम खुर्चीत विसावले होते आणि त्यांच्या आवडीचं गाणं रेडिओ वर ऐकत होते.

" तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरो से भी मिल रही रोशनी है। " गाणं ऐकत ऐकत हळूच त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि ते उठून वसुच्या फोटो समोर जाऊन उभे राहिले. उशीरपर्यंत वसुच्या चेहऱ्याकडे टक लावून ते पहात होते आणि मनातल्या मनातच तिला सांगत होते. आपला मुलगा आणि सुन गुणी आहेत हो!!!

इतक्यात उघड्या खिडकीतुन एक चिमणी घरात घुसली आणि तिच्या पंखांच्या फडफडाटामुळे त्यांची तंद्री भंगली. मग काय ते पळाले तिच्यापाठी तिच्या पंखांचा फडफडाट ऐकण्यासाठी. 

आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, अहो!!! ते जेंव्हा पासून हॉस्पिटलमधुन आलेत ना असचं करत आहेत. पाखरांची किलबिल, वाहणाऱ्या वाऱ्याचा सुळसुळाट, घड्याळाची टिकटिक, पाण्याचा खळखळाट, कुकरच्या शिट्टीचा आवाज हे सारे वेगवेगळे आवाज ते कानात साठवून घेत होते. कारण ही तसचं होतं ना!!! आज त्यांना श्रवणयंत्र बसवण्यात आलं होत. गेल्या वर्षभरापासून त्यांना हळूहळू ऐकू यायचं कमी आलं होतं पण काही दिवसा पूर्वी तर पूर्णच ऐकू यायचं बंद झालं. बऱ्याच दिवसापासून त्यांनी कुठला आवाजच ऐकला नव्हता. आज त्यांच्या सुनेने मोठ्या कौतुकाने त्यांना हे श्रवणयंत्र बसवून दिलं होतं आणि म्हणुनच मघाशी इतकं भावविवश होऊन वसुजवळ आपली मुलं गुणी असल्याची ग्वाही ते देत होते. 

वसु देवाघरी गेल्यानंतर प्रतापराव खुप खचले होते. सुहास आणि रेवती यांनी घेतलेली काळजी, नातीचं प्रेम या सगळ्यात वसु गेल्याच दुःख मागे पडत गेलं आणि त्यांनी स्वतःला सावरलं. रेवती, प्रतापरावांची सुन नोकरी करायची, ते तिला घरकामात मदत करायचे ती ऑफिस मधुन घरी येईपर्यंत ते डाळ भाताचा कुकर लावायचे, नातीला शाळेत सोडायचे, बाजारातून भाजीपाला आणायचे, त्यांना शक्य तितकी मदत ते रेवतीला करायचे. त्यांना ही या सगळ्यात एक प्रकारचा आनंद भेटत होता. आपण कोणावर अवलंबुन नाही याचं समाधान ही भेटत होत. यामुळे त्यांचा स्वाभिमान ही जपला जात होता. आपले हातपाय चालत आहेत तोपर्यंत काम करत रहायचं आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे ते पडेल ते काम करत होते. सगळं कसं छान चाललेलं होत. 

पण मागील एक वर्षांपासून त्यांना हळूहळू कमी ऐकू येऊ लागलं आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. ते घरातल्या कामात हातभार लावायचे त्यात व्यत्यय येऊ लागला. मुलगा आणि सुन ऑफिसला गेल्यावर ते दिवसभर एकटेच घरी असायचे. एक दिवस गॅस सिलेंडर वाला येऊन बेल वाजवून वाजवून निघुन गेला तर कधी कुरिअर वाला. एक दिवस तर भाताचा कुकर लावून ते विसरून गेले आणि त्यांना कुकरची शिट्टी देखील ऐकू आली नाही. आणि ते तसेच बाहेर निघुन गेले. रेवती घरी आली तर फक्त कुकरचा स्फोट होणं बाकी राहील होत. असे छोटे मोठे अपघात होता होता टळले होते. म्हणुन आज त्यांना हे श्रवणयंत्र बसवण्यात आलं होत. आणि आज ते खुप खुश होते. त्यांची अवस्था एखाद्या लहान बाळाप्रमाणे झाली होती. आवाज तेच होते पण खुप दिवसानंतर ऐकल्यामुळे एक एक आवाज ते अगदी मनात साठवत होते. त्यांचा उत्साह कसा अगदी ओसांडून वाहत होता. 

याच उत्साहाच्या भरात दोन तीन महिने कसे निघुन गेले काही कळलंच नाही. हळूहळू त्यांना जाणवू लागले की मधुर आवाजाच्या दुनियेत भांड्यांच्या खडखडाटाचा आवाज देखील येऊ लागला आहे. अहो!!! आता घर म्हटले की भांड्याला भांड लागणारच ना. थोडक्यात काय तर घरात सुहास आणि रेवतीचे वाद सुरू झाले होते. सुरवातीला दोघा नवरा बायकोतले वाद समजुन त्यांनी दुर्लक्ष केलं. पण नंतर दुर्लक्ष ही करता येईना. भांडण सुरू झाले की ते हळूहळू उग्र रूप धारण करायचं आणि मग बाहेरपर्यंत ऐकू यायचं. सुहास मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता. घर विकत घेताना रेवतीने खुपदा सुचवलं होतं की घरासाठी आपण बँकेतुन लोन घेऊयात पण सुहासने व्याजदर कमी पडेल म्हणून कुठल्यातरी खाजगी संस्थेतुन पैसे उचलले होते. आणि आता अचानक त्या संस्थेने पैसे परतीसाठी तगादा लावला होता. त्यामुळे तो आता अडचणीत सापडला होता आणि याच टेन्शन मध्ये दोघांचे रोज खटके उडायचे.

प्रतापराव ही बैचेन राहू लागले. एका हसत्या खेळत्या घराला कोणाची नजर लागली कोणास ठाऊक. ते मनात असूनही काही करु शकत नव्हते. त्यांना खूप वाईट वाटायचं. 

एका रात्री असाच दोघांचा वाद सुरू झाला आणि हळूहळू विकोपाला गेला. सुहास रागारागात काहीही असबंध बोलत होता. " बाबानां आईच्या उपचारावर इतके पैसे खर्च करण्याची काय गरज होती. ती जास्त दिवस जगणार नाही, जास्तीत जास्त एक महिन्याची सोबती आहे, कॅन्सरचे पेशंट जास्त जगत नाहीत हे माहीत असताना देखील गावाकडील घर, जमीन विकून तिच्या उपचारावर इतके पैसे का खर्च केले बाबांनी!!! ते पैसे आता आपल्या उपयोगाला आले असते ना!!! " अजुन ही बरचं काही.

" अरे काय बोलतोयस तु हे सुहास बोलताना थोडा विचार कर, चुक आपली आहे आपण चुकीचा निर्णय घेतला यासगळ्यात बाबा कुठे आले. उगीच काहीही बोलू नकोस." रेवती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण सुहास काहीच ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याची बडबड चालुच होती.

प्रतापरावांनी इतकचं ऐकलं आणि ते मटकन खाली बसले. जणू त्यांच्या पायातील अवसानच गळालं होतं. खुप उशीर ते उगीचच शुन्यात नजर लावुन बसले. थोड्यावेळाने उठले हळूच लटपटत वसुच्या फोटो जवळ गेले आणि रडत रडत कानातील श्रवणयंत्र काढून तोडून फेकुन दिलं. दोन घडीचं मिळालेलं सुख मनात साठवुन ते निराशेच्या गर्तेत हरवुन गेले.


Rate this content
Log in