Nasa Yeotikar

Others

2  

Nasa Yeotikar

Others

डिजिटल शाळा

डिजिटल शाळा

3 mins
8.8K


शिरपुर शाळेतील मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि एक मैडम आज सकाळी सकाळी गावात आले होते. तशी तर शाळा सकाळी नऊ वाजता भरते पण आज सर्व जण सकाळी का आले असतील म्हणून गोविंदराव म्हणतात, "रामराम गुरूजी" आज खूप लवकर आलात, काय काम काढले?" यावर मुख्याध्यापक म्हणाले, "काही नाही हो, आपली शाळा डिजिटल करायची आहे. त्यासाठी गावातील लोकांची मदत घ्यावी म्हणून वर्गणी गोळा करण्यासाठी आलो आहोत." "बरे, बरे" असे म्हणत गोविंदराव हळूच बाजूला झाले. तेवढ्यात शाळा व्यस्थापन समितिचे अध्यक्ष आणि इतर मंडळी आले. मग सर्वानी मिळून गावात फेरफटका मारण्यासाठी निघाले.
शिरपुर हे जेमतेम शंभर घराचे आणि एक हजार लोकसंख्या असलेले गाव. दोन गावात मिळून असलेली गटग्रामपंचायत आणि दोन्ही गावात सरकारी शाळा अस्तित्वात होत्या. पण शिरपुरच्या शाळेत मुलांची संख्या बऱ्यापैकी असल्यामुळे शिक्षकांची संख्या चार होती. गावातील सर्व लोक खूप चांगल्या स्वभावाचे होते. कुणी ही शाळेच्या मुख्याध्यापक किंवा शिक्षकांविषयी ब्र काढत नसत कारण शिक्षक मंडळी सुध्दा आपले काम अगदी नेटाने करीत होते. तालुक्यातील सर्व शाळा जवळपास डिजिटल झाले होते. काही शाळा शिल्लक होत्या त्यात शिरपुरची शाळा ही होती. सर्व अधिकारी मंडळी शाळा डिजिटल करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या मागे हात धुवून लागले होते. त्यामुळे नाईलाजास्तव मुख्याध्यापकास शाळा डिजिटल करण्यासाठी गावात पाऊल ठेवावे लागले. सर्वप्रथम शाळेतील शिक्षक मंडळी आपल्या पगारीतून डिजिटल शाळे साठी काही रक्कम दिले. पण डिजिटल शाळेसाठी जो खर्च येणार होता तो खूप होता, त्यासाठी ही मदत खूपच कमी होती. शासनस्तरावरुन तर काहीच मिळत  नव्हते. काही ही करा पण शाळा डिजिटल करा, असा तगादा मात्र सतत लावले जात होते. ग्रामपंचायत कडून देखील काही निधी मिळणार होता पण कधी मिळणार हे नक्की नव्हते.
सर्वप्रथम गावातील प्रसिध्द व्यक्ती म्हणून ज्यांची ख्याती होती अश्या नारायणरावाच्या घरी पोहोचले. डिजिटल शाळेविषयी संपूर्ण माहिती दिली. त्यांनी सर्व बाबी नीट समजून घेऊन लगेच हजार रूपये काढून दिले. वर्गणी गोळा करण्याची सुरुवात अगदी छान झाली होती. तेथून ही फौज श्यामरावाच्या घरी पोहोचली. शाळेच्या प्रगतीसाठी श्यामरावांना अनुकूल होते त्यामुळे त्यांनी क्षणाचा विचार न करता हजार रुपये काढून दिले. सर्वाना आनंद वाटला. दोन घरात भेट देण्यामध्ये सकाळचे नऊ वाजले. शाळा भरण्याची वेळ झाली म्हणून सर्व जण शाळेत आले. शाळेत येऊन वर्गानी विषयी चर्चा करण्यात आली. असे गावात फिरून वर्गानी जमा करणे खूप कठिण काम आहे त्या ऐवजी शाळेत पालक सभा बोलवू या आणि मग वर्गणी जमा करू या. असे सर्वानी मिळून ठरविले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता जमा होण्याचे ठरवून सगळे आपआपल्या कामाला निघून गेले.
शाळेत उद्या सकाळी पालकसभा आयोजित करण्यात आली म्हणून गावात राम्या ने डंगोरीही दिली. प्रत्येक घराच्या जवळ जाऊन राम्या ने ओरडून सांगितले. सूर्य नारायण वर येण्याच्या अगोदर शाळेचे मुख्यध्यापक शिक्षक शाळेत हजर झाले. सकाळचे सात वाजले असतील, शाळेच्या आजूबाजूला असलेल्या घरातील गावकरी आपली सकाळची दिनचर्या करण्यात व्यस्त होते. कुणी दात घासत होते, कुणी तोंड धूत होते तर कुणी टमरेल धरून बाहेर जात होते. बायका शाळेतील हाफश्या वर पाणी भरण्यासाठी ये जा करीत होत्या. एक तासाचा अवधी संपला पण शाळेच्या मैदानात कुणी फिरकले नाहीत. आज पालकसभा आपल्या फायद्याची नसून आपल्या खिशाला चाट लावणारी आहे या विचारात प्रत्येकजण दुरुन चोरुन चोरुन पाहत होते मात्र जवळ कुणी येत नव्हते. जेमतेम चार पाच माणसे गोळा झाली. तेवढ्यात लोकंसमोर मुख्याध्यापकानी डिजिटल शाळेविषयी माहिती सांगितली. तेंव्हा त्या सभेत बसलेल्या पैकी एक दोघांनी सकारात्मक विचाराने शाळेला एक हजार रूपये देणगी दिली. लाख रूपयाच्या वर खर्चाचा अंदाज असताना हातात होते इन मिन वीसहजार रूपये काय करावे हे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सुचेना.
दिवस रात्र त्याच विचारांच्या धुंदीत एप्रिल महिना संपला. एक मे च्या दिवशी महाराष्ट्र दिना निमित्त झेंडावंदन झाले. यावेळी सुद्धा गावकऱ्याची जेमतेम उपस्थिती होती. डिजिटल शाळेचा मुद्दा कोणी उपस्थित केलाच नाही. मे महिन्यात सर्वत्र बदलीचे वारे वाहत होते. यात एका महिला शिक्षिकेची आणि मुख्याध्यापकाची बदली झाली.
मुख्याध्यापकानी सुटकेचा जसा निःश्वास सोडला तसे गावकारी देखील निश्चिंत झाले होते. मात्र बच्चे कंपनी खुपच हिरमुसली झाली. अशावेळी त्यांनी जर बाजूच्या   गावात असलेल्या डिजिटल शाळेत प्रवेश घेण्याचे ठरविले तर त्यात त्यांचा काय दोष?


Rate this content
Log in