अनुभव
अनुभव


गेले पंधरा दिवस वर्गात असणारी एक मुलगी, श्रुती भिसे,ही तीन-चार दिवस झालं वर्गात सतत रडत आहे. कारण असे की एक दिवस तिथे आजोबा तिला न्यायला उशिरा शाळेत आले.
त्यादिवसा पासून ती खूप घाबरायला लागली. तिला वाटले की आता आपले आजोबा,आपली आई, बाबा आपल्याला शाळेत न्यायला खूप उशीर करत आहेत. त्यामुळे एखाद्याचे पालक आले की ती फार रडायला लागयची . आई,बाबा, आजोबा,आजी सगळ्यांनी तिला समजावून सांगितले. पण तिचे रडे काही कमी होत नव्हते.
शाळेत तर यायचे, बसायचे अभ्यासही करायचा. कंटाळा आला की म्हणायची बाई " हा अभ्यास तुम्ही घरी पाठवा मी करते. "असेच तीन दिवस गेले. आजचा चौथा दिवस होता.
आज मुलांना एक कार्टूनची फिल्म दाखवण्यात आली. ती पाहून ती रमली. पण अचानक मध्येच मला बिलगायला आली. अगदी मला कमरेला घट्ट धरले. "बाई,बाई एक सांगू तुम्हाला." असे म्हणून ती बोलू लागली.
"बाई तुम्ही माझ्या आई-बाबांना कोणाला सांगू नका मी रडत होते म्हणून, कारण ते मला ना दुसऱ्या शाळेत घालतील. त्यांनी सांगितले तू जर का रडत बसलीस तर तुला जास्त वेळ असणाऱ्या शाळेमध्ये घालणार आहे. " त्यामुळे ती घाबरली होती. तिला खरच असे वाटले की तिचे आई-बाबा दुसऱ्या शाळेमध्ये घालणार आहेत. ती खूप रडत होती आणि मला सांगत होती "मला तुम्हीच हव्यात. मला दुसऱ्या बाई नको, मला दुसरी शाळा नको. मी नाही रडत मी नाही रडत. पण तुम्ही माझ्या आई बाबांना अजिबात सांगू नका. मला प्रॉमिस करा."
मला खरंच ह्या चिमुकललीचे कौतुक वाटले. किती भावनावश हे वय. आपल्या विश्वात रमणारे वय.
असे कितीतरी नवीन अनुभव दररोज येतात मला. याच्या मागचा एक उद्देश आहे की आपण या मुलांना हाताळतो कसं? जाणून घेतो कस? हे समजायला हवे..
मी तिला खूप छान समजून सांगितलं तिला म्हणलं "बाळा तू रडली नाही तर मी कशाला सांगू तुझ्या आई बाबांना. मी त्यांना फोन करणार नाही तू रडू पण नको." ती खरच त्यानंतर रडायची शांत झाली. वर्गात बसली फळ्यावरचा अभ्यास केला. मी गाणी लावली त्याच्या वरती नाचली,छान हसली, खेळली आणि छान हसत, हसत आपल्या घरी गेली. आई आली होती तिला न्यायला आई म्हणाली "बाई काय जादू केलीत खूप रडत होती माझी लेक."
मी फक्त हसले आणि त्यांच्या ताब्यात त्यांची मुलगी दिली.