अखेर लॉकडाऊन संपला...
अखेर लॉकडाऊन संपला...


"काय गं घरात कोणीच कसं दिसत नाही कुठे गेले सगळे."
"आज लॉकडाऊन संपला ना तसे पडले घराबाहेर, माई-अप्पा वॉकला, मानसी शरयूकडे ऑनलाईन झुंबा करायला गेली, गौरव सकाळीच क्रिकेट, आता उरला तुम्ही, आज रविवार म्हूणन घरात नाहीतर एव्हाना ऑफिसला जाण्याची गडबड असायची तुमची... मी काय आपली घरातच मला कुठे लागतो लॉकडाऊन वगैरे."
"अगं पण माई-अप्पाना बाहेर का पाठवलं सिनियर सिटीझन ना बाहेर जाण्यास परवानगी नाही आहे."
"माहित आहे मला मी म्हटलेसुद्धा त्यांना, पण ते म्हणाले इथेच तर जातो येतो पटकन."
"अवघड आहे."
"तुम्ही शांत राहा आल्यावर बोलू आपण."
"ओह्ह म्हणजे उद्यापासून ऑफिस सुरु तर महिनाभर घरात होतो ना मस्त सुट्टी गेली. रोज तुझ्या हातचे नवनवीन पदार्थ वाह्ह... पण उत्साह आहे नव्याने ऑफिसला जाण्याचा पण खरंच मी एवढी सुट्टी कधी घेतलीच नव्हती. नेहमी काम काम पण लॉकडाऊनमुळे मी घरात मिसळलो. पण वाईट वाटतं त्या लोकांचे ज्यांच्याकडे काम नसेल लॉकडाऊनमुळे. बरं काय केलं ब्रेकफास्टसाठी."
"पाव-भाजी."
"काय, वाह्ह्ह... बरं मला दे मी करतो ब्रेकफास्ट."
"काय हो तुम्ही लहान मुलासारखे सगळ्यांना येऊ द्या, एकत्र बसून करू ब्रेकफास्ट."
"नेहमी आपण एकत्र करतच नव्हतो पण लॉकडाऊनमुळे आपण एकत्र बसू लागलो. मग मी ठरवलं आहे सुट्टीच्या दिवशी आपण एकत्र बसावे सगळे आल्यानंतरच."
"ओके बाबा जशी तुमची इच्छा. पण तोपर्यंत काय करू मी. पेपर हल्ली वाचवासा वाटत नाही. कोरोनाच्या बातम्या वाचून घोर लागतो मनाला आणि टीव्हीवर पण तेच. कुठे होतो आपण आणि काय झालो आपण. एका विषाणुने आपले आरोग्य धोक्यात घातले. हा सगळा विचार केला की अनामिक अशी भीती वाटते मनाला. त्यापेक्षा मी मस्त गाणे ऐकतो. तेवढेच मनाला शांतता, सगळे आले की मला कळव."
"बरं."
"गुड मॉर्निंग मॉम."
"काय हे पहिली फ्रेश हो जा, सरळ काय किचनमध्ये शिरलीस. स्वच्छता वगैरे आहे की नाही..."
"हो गं बाई जाते, तुला माहित आहे आज खूप दिवसांनी वर्कआऊट केल्यावर खूप मस्त वाटतंय. बरं आई काय बनवलंस ब्रेकफास्टसाठी."
"तुम्ही बाप-लेक नुसते खाण्यात पटाईत, बरं माई-अप्पा दिसले येताना."
"नाही गं, अजून नाही आले वॉकवरून."
"खूप दिवसांनी गेले ना ते आल्यावर ब्रेकफास्ट करूया, तू फ्रेश होऊन ये."
"आता आणि फोन कुणाचा."
"गौरव."
"हॅलो काय रे?"
"आई थोडा उशीर होईल."
"अरे पण बाहेर काय चाललंय माहित आहे ना."
"हो गं आज खूप दिवसांनी खेळतो ना म्हणून आणि एक मॅच ठेवली."
"अरे पण."
"भिऊ नकोस मास्क वगैरे घालून आहे."
"बरं लवकर ये."
"अरे माई-अप्पा आलात."
"हो गं आज उशीर झाला ना यायला."
"अगं खूप दिवसांनी बाहेर पडलो ना मस्त वाटले फिरताना पण भीतीही होतीच."
"अहो मेहू ब्रेकफास्टसाठी या."
"हो आलो."
"हो आले."
"बरं चला ब्रेकफास्टसाठी."
"हे काय गौरव नाही आला."
"नाही अप्पा तो जरा उशिरा येणार म्हणून सांगितले."
"हे असं आहे, अप्पा सुरक्षेसाठी लॉकडाऊन केलेलं आणि आपण संपताच बिनधास्त बाहेर पडलो. पण अजून बाहेर धोका आहे."
"हे खरं आहे, आम्ही पण बघ ना बाहेर पडलो सिनियर सिटीझन असूनसुद्धा रिस्क घेतली. पण उद्यापासून घरातल्या घरात वाॅक. आज आम्ही बाहेर गेलो. पण दडपणाखाली बाहेर पहीलेसारखे दीर्घ श्वास घेऊ शकत नाही आपण. खरंच काय परिस्थिती आली."
"हो बरोबर आहे तुमचं, लॉकडाऊनमध्ये आपण इथेच करायचो वॉक."
"हो उद्यापासून घरातल्या घरात सेफ होम."
"अप्पा कित्येक दिवसांनी मी उद्या ऑफिसला जाणार, पण विचार येतो त्यांचं काय जे रोजगारावर जगत होते. त्यांचं तर भविष्य संकटात आलं, पायी गावात चालत जाणे वगैरे."
"हो रे लॉकडाऊन हा शब्द पाच अक्षरी असला तरी खूप काही दाखवून दिले."
"बाबा माहित आहे का शरयूच्या मामे भावाला जरा कुठे घराबाहेर पडला आणि त्याला पोलिसांकडून चोप मिळाला."
"बरोबर आहे ना मग. हे नियम कोणासाठी केले, आपल्यासाठी ना. मग कशाला तोडायचे आणि गरज नसताना कशाला हुशारी दाखवावी."
"हो खरं आहे तुझं आई."
"अगं वाटेत फुलवाली मिळालेली. आज एवढ्या दिवसांनी बिचारी बाहेर पडली. सांगत होती की, लॉकडाऊनच्या काळात तिला खूप त्रास झाला. घरातल्या सामानाची चणचण आणि पैसेपण नाही पदराला आणि तिचा तो नवरा म्हणे फक्त भांडणं करायचा बार बंद होते ना."
"काय कोणाचं नशीब असतं ना माई."
"पण लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात संसर्ग नियंत्रणात आले आणि आपले पर्यावरणसुद्धा."
"हो रे प्रदूषणामुळे आपल्या निसर्गाचे नुकसान खूप झालेले. महिन्यातून एकदा तरी एक दिवस लॉकडाऊन असायला पाहिजे. जेणेकरून या भार उचलणाऱ्या पृथ्वीला थोडा विश्राम नको..."
"अप्पा, पण आमचं कोण ऐकणार. नियम करणारे आपण आणि मोडणारेपण आपणच."
"बरोबर बोललास."
"तुमचं चर्चासत्र चालू राहू दे, पण मला सांगा आज जेवण काय करायचं."
"आई, आज मी करते. तू मला शिकवलं ना लॉकडाऊनच्या वेळी."
"बरं बाई आज किचन तुझं तेवढाच मला आराम."
"हो गं कर तू आराम. लॉकडाऊनमध्येसुद्धा तुला काही आराम नव्हता. तुझं आपलं दररोज चालू होतं. आम्ही मात्र लॉकडाऊन संपल्यावर पिंजऱ्यामधून बाहेर पडल्यासारखे पडलो. मी मदत करीन तुला."
"नको माई मी करिन. तू तो कँडी क्रश खेळ तुझ्या मोबाईलवर."
"कँडी क्रश हे काय."
"अहो अप्पा, मी आजीला गेम शिकवला. तिला पण कंटाळा येतो ना."
"वाह म्हणजे पिढीजात शिकवण झाली म्हणायची."
"हो अप्पा, बरोबर म्हणाला तुम्ही."
"हा बघा गौरव आला."
"आई मी फ्रेश होऊन येतो खूप भूक लागली."
"बरं ये लवकर."
"पण या लॉकडाऊनने खूप काही शिकवलं घराची एकता बांधून ठेवली. आता देवाकडे एकच मागणे, या रोगाला लवकरात लवकर पळवून लाव आणि घराची एकता भीतीनं न जगता आनंदात जगू दे."
(होय महाराजा सगळ्यांनी एकच सूर दिला)