आठवणींची जलधारा
आठवणींची जलधारा
"लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा"
संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात देवाला विनंती करीत आहेत, "हे पांडुरंगा, मला ह्या संसारातील जो व्यक्ती सर्वात लहान आहे त्याहून लहान बनव, तू मला लहानपण दे. बालपण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो. या काळात घडलेल्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात. लहानपणी व्यक्तीला काहीही चिंता नसते.काही जबाबदाऱ्या नसतात...फक्त स्वच्छंद आयुष्य जगायचं..खेळायचं..अभ्यास करायचा..
मी लहान असताना आम्ही वसईला राहत होतो..शाळेत घेऊन जाण्यासाठी एक रिक्षा यायची..मग आम्ही सगळे एकत्र शाळेत जायचो..मी तिसऱ्या किंवा चौथ्या इयत्तेत असेन तेव्हा एक प्रसंग घडला होता..पावसाळ्याचे दिवस होते. त्या दिवशी मी, माझी आई आणि माझा लहान भाऊ घरी एकटे होतो..सकाळपासून खूप जोराचा पाऊस सुरू होता..एका क्षणासाठी देखील थांबला नाही..संध्याकाळ झाली तरी पाऊस सुरूच होता..हळूहळू पाऊस इतका पडू लागला की आमच्या घरात कानाकोपऱ्यातून पाणी झिरपू लागलं..सर्व घरात पाणी भरू लागलं..आईने कपाटातले सर्व महत्वाची कागदपत्रे खराब होऊ नयेत म्हणून वरच्या कप्प्यात सांभाळून ठेवली..थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि पाणी ओसरू लागलं..मग मी आणि आईने घर साफ केलं..एव्हाना ७.३० - ८ वाजले...आईने ऑम्लेट पाव दिल आणि आम्ही जेवून घेतलं..८.३०च्या दरम्यान पुन्हा पाऊस सुरू झाला..पुन्हा पाणी घरात भरू लागलं..त्यात लाईट पण गेली..आम्ही तिघे खूप घाबरलो होतो..घरात पाणी वाढू लागल..आम्हाला काहीच सुचत नव्हतं..बाहेर जावं तर सगळीकडे पाणीच पाणी..मग पहिल्या मजल्यावरील एका कुटुंबाने आम्हा तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी थांबण्यास सांगितले..कसबस आम्ही तिघे बाहेर आलो आणि पहिल्या मजल्यावर गेलो..रात्रभर आम्ही तिथेच होतो..पहाटे चारच्या दरम्यान आम्ही घरी गेलो..घराची अवस्था खूप वाईट झाली होती..सगळीकडे चिखल झाला होता..पाणी ओसरून गेलं होतं..तेलाचा डबा आडवा होऊन सर्व तेल घरात सांडलं होतं..आई आणि मी मिळून घर साफ केलं.
आज इतक्या वर्षांनंतर ही हा प्रसंग अगदी काल घडल्यासारखा वाटतो..त्या दिवसापासून पाऊस म्हटलं की धडकी भरते..
मी पाचव्या - सहाव्या इयत्तेत असेन.. तेव्हा आम्ही प्रतिक्षा नगर, सायन येथे चाळीत राहत होतो.एकदा असाच खूप पाऊस पडला होता ..त्यावेळी सुद्धा आमच्या घरात पाणी शिरलं होत..सगळं घर खराब झालं होतं..आमच्या घराच्या वर एक झाड होते..कौलारू घर असल्याने दर पावसाळ्यात एक विशिष्ट प्रकारचा किडा झाडावरून आमच्या घरात पडायचा..आठवलं तरी किळस वाटते..
आमच्या शाळेत १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी महिन्यात १० दिवसीय शिबीर आयोजित केले जात असे .हे शिबीर सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत घेतले जात असे.. सकाळी वेळेत शाळेत येणे, जण गण मन आणि प्रार्थना म्हणून झाल्यावर अभ्यासाला लागणे, पेपर सोडवणे, पुन्हा अभ्यास करणे, दुपारी गणेश सभागृहात एकत्र सगळ्यांनी आपल्या घरून आलेला डब्बा खाणे पण त्या आधी वदनी कवळ घेता म्हणणे, पुन्हा आपल्या वर्गात जाऊन अभ्यास करणे, संध्याकाळी चहा आणि संध्याकाळी ७ वाजले कि वंदे मातरम झालं कि आपापल्या घरी जाणे असे या शिबिराचे स्वरूप असायचे..विद्यार्थ्यांकडून एकत्रितपणे जास्तीत जास्त अभ्यास व्हावा, हा या शिबिराचा उद्देश असतो.
या शिबिरात माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग आहे..शिबिर सुरू असताना आम्ही सगळे वर्गात अभ्यास करत होतो.आणि मधेच मी चहा साठी आणलेला पेला खाली पडला..त्यावेळी सर वर्गात होते..पेल्याच्या आवाजाने शांतता भंग झाली..मी गडबडीत पेला उचलला आणि पुन्हा तो माझ्या हातून पडला.. सर खूप रागावले..मी तर रडवेली झाले होते..मग सरांनीच मला हसवण्याचा प्रयत्न केला.. आता आठवलं तर हसूच येत..
शाळेत अभ्यासाशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी सुद्धा दिली जात असे.गणेशोत्सवात विद्यार्थी नृत्याचे कार्यक्रम सादर करत..मी सहाव्या इयत्तेत असताना नृत्यस्पर्धेत भाग घेतला होता..एका मराठी गाण्यावर आम्ही ४ विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले आणि त्यात आमचा दुसरा क्रमांक आला होता..तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला आणि दरवर्षी मी नृत्यस्पर्धेत भाग घेऊ लागले. शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात माजी विद्यार्थी मेळावा भरतो.सर्वच माजी विद्यार्थी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात..पुन्हा सगळे एकत्र येतात, खूप मज्जा करतात..पुन्हा आपापल्या वर्गात जाऊन आपल्या बाकावर बसतात..
लहान असताना मी फार लाजाळू होते..मला पटकन कोणाशी बोलता येत नसे..आत्मविश्वास नव्हता..अभ्यासात हुशार होते पण इतरांशी बोलायला त्यांच्यात मिसळायला भीती वाटायची.मराठी माध्यमातून शिकल्यामुळे इंग्रजीत बोलायला येत नसे... माझ्या या स्वभावामुळे पप्पांनी मला आत्मविश्वास वाढवण्यासाठी एका इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले..मी भीत भीतच तिकडे प्रवेश केला..तिकडे गेल्यावर सगळे इंग्रजीमधून बोलत होते..हे पाहून मी अजूनच घाबरले..एकतर आधीच आत्मविश्वास कमी आणि त्यात इंग्रजी बोलायचं..2 दिवस कसेबसे काढले..पण नंतर मी रडत रडत पप्पांना सांगितले की मला नाही जमणार..मग त्यांनी उरलेले पैसे परत देऊन टाकले..
वाणिज्य शाखेत पदवीधर झाल्यावर मी नोकरी करू लागले..नोकरी करत असताना मी इंग्रजी बोलण्याचा सराव करू लागले..त्याच काळात मी आईसोबत एका आध्यात्मिक संस्थेत जाऊ लागले..तिकडे गेल्यापासून माझ्यात हळूहळू आत्मविश्वास वाढू लागला..मी इतरांशी बोलायला , त्यांच्यात मिसळायला लागले..संस्थेत होणाऱ्या कार्यक्रमात मी सूत्रसंचालन करायचे.. व्यासपीठावर उभं राहून एवढ्या लोकांसमोर बोलायचे, हे केवळ आमच्या गुरूंच्या आशीर्वादामुळे शक्य झाले..मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे..
२०१४ मध्ये लग्न करून मुंबईहून पुण्यात आले...त्यामुळे पुण्यात मैत्रिणी कोणीच नव्हत्या.मला माझ्या मुंबईच्या मैत्रिणींची खूप आठवण यायची आणि दुसरे म्हणजे बाळासाठी मी माझी नोकरी सोडली होती.नुसते घरी बसून रहावे लागते म्हणून माझी खूप चिडचिड व्हायची.depression मध्ये गेले होते.जगण्याला काहीच अर्थ नाही असं वाटायचं.तेव्हा माझ्या ओळखीच्या महिलेने मला एका महिलांच्या ग्रुप मध्ये add केलं.मी आयुष्यभर तिची ऋणी राहीन...त्या ग्रुपने मला जगण्याची नवी उमेद दिली..नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.त्यातून मी माझा सिल्क थ्रेड ज्वेलरी बनवण्याचा व्यवसाय सुरु केला.खूप छान मैत्रिणी दिल्या.Fashion,makeup या गोष्टी आवडू लागल्या..माझं उदास मन प्रफुल्लित झालं..एका मैत्रिणीने माझं लिखाण वाचून अजून लिखाणासाठी प्रोत्साहित केलं...खूप वर्षांपूर्वी लिखाण केलं होतं...ते वृत्तपत्रात प्रकाशित पण झालं होतं..त्या प्रोत्साहनामुळे माझं ठप्प पडलेलं लिखाण पुन्हा सुरु झालं आहे...
आपल्या मनाच्या कप्प्यात अनेक आठवणी दडलेल्या असतात.. काही सुखद काही दुःखद..आपण कधीतरी निवांत बसलो की या आठवणी जाग्या होतात.एका स्पर्श न करता येणाऱ्या आभासी जगात नेतात..आठवणी कोणत्याही असो आपल्या डोळयांत पाणी नक्कीच येत..
जमिनीला भेगा पडलेल्या असताना मधूनच एखादे रोपटे उगवते आणि ते सोबत करतं धरतीला...तश्या असतात आठवणी..
मातीमध्ये पाण्याचा थेंब पडल्यावर आलेला मातीचा सुगंध..मन प्रसन्न करून टाकणारा..अश्या असतात आठवणी..
रणरणत्या उन्हात अंगाची काहिली झालेली असताना एखादी हवेची थंडगार झुळूक यावी अंग शहारून जावं तश्या असतात आठवणी..
घशाला कोरड पडलेली असताना पाणवठ्यावर पाणीरूपी अमृत प्राशन केल्यावर दिलासा मिळतो तश्या असतात आठवणी..
मोहक आणि सुंदर गुलाबाच्या फुलाला असलेल्या काट्यासारख्याही असतात आठवणी..आयुष्यभर टोचत राहतात..
कधीही न भरणाऱ्या जखमा अन वेदना देणाऱ्याही असतात आठवणी..
कधी आठवतो आईचा मायेचा स्पर्श,
परीक्षेत चांगले मार्क मिळाल्यावर बाबांनी केलेले कौतुक,
बहीण- भावासोबत केलेली मस्ती, भांडण...मग आईकडून खाल्लेला ओरडा,
मोठं झाल्यावर नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारातून आई बाबांसाठी आणलेली भेट,
लग्न ठरल्यानंतर पहिल्या भेटीत झालेली नजरानजर, हृदयाची वाढलेली धडधड,
नकळत अथवा जाणूनबुजून झालेला त्याचा पहिला स्पर्श,
लग्नसोहळा, पाठवणी..या आठवणींनी तर हमखास डोळ्यांच्या कडा पाणावतात..
आपले घर सोडून एका अनोळखी जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलेली धडपड,
आणि मग एक दिवस लागलेली मातृत्वाची चाहूल,
दर महिन्याला चेक अपला जाणं,
बाळाला पहिल्यांदा हालचाल करताना पाहणं,
ते आपल्यात आकार घेत आहे याचा अनुभव घेणं,
शरीरात झालेले बदल,खाण्यापिण्यात झालेले बदल
गरोदरपणात लागलेले डोहाळे,
आईने खाऊ घातलेले नवनवीन आणि पौष्टीक पदार्थ
साऱ्या सुखद आठवणी...
डिलिव्हरीचा त्रास सहन करतानाच बाळाला पाहण्यासाठी लागलेली ओढ,
त्याला हातात घेतल्यावर मिळालेला परमोच्च आनंद,
त्याला सांभाळताना झालेली मनाची स्थिती,
बाळाला हळूहळू मोठं होताना बघणं,
त्याच्या तोंडून आई ऐकणं,
त्याचा पहिला वाढदिवस,
त्याचे आजारपण, त्याची घरभर पसरलेली खेळणी,
त्याच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण,
कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी..
हल्ली आपण सगळे क्षण कॅमेरामध्ये टिपून ठेवू शकतो..कधी आठवण आली की फोटो बघू शकतो..किती सुलभ..पुन्हा ते क्षण जगू शकतो..त्याच्यासोबत हसू शकतो, रडू शकतो..
आठवणींची जलधारा अशीच बरसत राहू दे
अन माझ्या जगण्याला अर्थ मिळत राहू दे...
