आई
आई


बायकोच्या मृत्युनंतर मुलांची आबाळ होऊ नये म्हणुन दुसरं लग्न न करता रमेशने एकल पालकत्व निभावताना अनेक समस्यांचा सामना करत सर्व जवाबदाऱ्या अगदी चोख निभावल्या होत्या,पण !!!
खरी परीक्षा आज होती आज त्याच्या लाडकीच्या कपड्यांवर तो लाल डाग पाहिला आणि काय करावं काही सुचेना. त्याने बाजारात जाऊन सॅनिटरी पॅड आणले, लेकीशी कसं बोलावं कळत नव्हतं. तिच्याही डोळ्यात तो संकोच, अवघडलेपणा होता. पण इतकी वर्षे एक आई आणि बापाची भुमिका निभावताना तो बाप कमी आणि आई जास्त होता.
त्याने प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला,तशी ती त्याच्या कुशीत शिरून रडू लागली. इथे मनातलं व्यक्त व्हायला तिसऱ्या व्यक्तीची गरज भासली नाही कारण बापलेकीच्या नात्यात बाप कुठे नव्हताच होती ती फक्त आई!!!