वय वाढतं म्हणजे नक्की काय होतं
वय वाढतं म्हणजे नक्की काय होतं


काळ्याकुट्ट दाटीवाटीत
हळूच उगवतो पांढरा केस
प्रत्येक नवीन स्वप्नाभोवती
आखली जाते जबाबदाऱ्यांची वेस
माणसं येतात , माणसं जातात
जुनी नाती उघडतात नवं खातं
वय वाढतं म्हणजे
नक्की काय होतं ?
कधी गरजेपेक्षा जास्त पैसा
कधी बिलं भरायचे वांदे
भातुकलीचा खेळ मांडणारे हात
मोजतात घरातले बटाटे - कांदे
कळायच्या आधीच
सगळं अचानक घडतं
वय वाढतं म्हणजे
नक्की
काय होतं ?
कामाचा वाढता भार
आणि अपेक्षांचे डोंगर
यातही कुणी जपतात नाती
जरी बदलली शहरं
कधी एकाबरोबर पटतं
तर दुसऱ्याबरोबर मोडतं
वय वाढतं म्हणजे
नक्की काय होतं ?
शरीर जरी बदललं
तरी मन असतं लहान
गोष्ट नव्याने लिहिण्यासाठी
नव्या दिवसाचे नवे पान
काळ - ऋतूचं चक्र
नेहमीच का फिरतं ?
वय वाढतं म्हणजे
नक्की काय होतं ?