ती....
ती....
निळसर आकाशात सैरभैर धावणारे खट्याळ मेघ,
तुझ्या आठवांवरचं पांघरून काढून, दूरवर कुठेतरी निघून जातात.
त्यांच्या हालचाली पाहून घरट्याकडे बेभान धाव घेतात काही पाखरं.....
अंगाला झोंबणारा गारगार वारा रोमारोमात शहारे भरून जातो,
कुठेतरी पाऊस पडत असल्याचा संकेत असतो त्या गारव्यात.
बेभान झालेल्या मनाला आस लागते पहिल्या वहिल्या पावसाच्या भेटीची...
आठवतं आज ही जेव्हा तू एकदा भेटली होतीस अशाच एका रम्य सायंकाळी,
बोल फुटत नव्हता तुझ्या कोमल चाफेकळी ओठातून एकही.
अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटानं, घट्ट बिलगली होतीस तू मला....
मी ही नटखट पणे घट्ट आवळली होती ती मिठी, त्या अनपेक्षित स्पर्शातून मनातले भाव समजून घेण्यासाठी,
चिंब भिजलो होतो आपण दोघंही मृगातल्या त्या पहिल्या पावसात......
वसुंधरा ही पसरवत होती मनमोहक सुगंध मातीचा,
जणू त्या मिलन समारंभातील इत्रदानीतून फव्वारलेल्या इत्रासारखा....
आजही शोधतोय मी तुला, त्याच निळ्या आकाशा खाली पुन्हा एकदा कवेत घेऊन चिंब भिजण्यासाठी.
