STORYMIRROR

Shiva Chaudhary

Others

3  

Shiva Chaudhary

Others

दगड धोंडी मी कसा असणार बरं वेड्या

दगड धोंडी मी कसा असणार बरं वेड्या

1 min
28.2K


देव देव म्हणत म्हणत

शेंदूर लावू नगं गड्या,

दगड धोंडी मी कसा

असणार बरं वेड्या? 

कुणी लावतोय दिवे

कुणी जाळतोय धूप

तेला धूराच्या वासानं

त्रास होतोय रे खूप

नको जाळू तेला संग

अगरबत्तीच्या काड्या

दगड धोंडी मी कसा

असणार बरं वेड्या……

 कुणी आने पितांबर

कुणी भरजरी शालू

डोक्यावर ताज नको

नको कानी कुंडल घालू

यापरीस   गरजूंना दे

धोतर आणि साड्या

दगड धोंडी मी कसा

असणार बरं वेड्या……

 कुणी शिंपडीतो दहीभात

कुणी शिंपडी गो मूत्र

कुणी अंथरीतो पायघडी

कुणी देई सोन्याचं छत्र

वाया नको घालू दहीभातं

नको टाकू पायघड्या

दगड धोंडी मी कसा

असणार बरं वेड्या. 

कुठं अंगारा धुपारा

कुठं अबीर गुलाल

भेव दाखवून जनतेला

माझे पैदा झालेत दलाल

दलालीच्या पैशांवर

बांधू लागलेत माड्या

दगड धोंडी मी कसा

असणार बरं वेड्या……

 मनन कर चिंतन कर

डोकं वापरून बघ थोडं

माझ्या वाचून तुझं कधी

अडणार नाही घोडं

कर्मच तारी माणसाला

नाही भाटाच्या त्या पुड्या

दगड धोंडी मी कसा

असणार बरं वेड्या……

 


Rate this content
Log in