स्वातंत्र्य म्हणजे काय रं भाऊ
स्वातंत्र्य म्हणजे काय रं भाऊ
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश इंग्रजांच्या जोखडातुन मुक्त झाला. पण हे स्वातंत्र्य काय आपल्याला फुकट मिळालेले नाही. त्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुपुर्द केले. त्या संविधानात अनेक अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरीकाला मिळाले.
आज आपण आपले स्वातंत्र्य उपभोगतोय पण ते उपभोगत असताना मला नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे नेमकं स्वातंत्र्य म्हणजे काय रं भाऊ?
आपल्याला शाळेत एक प्रतिज्ञा म्हणुन घेतली जात होती. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत." पण हल्ली या प्रतिज्ञेत थोडा बदल करावा वाटतो. भारत माझा कधी कधी देश आहे.
याला कारण ही तसेच आहे. काल परवा आपण ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला प्रत्येकाने विविध तर्हेने देशप्रेम व्यक्त केले.पण मला खरं खरं सांगा सारे भारतीय माझे बांधव आहेत या उक्तीनुसार एखाद्या मुलीवर बलात्कार करताना कुणाला वाटत नाही का हो आपण सारे बांधव आहोत. जातीधर्मावरुन दंगली घडवताना कुणाला आठवत नाहीत का? हिंदु मुस्लिम शीख इसाई मिळुन सारे भाई भाई.. सध्या टोकियो अॉलिम्पिक मध्ये नीरज चोप्रा यांनी भालाफेकीत सुवर्णपदक मिळवले. त्यांचा अभिमान बाळगायचा सोडून आपण भारतीय वाद कशाचा घालतोय तर ते चोपडा आहेत, चोपडे आहेत. मग स्वातंत्र्य मिळालयं कुठं?
इंग्रजांच्या पारतंत्र्यातुन सुटून आपल्या दुषित विचारांच्या पारतंत्र्यात आपण अडकुन पडलोय. जुन्या काही अर्थ नसलेल्या चालिरीती, परंपरा, अंधश्रद्धा यांना कवळुन बसलो आहोत. स्त्रीभ्रुण हत्या या मुळे स्त्रीचा जगण्याचा अधिकार आपण हिरावून घेतोय मग कसलं स्वातंत्र्य आहे.एखादी बडी हिरोईन म्हणते भारतात मुली सुरक्षित नाहीत म्हणजे ही आपल्या देशाची सर्वात मोठी हार आहे.
स्वातंत्र्य म्हणजे "माय लाईफ माय रुल्स" म्हणत स्वमर्जीने वागणे नव्हे, असुरक्षिततेच्या जागी सुरक्षितता, अंधश्रद्धेच्या जागी श्रद्धा, अविचाराच्या जागी सुविचार, जातपात विसरुन समाजात माणूस म्हणून स्थान मिळवणे म्हणजे स्वातंत्र्य...
