श्रावण एक जीवनगाथा
श्रावण एक जीवनगाथा
तो श्रावण...... बालपणी भेटला
तेंव्हा...
तो हवा हवासा अगदी नवासा वाटला.....
आई-बाबांचा ओरडा झेलणारा,
सवंगड्यासोबत सर्वत्र नाचणारा,
अंगणातील मातीशी नाळ जोडणारा ....
थोडसा रुसलेला अन खुपसा हसलेला ..
येरे येरे ....म्हणता म्हणता
बालपणीचा श्रावण दूर दूर गेलेला....
पुन्हा तोच श्रावण तारुण्यात भेटला
तेंव्हा .....
तो श्रावण जुना असून नवा गुलाबी वाटला .....
कर्तव्ये अपेक्षा यांचे ओझे उचलणारा,
आई-बाप यांचे किरदार साकारणारा,
तारुण्याला उबारा देणारा-घेणारा,
थोडासा हसलेला अन खुपसा फसलेला...
नको नको..... म्हणता म्हणता
तारुण्यातला श्रावण सुद्धा दूर दूर गेलेला .......
वाढत्या वयासह माझ्या
पुन्हा तोच श्रावण म्हातारपणी सूर्यास्ता वेळी भेटला ......
तेंव्हा .....
तो श्रावण नवा-जुना असूनही मधाळ वाटला ...
एक एक नात्यातील मकरंद गोळा करणारा,
अंगणातील मातीचा गंध श्वासांनी मोजणारा,
अनंत वादळ वारे झेलुन दरातील प्राजक्त फुलवणारा,
खूप काही सांगूनही बरेचसे सांगणे राहून गेलेला ....
थोडासा हरलेला अन खुपसा दरवळलेला ...
बंद मुठीत विश्व फुलवणारा
श्रावण ....कोणासाठी ? का? आला
उमजत नाही.
जिवन मरणाच्या प्रवासात
रंगीन- सरीचे फलित काय ? कळत नाही.
आणि ..
श्रावणाला मातीशी जोडल्याशिवाय
श्रावणातील श्रावणी जन्मालाच येत नाही.
