शेतकरी म्हणावं...
शेतकरी म्हणावं...
नाही वाटत कोणाला शेतकरी व्हावं, काळजात ज्याच्या नेहमीच घाव
आहे त्याच्या वाट्याला दुःखच सदैव, दारिद्र्यात जन्मला हे त्याचं दुर्दैव
बारा महिने ज्याने मातीत राबावं, तरीही नाही त्याच्या पिकाला भाव
करुनी कष्ट जगाला जगवावं, अन्नदात्याने मात्र उपाशी मरावं
का यालाच आता शेतकरी म्हणावं...
कर्जांच्या समुद्रांत ज्याने बुडावं, सावकारकीने सतत त्याला छळावं
त्यातच भर निसर्गाने कोपावं, धगधगत्या उन्हात त्याने आयुष्यभर करपावं
योजनेचं पैसं पुढाऱ्याने हणावं, आश्वासनातच त्याने समाधान मानावं
हे देऊ ते देऊ नुसतंच म्हणावं, शेवटी मात्र त्याने रिकामाच राहावं
का यालाच आता शेतकरी म्हणावं...
त्यांच्या मुलांनी कधी न शिकावं, हातात विळा न दप्तर नुसतंच पाहावं
श्रीमंतांनी त्यांना गरीब म्हणून हिणवावं, अशिक्षित आहेत तर त्यांनाच फसवावं
पैशासाठी डॉक्टरांनी त्यांना दमवावं, भोंदूगिरीने आता त्यांनाच जखडावं
हुंड्यासाठी त्यांच्या मुलींना जाळावं, मुकाटपणे बिचाऱ्याने सार सहन करावं
का यालाच आता शेतकरी म्हणावं...
देशाला ज्याने शेतीप्रधान बनवावं, सरकारने मात्र दुर्लक्ष करावं
का बरं त्यानेच हे सारं भोगावं, मरेपर्यंत बिचाऱ्याने नुसतंच जगावं
बस झाली झोप आता वाटतं जागे व्हावं, आधुनिक शेती अन शेतकरी घडावं
खूप राहिलो मागे अाता थोडं पुढे जावं, पुन्हा एकदा हिरवंगार शेत बनवावं...
तेव्हाच अभिमानानं शेतकरी म्हणावं...
तेव्हाच अभिमानानं शेतकरी म्हणावं...
