रेशीमगाठी
रेशीमगाठी
आयुष्याच्या वळणावरती
पदोपदी जुळून येती नाती
बंध जुळता तयार होतात
धागे गुंफत रेशीमगाठी
लग्नाची प्रथम गाठ बांधता
दोन जीवांचे ते मधुमिलन
घेऊन आपल्या सभोवती
जपत अनेक नात्याचे बंध
सासू, सासरा, दीर, जावा
भाची, भाचे, नणंद, नंदावा
अनेक नात्यांचा हा मेळा
सांधला तर त्यात जिव्हाळा
तिखट, आंबट, गोड, जणू भेळ
बसवावा लागतो त्याचा मेळ
नाही जमला तर मग होतो
आयुष्याचा चांगलाच खेळ
मनधरणी नि मानपान देत
जपावी लागते सदा रीत-भात
ठेका, ताल, लय यांचे सुरेल गीत
फुलवावी लागते त्यातून प्रीत
सदा एकमेकांचे मीत बनती
संसार वेलीवर फुले बहरती
गोड नात्यांची घेत अनुभूती
आईची माया मनी जागती
जगाची असते हीच रीत
सह चालावे लागते सदोदित
अनेक नात्यांची गुंफत गाठ
विहरावे संसार सागरात
लपवून आसू ठेऊन ओठी हासू
संसार करावा लागतो कसून
जे कोणी या सुखास मुकले
आयुष्याचे त्यांचे गणित चुकले
अशी अनेक नात्यांच्या गाठी
सदा आपल्या सोबत राहती
पण स्वर्गातून बांधून येती
साता जन्माच्या रेशीमगाठी
