STORYMIRROR

Shubhada Bhangle

Others

4  

Shubhada Bhangle

Others

परिणय

परिणय

1 min
186

सोनपिवळा शालू लेऊनी

प्रियकराच्या मिलनाची

वाट पाही वसुंधराही

पूजा करिते गौरीहराची


लग्नमंडपी सगळे जमले

पक्षी, प्राणी, वेली अन फुले

कुणी घातले रंगीत शेले

प्रणयगितही कुणी गायिले


महूर्तवेळ समीप येता

सरसरली नभी सौदामिनी

साजणा च्या चाहुलीने

लाज लाजली अवघी अवनी


मेघ अश्वा वर आरूढ होऊन

नवरदेवाची स्वारी निघाली

मागे पुढती वाजे ताशा

वर्हाडमंडली नाचू लागली


मंगलाष्टके गाऊन होता

धवल धुक्याचा पडदा सरला

वरुणाने धरेच्या गळा घातली

शुभ्र मोत्यांची चमचम माळा


सप्तरंगी इंद्रधनू चे तोरण

नभोमंडपी कुणी बांधिले

ह्या शुभसमयी भाट सृष्टीचे

मंगल गाणी गाऊ लागले


डोंगरमाथा हळूच चुंबीता

अश्रू तृप्तीचे वाहू लागले

आनंदाने तुडुंब भरता

खळाळून निर्झरही हसले


एक एक तारका निघाली

पहावया वरुणाची राणी

अचानक मग वीज गरजली

नवरदेवाची खाष्ट करवली


काय वर्णावा हा सोहळा

वरुण-पृथ्वी च्या परिणयाचा

स्वर्गातूनही बरसत होता

वर्षाव किती स्तुती सुमनांचा


Rate this content
Log in