प्राजक्त
प्राजक्त
1 min
1.3K
हिरव्याकंच झाडावरती
जणू चांदण्या फुलती
किंवा केशरगंध लावूनी
शुभ्र उमलले मोती
सांजावल्या क्षणात
एकेक येई नक्षत्र
मोहक मादक दरवळ
पसरे दूर सर्वत्र
किती नाजूक कळ्या
पानांआड हसल्या
जशा स्वर्गातील अप्सरा
धरतीवर भासल्या
टपटप करूनी पडता
तयांना मिठीत घेई धरती
मायलेकीची होतसे भेट
प्रितीच्या सड्याला ये भरती
कुणी येता जाता सहज
ओंजळीत भरूनी घेई
हलकेच सुगंध घेता
मनचित्त प्रसन्न होई
श्वेत तलम पाकळ्या
अन देठ असे आरक्त
मंद परिमल लेवून
शोभतो किती प्राजक्त
