STORYMIRROR

Manohar Jadhav

Others

3  

Manohar Jadhav

Others

पाऊस थोडा झेलू गं

पाऊस थोडा झेलू गं

1 min
28.2K


थेंब टपोरे अस्सल ओले

पानांवरती बसले गं

हिरवे झाले रान मनाशी

हळूच गाली हसले गं


नटले सारे रान नेसले

हिरवाईचा शालू गं

पानांच्या बघ टोकांवरती

थेंब लागले डोलू गं


गवताचे हे अंकुर हिरवे

मातीमधुनी रुजले गं

जणू सोहळे गर्भवतीचे

जागोजागी सजले गं


भिजले अंगण भिजली माती

पागोळ्यांतुन धारा गं

मांडाच्या या रांगेमधुनी

सुसाट घुसला वारा गं


शेतकऱ्यांचे नांगर हलले

ढवळ्या पवळ्या भारी गं

चिखलामधुनी औत चालले

जशी पंढरी वारी गं


डोंगर भिजले सचैल न्हाले

खळखळ ओहळ वाणी गं

कडेकपारी नाचत फिरतो

पाऊस होऊन पाणी गं


दूर कशाला अशी उभी तू

मिठीत थोडे बोलू गं

आभाळाच्या खुल्या अंगणी

पाऊस थोडा झेलू गं


Rate this content
Log in