पाऊस आला पाऊस
पाऊस आला पाऊस
1 min
14K
पाऊस आला पाऊस
रिमझिम पाऊस
ठेऊ आता थोडा दूर
कंप्युटरचा माऊस
तेच तेच रोज रोज
शाँवरखाली नहाण
पावसामध्ये भिजण म्हणजे
शरदाच चांदण
चार भींती सोडून आता
ए.सी.मधून बाहेर पडू
वेशीमध्ये उभे राहून
गार गार वारा झेलू
फ्रिझरमधला बर्फ अन्
चांदणीसारख्या गारा
फरक त्या दोन्हीमधला
समजून आलाय खरा
बागेमध्ये लाँन लावले
बँकेतील लोन काढून
गवताचा तो मऊ गालीचा
गावाकडेच गेला राहून
हिरवीगर्द वनराई सोडून
सिमेंटच्या जंगलात आलोय
बोन्साय झाडामध्येच
वटवृक्ष शोधू लागलोय
साद घालतंय गाव मला
बालपण पुन्हा बोलवतंय
बेगडी जग सोडून ये
असं सारखं खुणावतंय
