ओठ ओले
ओठ ओले
असा गोड होता आज तुझा सहवास स्वप्नातला,
घड्याळाचा सहावरील काटा नऊवर येऊन सरला...
तोच करारी, अन तोच राकट बाणा,
जणू लोकांचा फेवरेट, अन् माझाच तो राणा...
रुंद छातीवर कान ठेऊन ठोके ऐकत हृदयातले,
थंडीचे कोरडे ओठ आज मात्र नकळत झाले ओले...
जरी शब्दांत नव्हती किंचितही काळजी,
ओळखली डोळ्यांनीच त्या डोळ्यांची...
बसले धरून तुझ्या त्या भरलेल्या दंडाला,
चिंता नुरली तेव्हा क्रूर जगापुढे या जीवाला...
मुठीत बांधावी निमिषे ती पळणारी,
मन आतल्याआत उगाचच आक्रोश करी...
समजावले समजदार मनाने या वेड्या मनाला,
म्हणूनच डावा खांदा तुझा नव्हता आज ओला...
घड्याळाचा सहावरील काटा नऊवर येऊन केव्हाचा सरला...
पण तरीही,
गोड होता आज तुझा सहवास स्वप्नातला...