ओढ पावसाची
ओढ पावसाची


कधी कधी पाऊस येतो तोच
मुळी वेड्या प्रेमवीरागत
झोडपून घालतो धुडगूस
करण्याच्या आतच स्वागत।।1।।
कधी मात्र असा बरसतो
येतच राहतो संततधार
हुरहूर जीवाला लावून
घेऊन जातो आठवणीपार।।2।।
कधीतरी गाताना अवखळ
टिपटिप झिम्मडगाणी
थेंब टपोरे करिती नर्तन
ताल धरून पानोपानी।।3।।
रुसून कधी बसला मात्र
पाणी साऱ्यांच्या तोंडचे पळते
अगतिक हताश सगळे
तुझ्या येण्याची किंमत कळते।।4।।
पावसाचे रूप असले कसेही
माझ्या मनाला कायमच भावते
आतुर असते भेटीला त्याच्याच
चाहूल लागता भेटीला धावते।।5।।