मनाचा डोह...
मनाचा डोह...
मनाचा डोह किती अथांग,
किती अनाकलनीय,किती गूढ,
लागत नाही कधीच याचा,
ठावठिकाणा,
वरून शांत दिसणारा मनाचा डोह,
अंतरंगात घेऊन असतो,
विचारांची आवर्तन,घालमेल,
निर्णयाची दोलायमानता, आणखी बरंच काही....
दुस-याचं मन जाणण्याची ओढ असणारी मी,
बघावं म्हंटलं माझ्याच मनाच्या डोहात डोकावून,
दिसेल का मला माझ्यातली मी,
दिसेल का मला अपेक्षांचं ओझं घेऊन फरफटत जाणारी मी,
दिसेल का मला माझ्यातल्या हळवेपणाचा कंगोरा,
दिसेल का मला माझ्या पापणीवरून कधीही ओघळणा-या अश्रू
ंचं रहस्य,
ढवळून काढला मी माझ्या मनाचा डोह,
पण यातलं काहीच कसं दिसलं नाही,
निराशेच्या खोल गर्तेत स्वतःला झोकून देतानाच,
माझ्याच मनाच्या कोप-यात बसून माझ्याकडे बघून हसणारा आशेचा किरण दिसला,
मला म्हणाला "वेडी आहेस का तू,असा कसा लागेल थांग तुलाच तुझ्या मनाचा,
मनाचं अंतरंग जाणण्याचा हट्ट सोडून दे,
आणि घे भरारी त्या मनाच्या बाहेर असणा-या जगात,
तिथं असेल तुला समजून घेणारं कुणीतरी,
तिथं असेल तुझं मन जाणणारं कुणीतरी,
तिथं असेल तुझा ओघळणारा अश्रू पुसणारं कुणीतरी..।।।