मन विचार पुंजका
मन विचार पुंजका
मन पाखरू वेल्हाळ
उंच उडतो आकाशी |
मेघासवे खेळूनिया
छान काढतो नकाशी ||१||
मन उमंग तरंग
फिरे इकड़े तिकड़े |
जातो क्षणात कुठेही
क्षणातच चोहीकडे ||२||
मन जोहरी स्वच्छंदी
जसा निसर्ग पारखा |
नभी मेघांना पाहून
नाचे मयुर सारखा ||३||
मन विचार पुंजका
राही आनंदात मग्न |
दुःख येताच जीवनी
मग होत असे भग्न ||४||
मन चंचल अस्थिर
नसे कधी धाऱ्यावर |
जाई पहाता पहाता
भ्रमणास ताऱ्यावर ||५||
मन उधाण वाऱ्याचे
जशी भयान भरती |
लाटा खवळती खूप
निळ्या सागरा वरती ||६||