माहेराची ओढ
माहेराची ओढ


हाती बांधलं काकण जेव्हा पदरास गाठ,
नाती नव्याने मिळाली, एक सासर -माहेर.
माझ्या नावाला परकं एका क्षणात अंगण,'घर' क्षणात 'माहेर' झालं ओलांडता दार.
कधी रुसणं, हसणं,कधी दारात रिंगण,
कधी भावंडाचा खेळ, कधी मैत्रीचा जागर.
कधी बोटाचा आधार, कधी मायेचा पदर,साऱ्या आठवांचं सार, माझ्या लाडाचं माहेर.
येतो आषाढ-श्रावण माझ्या अंगणात झुले,
गौरी गणेशा चा सण ओढ माहेराची वाढे.
दिवाळीची रोशनाई माझे मन उजळिते,माझ्या आधी माझे मन माझ्या माहेरा पोहोचते.
वेगे घड्याळ फिरते कौतुकात दिनरात,चार दिवसांत सरलं,
कसा मायेचा सागर.मनी दाटलेली प्रीत जरी खुणवी संसार,वात्सल्यात गुंतलेला कसा सोडवू पदर.
सारं काही सावरावे, दिवस निघायचा येता,पहावे वळूनी,
पुन्हा पुन्हा जाता जाता.दिवसांचे गणित पुन्हा मनी आठवता पुन्हा येईल सांगावे आसू डोळ्यात हसता.
'उभे राहण्या लाडके जरी तुला माझा हात,
जन्मभराची देशील तुझ्या सासरला साथ,
साऱ्या दुःखाला फुंकर वाट तुझ्या माहेराची.'माहेरची शिकवण, रीत निराळी जगाची.
माझ्या माहेरच्या ऋणा कशी होउ उतराई,
राहो अखंड मनात नको पडाया विसर.
ऋण चुकवाया थोडं, एक मनात विचार, सखे मी गं सजविन माझ्या लेकीच माहेर..
सखे मी गं सजविन माझ्या लेकीच माहेर..