कार्यकर्ता
कार्यकर्ता
गळ्यात पक्ष्याचा रुमाल टाकून
उन्हा पावसात दिनरात्र फिरतो
घरदार मुलं बाळ सोडून तू
साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मिरवतो
प्रचाराच्या मोर्चात साहेबांनी
दोनशेचे पेट्रोल काय भरले
तुझ्यासहीत अनेक जणांचे
काळीज त्यांनी जिंकले
प्रत्येकाचा साहेब वेगळा
प्रत्येकाचे झेंडे वेगळे
झेंडा अन् साहेबांच्या गर्दीत
भावकीतच भांडले सगळे
विकास तुला साहेबांच्या
भाषणातच फक्त भेटला
साहेबांच्या प्रेमात नेहमी तू
घराच्या प्रगतीला विसरला
नोकरीस मला लावेल साहेब
अस जगाला तू सदा सांगतो
साहेबांसाठी तू घर विकले
नोकरीसाठी शेती विकावी म्हणतो
साहेबांनी उठ म्हणलं की उठला
बस म्हणलं की तू बसला
साहेबांच्या आंदोलनात तू
जेलात पण बऱ्याचदा गेला
निवडनुकीत पक्षासाठी
चप्पल तुटेपर्यंत फिरला
जिंकून आल्यावर साहेबांनी
तुला फक्त ठेंगाच दाखवला
साहेबांचं एवढं सारं प्रेम
कोणालाच कधी भेटलं नाही
इतका सत्यानाश होईपर्यंत
तुला काहीच कसं कळलं नाही
