हसला श्रावण मनात
हसला श्रावण मनात
1 min
73
सरीवर सरी बरसल्या लहरी श्रावणसरी
नादखुळा श्रावण चराचरातून वाहिला अवनीवरी...
डोंगरमाथ्यावरुन खळाळतं पाणी लोटांगण घालीत धावलं
धरेच्या कुशीत हिरवं रान ओलेचिंब झालं...
मोकळा होत अंतरीचा श्वास गुंतलेला
हृदयातील औदार्याचा भावनेला वेध कळला...
गगन निवळता रंगबावरे क्षितिजावरी
ललाटकमळे असंख्य फुलली जलावरी...
चमचमती शुभ्र मऊ मेघ विहरले मौजेत
पवन चंदनी गंधाळला सभोवार मदमस्तीत...
भरून सृष्टीचे तव अंतरंग हृदयात
दाटून घनगर्द हिरवा श्रावण हसला मनात...
नटली सजली तोरण बांधून दारी उभी राहिली
श्रावणाने आम्हा सवाष्णीची अखंड ओटी भरली...
तुझ्या सौभाग्याचे शृंगारीले मी पायी पैंजण
उत्सवाच्या गोतावळ्यात तरुण झाले माझे सुखांगण...
