STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Others

2  

Mrs. Mangla Borkar

Others

हरवलं ते सुंदर बालपण…

हरवलं ते सुंदर बालपण…

1 min
97

लाटेने की काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला?


भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…


हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,


इवलुश्या मार्कांच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….


गेले कुठे ते चालताना “पॅकपॅक” आवाज करणारे पायातले बूट?


“मी नाही देणार जा माझं चॉकलेट” म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ….


किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?


ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत…


हरवला तो प्रेमाचा घास….”चिऊताई” दाखवत आईने भरवलेला…


घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?


गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?


छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस….


गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?


हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?


धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?


शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?


झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?


अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?


कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????


हरवलं त्यात ते सुंदर बालपण…


Rate this content
Log in