हात काय धरता
हात काय धरता
कुण्या वाटेणं जाऊ घरीही, का वाटेत आडवा येता
लाज धरा की जनाची मनाची खुशाल हात का धरता llधृll
छबीदार सुरत देखणी मी नार
वय नाही हो पाव्हण माझे फार...
नका नजरेचा करु तुम्ही वार
काळजात घुसे कट्यार आरपार
पाव्हण कशाला लाडीगोडी तुम्ही अशी लावता
लाज धरा की जनाची मनाची खुशाल हात का धरता ll१ll
माझी कोमल नाजुक अशी काया
गोऱ्या अंगी लाली चढं हो राया..
पाखरागत तुम्ही लागं भिरभिराया
सोडा मजला तुमच्या पडते पाया
खाणाखुणा करून कशाला छेडाछेडी तुम्ही अशी करता
लाज धरा जनाची मनाची खुशाल हात का धरता ll२ll
जाऊद्या मला अशी धरू वाट
सांज झाली अवघड हाय हा घाट
कंचुकी अंगा हो मज दाट....
उभं हाय तुम्ही अडव येऊन ताठ
मलमली ही काया विपरीत नको घडायला
पाव्हण कशाला रोखून असे बघता
लाज धरा की जनाची मनाची खुशाल हात का धरता ll३ll
