दशक नव्वदचे (अनोखे वेड)
दशक नव्वदचे (अनोखे वेड)
क्षण ते अनमोल आयुष्याचे सुंदर निरागस,कुतूहलाचे..
कृत्रिमतेच नाही झालर, वरदान ते निसर्गाचे..
ते बालपण, सखे सोबती खेळ खेळती बाग अंगणी
दूरदर्शन, आकाशवाणी ओढ त्या दूर्मिळतेचे.....
उत्साहपुर्वक अनोखे वेड त्या 90 च्या दशकाचे.....
लंगडी, कबड्डी, खो-खो खेळ तो सुर पारंबी लपंडावाचा...
गावातल्या त्या गुरुजीं सोबत आनंद वेगळाच त्या शाळेचा..
वेळेवर गृहपाठ आणि हजेरी वातावरण ते भीतीचे...
उत्साहपूर्वक अनोखे वेड त्या 90 च्या दशकाचे.....
पंगत ठरवून जेवणाची क्षण तो एकमेकास पदार्थ वाटण्याचा....
दोन घास ते जरा जास्तीचे पण क्षण तो खळखळून हसण्याचा...
तांदळाची पिशवी, दुधाचा पेला दिवस ते शाळेचे.....
उत्साहपूर्वक अनोखे वेड त्या 90 च्या दशकात चे....
लिज्जत पापड कुर्रम् कुर्रम् करत चेष्टा ती मित्रांची....
शक्तिमान अन् सोनपरी होऊन इच्छा ती दुष्टांना संपवण्याची...
चित्रपट, जाहिरात, मालिका नव्हे केवळ मनोरंजन धडे ते मार्गदर्शनाचे...
उत्साहपूर्वक अनोखे वेड त्या 90 च्या दशकाचे...
उन्हाळी सुट्टी खुणवत होती मज्जा मस्ती गाव ते मामाचे..
काही दिवसांनी "मी" येईन असं म्हणून निरोप देताना दर्शन घडते "आईच्या" मनाचे....
छोटी पायवाट, ओहोळ-ओढे किती अन् काय सांगू क्षण ते सुखाचे...
उत्साहपूर्वक अनोखी वेड त्या 90 च्या दशकाचे...
मोठी माणसे जणू छोट्यांसमान, वातावरण ते आपुलकीचे..
वाढदिवसाला लावून व्हिडिओ चित्रपटाचा, शुभेच्छांसह आनंद साजरा करताना दिसे वेगळेच रूप गावाच्या एकीचे....
आधुनिकतेकडे वळणारा वेगळाच होता काळ तो, हवाई जहाज आकाशी पाहून मनी स्वप्न उडण्याचे..
उत्साहपुर्वक अनोखे वेड त्या 90 च्या दशकाचे....
गाव ते निराळेच मज्जा ती हनुमान जयंती, गोकुळाष्टमीची...
जिद्द, चुरस, पहिला नंबर काढण्यास आस त्या गावातल्या नृत्य नाट्य स्पर्धेची...
माझे, तुमचे, सर्वांचे बालपण ते आनंदाचे...
पण मौज -मस्ती, आनंद, शिकवण ,मार्गदर्शन एक वेगळेच वैशिष्ट या दशकाचे....
या सर्व अनुभवाचे साक्षीदार ते ज्यांचे बालपण 90 दशकाचे..
उत्साहपूर्वक अनोखे वेड त्या 90 च्या दशकाचे...