चैत्रपालवी
चैत्रपालवी
1 min
27.7K
सौंदर्यवती हि सृष्टी, साखर झोपे मधुनी उठली ,
टाकून कात मग नटली , बघ चैत्रपालवी फुटली !
फाल्गुनाच्या रंगांमधुनी हि नुकतीच न्हाऊन निघाली ,
गुलमोहोराच्या तप्त फुलांसह मग चैत्रपालवी फुटली !
सृष्टीच्या तनू वरतूनी , ऋतुराजाने फिरविली ,
अलवार जादूची काडी , बघ चैत्रपालवी फुटली !
ह्या ऋतूबदलाची आली , कोकिळेस कुणकुण कानी ,
मग तारसप्तकामधली हि तान पहा छेडिली ,बघ चैत्रपालवी फुटली !
येता वसंत वसुधेवरती , हि अंग अंग उमलली ,
बसता भ्रमर फुलांच्या गाली , बघ चैत्रपालवी फुटली !
नववर्षाच्या चाहुली , गृहिणींची लगबग झाली ,
मग गुढ्या तोरणे सजली , बघ चैत्रपालवी फुटली !
बघ चैत्रपालवी फुटली !!!
