धोरण
धोरण


बाप द्यायचा दाखला
धोरणी माणसांचा
जेव्हा काकरं सोडून चालायचा
माझ्यातला बैल
नाहीच आला काबूत तर
टोचायचा पुराणीनं
आणायचा वठणीवर
ठरलेलं विश्वासाचं सूत्र
परंपरेन आलेलं...
कोरडवाहूच्या वाहिवाटेन चालतांना
पुरता गेलाय उन्मळून...
खूपदा थांबतो झाडापाशी रात्री-अपरात्री
पूर्ण तयारीनिशी...
अगतिकतेतही दिसतो त्याला
माझ्यातल्या आशेचा अंकूर
दूर ठेऊ लागलाय वावरापासून
जपतोय मला... नासवणाऱ्या तणापासून
धास्तावून विचारतोय
माझ्या डोळ्यातील त्याच्या स्वप्नांविषयी
आता देत नाही कुठलाच दाखला
अन् धजावतही नाही
पुराणी टोचायला...
मनोमन जाणून घेतलीय त्याने
बदललेल्या धोरणातील जीवघेणी फसगत...