मातीच स्वप्न
मातीच स्वप्न
लहानपणी विनायक यायचा माझ्याघरी गणपती बनवायला, त्याला रंग द्यायला.
त्याचे ते छोटेसे हात नेहमी मातीने भरलेले असायचे .सगळ्या कपड्याना माती लागलेली असायची.
त्याला खूप आवडायचे गणपती बनवणे, त्याला रंग रंगोटी करणे.
सकाळ झाली की , त्याच सुरु व्हायचं, काका माती भिजवू का , ब्रश आणू का, कसा गोळा बनवायचा, कसा आकार द्यायचा असे अनेक प्रश्न विचारायचा.
पण त्याच्या वडिलांना अजिबात आवडत नसे.कारण खूप शिकवून त्याला मोठं करायचं त्यांचं स्वप्न होत.
पण त्याला मातीच्या मुर्त्या बनवायच्या आणि त्याला छान रंगरंगोटी करायची आवड होती.
पण त्याचे स्वप्न मात्र मातीतच विरून गेले.अकरावी बारावी खूप अभ्यास होता.विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता ना?वडिलांच्या आग्रहाखातर.
त्यामुळे हल्ली विनायक आता घराकडे फिरत नसे.काकांना मात्र सारखे त्याच्या आवाजाचे भास व्हायचे.
एकदा खूप वर्षांनी काका असा आवाज आला.त्यांनी बघितले तेव्हा विनायक एका मुलाला घेऊन त्यांच्याकडे आला होता.
काका हा माझा मुलगा हेरंब हा पेंटर आहे.
त्याला रंगरगोटीची खूप आवड आहे.आणि चित्रकलादेखील छान आहे.मला तर माझ्या वडिलांनी खूप मोठा अभियंता बनवलं.
पण मी याला तुमच्या हाताखाली शिकण्यासाठी पाठवत आहे कारण माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हे ऐकून काकाही खूप खुश झाले.
कारण लहानपणीच्या विनायकाचे
मातीचे स्वप्न आता हेरंब पूर्ण करणार होता.
