तृष्णा अजुनही अतृप्त - भाग २
तृष्णा अजुनही अतृप्त - भाग २


ती बाल्कनीतून एकटक बाहेर पाहत होती. खाली गार्डनमध्ये खेळणारी मुलं तिला नेहमीच सुखावत. सर्व झुडूपांवर उमललेली फुल आणि दुडूदुडू धावत खेळणारी मुल दोन्ही सारखीच. कधी कधी तीही त्यांच्यासोबत खेळायला जाई. त्याच्यात रमून जाताना आपला आयुष्यात काय चाललंय हे ती विसरून जाऊन पुन्हा लहान मूल होऊन जाई... काश माझं पण बाळ असेल अस.... नुसत्या कल्पनेनेच ती लाजली. तिच्या कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या. आपल्याच धुंदीत शरमुन तिने आपले डोळे बंद केले. तिला आपल्या डोळ्यांवर गरम श्वास जाणवले. लगोलग तिच्या माथ्याचे चुंबनही घेतले गेले. तिला आतून भरून आल. त्या ओल्या स्पर्शाने ती शहारली..... कसं कळत ह्याला माझ्या मनातलं... त्याच्या स्पर्श तिच्या अंगभर फिरत होता. ती ही बेभान होऊन त्या स्पर्शात विरघळून जात होती. धावत आलेला अनय काहीतरी विचित्र वाटून दाराशी थबकला. साऱ्या वातावरणात हाड गोठवणारी थंडी व कापसाच्या पुंजक्यासारखं सफेद धुक पसरलं होत. थंडगार धुक्यात बेडवर तीच विवस्त्र शरीर तडफडत होत. तिचे उंचावणारे हात कोणाला तरी कवेत घेत होते. अंगात लहरणाऱ्या सुखाच्या लहरींनी नकळत तिच्या तोंडून हुंकार बाहेर पडत होते. समोरच दृष्य पाहून अनय जागेवरच स्तब्ध झाला. आपली पत्नी अश्या अवस्थेत बघून त्याचे अवसान गळून गेले होते. त्याच्या काळजाचे ठोके कित्येक पटीने वाढले. थरथरनाऱ्या हाताने त्याने भिंतीला पकडले. त्याच्या नजरेला अचानक जाणवलं की धुक्याचा आकार वाढत आहे. ह्या क्षणाला पळून जावं की तिला वाचवावं ह्या द्विधा मनःस्थितीत त्याला काहीच सुचेना. एव्हाना त्या धुक्याने त्याला चहोबाजूने घेरून टाकले होते. थंड वाऱ्याच्या झोताने तो थरथरत होता. ती थंडी असह्य होती मानवी शरीराला न झेपण्याएवढी. धुक्यात अडकल्याने त्याला समोरचं काहीच दिसेना. तो बधीर झाला होता.
त्याने हातपाय हलवायचा प्रयत्न केला परंतु त्याच्या शरीराचा कोणताच अवयव हालचाल करेना. शरीराने जणू त्याची साथ सोडली होती. एकाच जागी उभ्या उभ्या गोठून त्याचा पुतळा झाला होता. श्वासांचा वेग बराच मंदावला. खूप कष्टाने तो श्वास घेत होता. आता सगळ संपलं होत. बंद डोळ्याआड तो तिच्यासोबत घालवलेले काही क्षण आठवत होता. त्या क्षणांचा आठवणीने त्याच्या पापण्यांतून अश्रू वाहू लागले. सप्तपदीच्यावेळी दिल्या वचनांनी त्याच्या मेंदूत गर्दी केली... परंतु त्यातील कोणतंच वचन त्याला पूर्ण करता आल नव्हतं...एक पती म्हणून कमी पडल्याची खंत त्याच्या मनात दाटली... दुःखावेगात त्याला शेवटचा श्वासही घ्यायला जमेना.... ह्या जन्मात कदाचित त्यांची इतकीच साथ असावी....
चहूबाजूंनी गडद काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरण ढगाळ असल्याने चंद्राने काळया ढगांच्या मागे दडी मारली होती. आकाशात नावाला एकही चांदणी लुकलुकत नव्हती. सगळीकडे नुसता मिट्ट काळोख होता... एखाद्या कृष्णविवराप्रमाणे... अशात पायाखालची वाट कुठली समजायला. त्यातच वारा अगदी वैऱ्यासारखा पाठराखण करत होता. वाऱ्याच्या थंडगार स्पर्शाने झाडाची पाने घाबरून सळसळ करत होती. पायाखालच्या पाचोळ्याची करकर दबून आपलं अस्तित्व दाखवून देत होती. मध्येच मागून एखादी खुसफुस ऐकू येई.. त्याकडे कान टवकारले तर दुसरीकडून एखादी जीवघेणी किंचाळी काळीज फाडून टाके. चोहीकडून चित्र विचित्र प्राण्यांचे रडणे चालू होते मधेच काहीतरी चालताना पायात घुटमळून जाई. त्यात तोल सावरावा तर अचानक पाठीवर एखादा थंडगार स्पर्श वळवळत खाली उतरे. चालता चालता अचानक डोळ्यासमोर एखादी विचित्र भयानक आकृती आकार घेई. त्याला भास समजून दुर्लक्ष करावं तर बाजूलाच उभा राहिलेला दुसरा आकार त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देई. पाऊल पुढे टाकावं तर जमीन सरकल्याचा भास होई. घाबरून मागे सरकाव तर एखाद्या डोहात पडल्यासारखं वाटे. चालताना हजारो इंगळ्यांनी डंख मारल्यासारखं सार शरीर ठसठसून आपण दमल्याच सूचित करत होत. सार वातावरण अगदी जीव गुदमरून टाकणार होत. ह्याच्या पार पोचायला केवळ मनाचे चक्षु उघडे असावे लागतात. बाह्यजगात पसरलेल्या काळोखाला आपल्या आतल्या आत्मविश्वासाची ज्योतच भेदू शकते हे त्याला पक्क ठावूक होत. तो शांतपणे मनात काहीही विचार न करता केवळ मंत्रजाप करत एकाच वेगाने रस्ता कापत होता. येवढ्या अंधारात तो नक्की कुठे चाललाय हे त्याचं त्याला कळत नव्हतं. स्वप्नात येऊन कोणीतरी सूचना केली होती आणि त्याच्याच भरोश्यावर त्याने ही वाट पकडली होती. परंतु त्याला विश्वास होता की इच्छित स्थळी नक्कीच पोचू मात्र त्याच्यासाठी ह्या मायाजाळातून न फसता चालत राहायचं होत. त्याची रोजची ध्यान साधना त्याला त्याच मन स्थिर ठेवायला मदत करत होती...
"ओम... बेटा तिथे कुठे चाललायस...." मागून एक ओळखीचा आवाज घुमला.
"अरेच्चा.... गुरुजी..." गुरुजींनीच त्याला दीक्षा प्रदान केली होती. मागच्या त्याच्या भटकंती दरम्यान तो वाट चुकून ह्या ओसाड गावात आला होता. अगदी घडवून आणावी तशी त्यांची भेट घडली. पुढे जे घडत गेलं ते त्याला काहीच आठवत नव्हतं. क्षणात तो गुरुजींचा अनुयायी बनून गेला. त्याच वेळी त्यांनी सांगितलेल की एक वेळ अशी येईल जेव्हा तुला काहीतरी अनाहुताची चाहूल लागेल. ज्या संकटाचा कोणाला भासही नसेल ते तुझ्या मनाच्या परिघाभोवती घिरट्या घालू लागेल. तीच वेळ असेल तुझ्या लढ्याची.... त्या वेळी ही दीक्षा तुलाच का दिली गेली ह्याचही कारण मिळेल.... कदाचित गुरुजींना भविष्याची चाहूल लागली होती... पण गुरुजी इथे... आता.... शीट... नक्की गुरुजीच आहेत ना..?... त्याच्या पोटात खड्डा पडला. भीतीची एक थंड लहर सरसरत त्याच्या अंगातून लहरली..... ही सगळी माया तर नसावी... त्याने मनाला विचारांच्या तंद्रीत बेछूट दौडत होत... ह्यातून निघायचं कसं...?.. त्याच हृदय जोराने धडधडू लागल. अंगावरील केस भीतीने ताठ उभे राहिले. कानांवरून घामाचा एक थंडगार ओघळ उतरला.... परंतु त्याच्या मनात काहीतरी तरंग उठले...तो शांत झाला. त्याच धडधडणार हृदय शांत झाल. स्वतःशीच हसत तो मनाशी पुटपुटला.... हा सुद्धा एक लढाच आहे आणि त्याच्या आतापर्यंतच्या साधनेची कसोटी. त्याने आपले दोन्ही डोळे मिटले. काहीतरी आठवत आपल्या ओठांनी हलकेच कसलेसे मंत्र पुटपुटले. तेवढ्या मंत्रोच्चाराने त्याचे शरीर थरारून उठले. आपल्या उजव्या हाताच्या मुठीत त्याने गळ्यातील लॉकेट घट्ट पकडल. तळव्याला त्या स्फटिकाच्या खड्याचा स्पर्श होताच त्याच्या शरीरात एक संवेदना प्रसरण पावली. दीर्घ श्वास घेत त्याने एक खास मंत्र जपायला सुरुवात केली... प्रत्येक उच्चारासोबत त्याच्या गळ्यातील लॉकेट प्रकाशित होत होत. त्यातून फिकट पिवळसर प्रकाश सभोवार फेकला जात होता. तो प्रकाश हळू हळू त्याच्या भोवती पसरू लागला. तो स्वतःच त्या प्रकाशाने दिपून गेला. जसा जसा तो प्रकाश त्याच्या शरीराला वेधत होता तशी तशी त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती. त्याचा चेहरा पिवळसर प्रकाशाने चमकून उठला. त्याच्याही नकळत तो एका अत्यंत प्राचीन भाषेतील मंत्र उच्चारू लागला. " मागे वळू नकोस.." त्याच्या कानात कुजबुज झाली. " फक्त पुढे चालत रहा. योग्य मार्गावर आहेस.." हा आवाज गुरुजींचा होता.
प्रकाशाच्या तेजाने एव्हाना आजूबाजूच्या सर्व शक्ती बधीर होऊन क्षीण पडल्या. आतापर्यंत भेसूर आणि अंगावर काटा आणणारे आवाज ते प्रकाशाचं दैदिप्यमान वलय पार करून त्याच्यापर्यंत पोचत नव्हते. त्या भारलेल्या प्रदेशातील एकही शक्ती ते अद्भुत वलयासमोर टिकाव धरू शकत नव्हती. त्याच्या डोळ्याना त्या पारदर्शी वलयातून केवळ योग्य ती पायवाट दिसत होती. एका ठिकाणी येऊन ती पायवाट संपून गेली. समोर एक सुकलेले वेडेवाकडे झाडं आपल्या लांबलचक वाळक्या फांद्या पसरून उभे होते. त्याच्या कवचाच्या पिवळ्या प्रकाशात झाडाच्या सुकल्या खोडावरच्या रेषा भेसूर हसल्या सारख्या भासत होत्या. त्याच्या अणकुचीदार नखांसारख्या पसरलेल्या फांद्यांवर चार पाच पाने उगाचच नाईलाजाने फडफडत होती. हा तोच वृक्ष होता जो त्याने स्वप्नात पहिला होता. आपले दोन्ही तळवे जुळवून त्याने झाडाला वंदन केले. जोडलेले हात तसेच डोक्यावर उंचावून तो डाव्या पायावर भार देत उभा राहिला. उजवा पाय दुमडून त्याने डाव्या पायाच्या गुढग्यावर ठेवला. डोळे मिटून त्याने एक खोल श्वास घेत उच्च स्वरात ' ओम ' उच्चारला. त्याचा आवाज अख्ख्या आसमंतात घुमला. ओंकाराच्या ध्वनीलहरी तिथल्या नकारात्मक ऊर्जेला शोषून घेऊ लागल्या. ओमच्या उतरत्या स्वरासोबत वाऱ्याची जोरदार वावटळ उठली. पायाखालचा पाला,पाचोळा, माती त्या वावटळीवर स्वार होऊन त्यांनी झाडाभोवती फेर धरला. वावटळीचा लोट गोलाकार फिरत झाडाच्या शेंड्यापर्यंत पोचून धबधब्यासारखा वेगात खाली कोसळला. त्या पाठोपाठ कडकड आवाज करत ते वाळलेल झाड मधोमध दुभंगल. इतका वेळ आपल्या ज्येष्ठत्वाच्या माजात उभा ठाकलेला झाडाचा जाडजूड बुंधा कागदाचा तुकडा फाटावा तसा अलगद दुभंगून गेला होता. फाटलेल्या बुंध्यामध्ये ओमने वाकून बघितलं. त्याच्या भोवतीच्या पिवळ्या अंधुक प्रकाशात बुंध्यातून खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. एखाद्या दगडात थोडंसं खोदून तात्पुरतं उतरण्याजोगी त्याची घडण होती. त्याने सावकाश पहिल्या पायरीवर पाय ठेवला. आजुबाजूच वातावरण स्तब्ध होत. काहीही धोका नसल्याची खात्री करून तो अजुन एक पायरी उतरला... त्यासरशी पुन्हा जोरदार आवाज होऊन झाडाचा बुंधा पूर्ववत झाला. ओमचा मागे जायचा मार्ग बंद झाला. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा अंधार पसरला. इतका वेळ त्या काळोखावर मात करत त्याच संरक्षण करणार प्रकाशमान कवच त्या झाडाच्या खोडात प्रवेश करताच कापरासारखं विरून गेलं होत.
त्याने गळ्यातील खड्याकडे पाहिलं. इतक्या मिट्ट अंधारात तो खडा मात्र अस्सल हिऱ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त चमकत होता. परतीचा मार्गच बंद झाल्याने त्याला पुढे जाणं भाग होत. उरलासुरला धीर आणि श्वास एकवटत केवळ अंदाजाने तो सर्व पायऱ्या उतरला. पायऱ्यापेक्षा खाली उतरल्यावर काळोखाच अस्तित्व जरा जास्तच जाणवत होतं. काळोखाच्या अथांग डोहात तो नखशिखांत बुडून गेला होता. आता पुढे काय.... नक्की कुठे जाव ह्या विचारात पुढे मागे फिरत त्याने जागेचा अंदाज घेतला. बऱ्याच आतल्या भागातून त्याला एक प्रकाशाची हलकीशी तिरीप जाणवली. अंधाराला सरसावलेल्या त्याच्या डोळ्यांनी तो अंधुक प्रकाश पटकन टिपला. कदाचित हाच इशारा असावा समजून तो त्या दिशेने चालू लागला. इथे येऊन किती वेळ झाला होता काय माहित. त्याच्या मनगटावरील स्मार्टवॉचने कधीच मान टाकली होती. इथला काळवेळ जणू अंधारात गोठून गेला होता. विनाअडथळा बरच अंतर चालून गेल्यावर त्याला जाणवलं की त्याच्या गळ्यातील खडा अजुन तेजाने तळपतोय. आजवर त्याला लॉकेटचा असा काहीच अनुभव नव्हता. एक साधारण लॉकेट म्हणून बरीच वर्षे त्याने गळ्यात परिधान केलं होत. परंतु आज तेच लॉकेट त्याला कधीही न पाहिलेले चमत्कार दाखवत होत.