Parag Raje

Others

3.9  

Parag Raje

Others

तेवढ्यास एवढे तर एवढ्यास किती?

तेवढ्यास एवढे तर एवढ्यास किती?

6 mins
108


अशीच आणखीन एक निद्रेचा नाश करणारी कथा , पॅन्डेमोनियम आजोबा उर्फ धुमश्‍चक्री उर्फ थैमान उर्फ  वैतागवाडी समूह सादर करत आहे


कोणे एके काळी कोणा एका गावी , शकुंतला नावाची एक अतिशय गरीब परंतु अत्यंत गुणी आणि दयाळू व उदार अंतःकरणाची मुलगी आपल्या आजारी आई बरोबर राहत होती. ति कष्टाळू सत्यवादी व निस्वार्थ होती.

एके वर्षी त्यांच्या गावी घोर दुष्काळ पडला. बघता बघता दुष्काळाचे रूपांतर उग्र उपासमारीत झाले. बिचाऱ्या शकुंतला ला मैलोन्मैल चालत जाऊन खोल विहिरीतून जेमतेम एखादी घागर पाणी कशीबशी मिळत असे. 

अन्न देखील दुर्मिळ होते आणि प्रत्येक अन्नाचा कण हा सुवर्णा हून महाग झाला होता.


एके दिवशी खूप दूरवर चालून देखील विहिरीतून थोडेसेच मिळाले ले पाणी घेऊन ती घरी परत येत असताना तिच्याबरोबर वाटेतील एक हडकुळा लंगडत असलेला तहानलेला कुत्रा पाण्याच्या आशेने येऊ लागला.


शकुंतला ला त्या कुत्र्यावर दया आली आणि स्वतः खूप तहानलेली असून देखील तिच्या वाटणीचे पाणी त्याला पाजले.

कुत्रा आणखी काहीतरी मिळेल ह्या आशेने तिच्या झोपडीपर्यंत आला.


शकुंतला नि आपल्या आईला खाऊ घातले ., तिची सेवा केली आणि स्वतः शेवटचा उरलेला एकच घास घेणार , इतक्यात तिची दृष्ट त्या झोपडीच्या दारात मरणासन्न अवस्थेत पडलेल्या कुत्र्यावर पडली. पुन्हा तिला त्याच्यावर असीम करुणा येऊन स्वतः उपाशी असून देखील आपला एकमेव शेवटचा घास त्या कुत्र्यास भरवला.


कणखर काळ टिकत नाही पण कणखर व्यक्ती टिकतात. त्या भीषण दुष्काळात शकुंतला आणि तिची आई मात्र कशाबशा टिकल्या.


दुष्काळ गेला आणि जसजसा काळ सरकत गेला तसे शकुंतला ने यौवनात पदार्पण केले. 

नंतर असे घडले की त्या गावी त्या देशाचा राजा आला आणि शकुंतला चे रूप आणि गुण बघून मोहीत होऊन त्याने तिला लग्नाची मागणी घातली. लवकरच लग्न करून ते दोघे राज महाली राहायला गेले.


तिचे पूर्वीचे कष्ट दुःख दारिद्र्याचे आयुष्य सरून ती राज वैभवात आनंदाने नांदू लागली. तिच्या सेवेसाठी दास दास्या राबू लागले.


परंतु शकुंतला राणी धार्मिक आणि सात्विक प्रवृत्तीची असल्यामुळे तिने हा सर्व सुखाचा बदल निव्वळ नियती समजून हुरळून गेली नाही. ती उर्मट अथवा भोगविलासी ही झाली नाही.

उलट हे सर्व भाग्य आपल्या सु कर्माचे फळ समजून ती सर्व राज्यकारभार नम्र व योग्यपणे पार पाडू लागली.


राणी असल्यामुळे राज्य कोशातील अपार धन तिच्या हुकुमाने वापरले जात असे.

आपल्या हाती नियतीने अधिक सत्कर्म करण्याची नामी संधी दिलेली समजून राणीने सत्ता व वैभव यांचा सदुपयोग करण्याच्या हेतूने व गोरगरिबांची भूक मिटवण्यासाठी राणी शकुन्तला ने एक विशाल अन्नदान छत्र राज दरबारी सुरू केला.


(ह्याला गुरु का लंगर किंवा भंडारा असेही म्हणतात)


फुकटच्या या मेजवानीची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि लोक झूंबडीच्या झुंबडीने राजदरबारी प्रसाद घ्यायला येऊ लागले.


भंडाऱ्याला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेवून झाल्या नंतर राणी एकच प्रश्न विचारायची...


तेवढ्यास एवढे 

तर एवढ्यास किती?


पण कोणालाही त्या प्रश्नाचा अर्थच कळेना ; उत्तर देणे तर दूरच राहिले! 


असेच दिवस जात होते की अचानक एका गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेवून निघालेला एक परप्रांतीय वाटणारा अतिशय साधा दिसणारा म्हाताऱ्या गोसाव्याला राणीने तोच प्रश्न विचारला असताना तो शांतपणे खंबीरपणे म्हणाला-


तेवढ्यास एवढे

पण 

एवढ्यास एवढेच ! 


त्याने दिलेले हे उत्तर ऐकून राणी चकित झाली! साधा दिसणारा गोसावी उत्तर देणारा पहिला व्यक्ति तर होताच पण त्या अधिक त्याने ते उत्तर अतिशय नम्रपणे सहजगत्या ,विद्वत्तेचे काहीही अवडंबर न करता पण पूर्ण गांभीर्याने खात्रीपूर्वक दिले होते ! 


शिवाय उत्तर ऐकून राणी अधिकच बुचकळ्यात पडली होती. तिला अपेक्षित असलेले उत्तर ते नव्हते.


राणीने लगेच गोसावी ना बाजूला घेऊन नम्रपणे विचारले....

तुम्ही जे बाह्यात दिसता तसे साधे गोसावी नक्कीच नाहीत ! कृपा करून तुमच्या उत्तराचा अर्थ मला उलगडून सांगा आणि आपण कोण, कुठले ,आपले खरे स्वरूप काय , हेही मला सांगा.


ह्यावर तो म्हातारा गोसावी शांतपणे म्हणाला-

ठीक आहे हे उदार अंतःकरणाची परोपकारी करूणामय व कर्तव्यदक्ष राणी, माझे शब्द नीट लक्ष देऊन ऐक ,


तुझ्या वाटणीचे कठोर परिश्रमातून मिळवलेले पाणी त्या तहानलेल्या मरणासन्न कुत्र्याला तू पाजले, निश्चितच त्या सत्कर्माचे फळ म्हणून आज तू हा राजवैभव भोगत आहेस.


तुझे परोपकारी कृत्य तू स्वतः अनेक दिवसांची उपासमारी व तीव्र टंचाई सहन करत असताना देखील घडले! 


तुझ्या एकमेव आणि शेवटचा घास कुत्र्याला भरवताना कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता तो स्वतःचा जीव धोक्यात टाकलास. कारण पुढचा घास केव्हा मिळेल याची काहीच खात्री नव्हती.


रणांगणावर सैनिक इतरांच्या जीवासाठी स्वतःच्या जीवनाची आहुती व बलिदान देतो तसा हा प्रकार.


म्हणून तुझ्या या दान कर्मातील त्यागाचा अंश अथवा प्रमाण हा प्रचंड किंवा संपूर्ण होता. तो निव्वळ करूणेतून उत्पन्न झाला.


शिवाय ते कृत्य उत्स्फूर्त व सहज प्रवृत्तीचे तर होतेच पण त्याला कुठलाही गढूळ किंवा कलुषित करणारा विचार किंवा उद्देश शिवला अथवा त्यात शिरला नव्हता.


आणि म्हणून या सर्व गोष्टींचा अनायास योग घडून आल्यामुळे त्याचे फळ तुला अनेक पटीने वाढून मिळाले.


पण जरा आणखी खोलात लक्ष दे . जर तो तहानलेला भुकेलेला कुत्रा तुझ्यापर्यंत पोचलाच नसता तर? तुझ्या उदार अंतःकरणाची आणि निस्वार्थ त्यागाच्या तत्परतेची प्रचिती कशी बरे घडली असती? एखाद्या देणाऱ्याला योग्य आणि लायक याचक भेटणे फार महत्त्वाचे आहे. या दोघांचा योग जुळून येऊन निस्वार्थ त्यागाची घटना घडायला देखील दैवि अनुग्रह लागतो.


तुझे वर्तमान भूतदयेतून घडत असलेले निश्चयपूर्वक अन्न दानाचे कर्म निश्चितच महान आहे आणि म्हणून ते अर्थातच कौतुकास्पद आहे.


अनेक इतरांच्या विपरीत तू खचितच तुझ्याकडे नियतीने दिलेल्या सत्ता, सहकार्य , संधी आणि पाठबळ, या सगळ्याचा योग्य तो सत्कारणी , विनयशील वापर करत आहेस.


पण तुझ्या वर्तमान कर्मात, दान हे टंचाईग्रस्त त्यागातून नव्हे तर उतू जाणार्‍या वैभवातून होत आहे .. अर्थात त्याच्यात त्यागाचे अंश प्रमाण त्या तुलनेने कमीच आहे.


म्हणून तुझ्या या कर्माची फळे देखील त्यातील निस्वार्थ त्याग व त्यातील परोपकाराच्या भावनेच्या अंश प्रमाणाच्या अप्रूपच मिळतील.


तुला त्याचे योग्य तितके फळ नक्कीच मिळेल ... ना कमी ना जास्त! 


आणि म्हणूनच मी म्हणालो,


तेवढ्यास एवढे 

पण 

एवढ्यास एवढेच! 


मग डोळ्यात एक चमक येऊन मिश्किल स्मित करीत गोसावी म्हणाला- आता मी कोण आहे हे सांगण्यापेक्षा एवढंच म्हणीन की एक काळा कुत्रा हिमालयात माझ्या गुहेत येऊन तुझा उदार अंतकरणाचे आणि झोपडीतील भरपूर व चविष्ट भोजनाची स्तुती सांगू लागला.


त्याचे कुजबुजणे ऐकून मलाही तुझ्या झोपडीतील भोजन चाखायचे कुतूहल जागृत झाले आणि म्हणून मी इथवर आलो! 

पण माझ्या हिमालयातील गुहेपासून येथे पोचायला खूप वेळ लागला ! आता मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पोचलो हा निव्वळ योगायोग समजावा. तुझी झोपडी मात्र खरच खूप प्रशस्त आणि सुंदर आहे! 


त्यांच्या शब्दातील सूक्ष्म बोध राणीने त्वरित आत्मसात केला.


त्यांना नमन करून शकुंतला राणी म्हणाल्या- मला समजले आहे की तुम्ही कोणी साधारण व्यक्ती नसून गोसाव्याचा वेश घेतलेले कोणी आत्मसाक्षात्कारी गुरू आहात. आपणास माझ्या पूर्व आयुष्यातील घटनांची पूर्ण माहिती आहे.निस्वार्थ त्यागाची व्याख्या व समजुत तीला दिल्याबद्दल राणीने त्यांचे कृतज्ञतेने आभार मानले.


अर्थात तिला समजले की ही असाधारण व्यक्ती हिमालया वरून काही तिच्या राजमहालातील भंडाऱ्याचे पंचपक्वान्ना ची हाव म्हणून जेवायला आली नव्हती. तर तिच्या मनातील प्रश्न व विकल्प दूर करून निष्काम कर्मयोगातील निस्वार्थ त्यागाची व्याख्या, तिचा समज आणि तिचे महत्व, हे सूक्ष्म ज्ञान द्यायला आली होती.


राणी शकुंतला ने त्यांचा आपल्या प्रश्नाचे अचूक व समाधान कारी उत्तर दिल्याने जाहीर गौरव आणि सत्कार केला.


अखेरीस शकुंतला राणीने त्यांचे योग्य आदरातिथ्य करून जड अंतकरणाने निरोप घेतला . ती आपले राज्य कर्तव्याचे उत्साह आणि आनंदाने, लक्ष पूर्ण दक्षतेने आणि निस्वार्थ ज्ञानाच्या प्रकाशात, पालन करू लागली.


गोष्टीचा शुभ संदेश- परोपकाराची इच्छा आणि ती घटित करण्याची संधी , दोन्ही देवाच्या कृपेने घडते. त्या घटनेतील कर्तेपणा आपण स्वतःकडे घेऊ नये.


...... श्री पराग राजे यांनी त्यांच्या बाल आठवणीतून रचलेली ही गोष्ट.


लेखकाचे आणखीन अखेरचे शंभर शब्द- 


मूळ गोष्ट डॉक्टर प्राध्यापक सिताराम गणेश देसाई यांच्या 

" सुबोध कथा " या गोष्टीच्या पुस्तकात लहानपणी वाचलेली मला धुसर अशी आठवत आहे.

त्यांचा आशय बाळ मनावर सुसंस्कार घडावे आणि निस्वार्थ परोपकाराची भावना रुजावी हा असेल. हा त्यांचा उदात्त उद्देश या गोष्टी द्वारे सफल व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना.


अनेक शाळांमध्ये कविता आणि धडे यांचे पाठांतर करण्यावर इतका भार असतो की विषयाची गोडी मरून जाते.


मी कळकळीची विनंती करतो की माझ्या गोष्टी या कुठल्याही पाठ्यपुस्तकात शिक्षणासाठी वापरू नयेत, तर फक्त एक वेड्या कटकट्या म्हातार्‍याची करमणूक म्हणून आणि गंमत समजुन वाचून, विसरून जाव्यात.


सर्वांचे शुभ कल्याण होवो


Rate this content
Log in