कौटुंबिक ऐतिहासिक ग्रंथातील निवडक फुलं - भाग 3
कौटुंबिक ऐतिहासिक ग्रंथातील निवडक फुलं - भाग 3


भाग 3/3
प्रारंभ
-----
माझ्या आजीच्या भरपूर मैत्रिणी. त्यांच्या संभाषणातून टोमणे, म्हणी व टोपण नावे, आम्ही शिकलो.
"एक ना धड भाराभर चिंध्या!"
"घर भर रंभा
पण पाण्याचा नाही थेंबा!"
या सुनेांना उद्देशून म्हणीतून मारलेले टोमणे! अशा सर्वज्ञानी मैत्रिणींपैकी एक म्हणजे दूधवाल्या बाई! त्यांचे नाव माहित नाही पण आम्ही त्यांना दुधवाल्या बाई म्हणूनच ओळखायचो. आणि आमच्या भोळ्या मनाला त्यात काहीही गैर वा अश्लील वाटायचे नाही. खरे तर त्या जवळच्या दुध केंद्रावर काम करायच्या. दुपार आणि संध्याकाळच्या दोन दुध केंद्रांच्या वेळांमधला संधीकाळ त्या आमच्या घरी घालवायच्या. अशा अनेक आजीच्या इतर मैत्रिणी वेळ घालवायला आमच्याकडे यायच्या. आणि स्वैपाकघरातील एक खास खुर्ची असल्या या ट्रान्झिट पाहुण्यांसाठी आरक्षित होती.
तर विषय होता या दूधवाल्या बाईंचा. या दुधवाल्या बाईंची एक बाब हमखास होती. त्यांच्या गोष्टीतील पात्र कुटिल कारस्थाने करुन एकमेकांचे साफ वाट्टोळे लावायचे!
गोष्टी सांगताना त्यांचे हातवारे, आविर्भाव आणि नाक डोळे-मुरडणे हे कुठल्याही कलावंताला / नटीला लाजवेल असे असायचे.
त्यांचे एक वाक्य माझ्या स्मरणात आहे, "त्या बाईनी मात्र त्या पोरीचे, साआआफ वाट्टोळे केले! अगदी पार अष्टकोनी वाट्टोळे!"
असे साफ शशब्दाला ताण देऊन दुधवाल्या बाई लाडू वळतात तसे हाताचे तळवे एकमेकावर सायकलसारखे घड्याळाच्या दिशेने फिरवत, वाट्टोळे शब्दाला खास हस्तमुद्रेने सन्मानित करायच्या!
थोडी फार ज्याॅमेट्री म्हणजे भूमिती किंवा त्रिकोणमित्री माहित असल्यामुळे कोणतेही कोन नसलेले वाटोळे अष्टकोनी कसे असेल या बुचकळ्यात मी सारखा पडायचो.
आजीच्या मैत्रीणींपैकी एक तिच्या सुनेला संबोधून स्तुतिसुमने उधळण्यात तरबेज होती! सर्व टोमणे आणि म्हणी एका काव्यात्मक लयीत असायचे.
अहो! शहाणी कुठची? डोंबलं माझे!
घरकामात अक्कल नाही काडीची,
पण ऐट मोठ्ठ्या डिग्रीची!
.....
कमवायची अक्कल नाही दमडीची,
माहेरी फिटली नाही हौस साध्या साडी-चोळीची
पण सासरी ऐट मात्र मिरवायची
अन् मोठ्ठया गाडीतून फिरायची!
पण आपलाच लेक फितूर झालाय,
तर परक्याच्या पोरीला बोलणार काय?
एरवी पण हमखास तिच्या सुनेच्या गाऱ्हाण्यांचे गुऱ्हाळ चालायचे.
"त्या मेलीन् कधी जेवण नाही वाढलन्
पण सारखं माझं काम मात्र वाढवलन्!"
चहा आणि भरपूर नाश्ता करून ती तिच्या सुनेचा महिमा सांगायची. काहीपण खायला दिले की तिचे एकच पालुपद...
"नाही हो आता पूर्वीसारखी माझी तब्येत उरली. त्या मेलीने करणी केलीन् अन माझी सोन्यासारखी प्रकृती साफ ढास्सळून गेली!"
मला त्या कधी नाही पाहिलेल्या अदृश्य सुनेचे रूप उगाच जादूटोणा करणाऱ्या चेटकिणीसारखे वाटायचे. बिना टीव्हीच्या युगातील या मैत्रिणी म्हणजे आमचे खास करमणुकीचे साधन असायच्या.
तर काळाआधी जन्मलेल्या अशा या थोर द्रष्ट्या जरा उशिरा जन्मल्या असत्या तर टीव्हीवर एका पेक्षा एक एकटीचाच का पूर बोलबाला फिल्म्सला मागे पाडतील अशा खतरनाक भयानक सिरियल्सच्या जबरदस्त स्क्रिप्ट राइटर्स झाल्या असत्या! पण आमच्या बालपणी त्या पुढील येणाऱ्या टीव्ही सीरियल्सच्या जणू अग्रदूतच होत्या!
आजीच्या या सर्व मैत्रिणींकडून आम्ही अप्रूप चपखल टोपण नावें ठेवण्याचे शास्त्र व कला शिकलो.
नुसत्या अर्थहीन घाणेरड्या अकल्पक अश्लील अर्वाच्च शिव्या देण्याचा तो काळ नव्हता. आई आणि आजीचे स्वैपाकघर हे महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणीदेखील मराठी घरांमधील वळण लावणारे आणि सुसंस्कृतपणाचे धडे गिरवणारे माहेरघर तसेच विद्या मंदिर होते.
पाटावरचा नाग पंचमीतला नागोबा असो की जिवतीला घातलेल्या कापसाच्या माळा असो. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरा आणि साठा उत्तराच्या शनि देवाच्या गोष्टी सगळ्याच एका रमणीय विश्वात न्यायच्या. खरोखर आजच्या नेटफ्लिक्सच्या कृत्रिम दुनियेला या जीवंत पात्रांची सर नाही.
तेव्हा आयुष्याचा वसा घेतला तर उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये, असं करित ही साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण!