कौटुंबिक ऐतिहासिक ग्रंथातील निवडक फुलं - भाग 2
कौटुंबिक ऐतिहासिक ग्रंथातील निवडक फुलं - भाग 2


भाग 2/3
प्रारंभ
-----
आमच्या नात्यात एक इरसाळ चिवट्ट म्हातारा होता. त्यांची नात होती 6/7 वर्षांची. एकदा नातीने विचारले, आजोबा सगळे मरतात का हो? आजोबा बोलले हो!
मग तुम्ही केव्हा मरणार? नातीने पुढचा प्रश्न केला.
आजोबा तिला टोलवायला म्हणाले, तुझे लग्न झाल्यावर मी सुखाने डोळे मिटेन.
लागलीच नात आतल्या खोलीत गेली आणि तिच्या आईचे मंगळसूत्र घालूंन आली. आणि म्हणाली, आजोबा, झाले माझे लग्न! आता तुम्ही सुखाने मरा!
दुसरी एक माझ्या वडिलांची मावस बहिण होती. अभ्यासाचा तिने इतका बाऊ करुन ठेवला होता तिच्या घरी, की एकदा तिची दुसरी पास असलेली आई अगदी केविलवाण्या स्वरात सांगू लागली, डिग्रीचा अभ्यास फार वाईट.! अहो पूर्ण मणक्यात पू होतो पू ! पण अभ्यास संपत नाही! नको बाई असली घोर तपश्चर्या!
असे आमचे कधीच कौतुक झाले नाही याचाच खेद!
शेखर कपूर दिग्दर्शित "मासूम" हा खूप गाजलेला चित्रपट... त्यात दोन पुरुष नटांनी स्त्री नटीला उद्देशून एक गाणे म्हटले आहे
हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिये...
खुले आम आंचल ना लहरा के चलिये...
या गाण्याचा अर्थ... बाईसाहेब असा पदर उडवित सर्वत्र फिरू नका...
पण माझ्या मंदबुद्धी व हिंदीतील मर्यादित शब्दांच्या अल्प ज्ञानामुळे मला वाटायचे की गाणारा सांगतोय, बाई आपले उघडे अंबे अशा मिरवत पदर उडवित फिरू नका!
आम या शब्दावर कोटी. दुसरे काये! पण वाह्यात, माफ करा, खट्याळ डोक्यालाच हे असे सुचते! कदाचित कवीलादेखिल ती कोटी जाणून बुजून अभिप्रेत नसावी.
आमच्या आत्येभावाला, लेंगे स्वराज्य लेंगे याचा अर्थ चक्क सदरा-लेंगा घालून आम्ही स्वराज्यासाठी लढू असे वाटायचे.
नको तिथे नको त्या शब्दांचे नको ते अर्थ कढायचा आमचा वातरटपणा वाह्यात नसून खट्याळपणा म्हटले की लगेच सोज्वळ वाटू लागतो. पण काही विनोद खरोखर आमच्या भोळसट अज्ञानामुळे व्हायचे.
आम्ही भावंडे इंग्रजी माध्यमातून शिकलो असल्यामुळे मराठी श्लोक वगैरे फारसे माहित नव्हते. मातृभाषाच कच्ची मग हिंदीचे तर धिंडवडेच निघायचे!
असो! एकदा माझ्या माहितीतल्या एका नव्या सुनबाईला मराठी संस्कृतीचे थोडे तरी भान असावे अशा उदात्त हेतूने, वदनी कवळ घेता नाव घ्या श्रीहरिचे! हा यज्ञकर्माचा श्लोक सासरेबुवांनी शिकवायचा श्रीगणेशा करण्यासाठी घेतला आणि सुनबाईना त्यांच्या नंतर पुन्हा बोलायला सांगितले. एवढे कठीण आणि अपरीचित शब्द ऐकून ती पार गोंधळून गेलेली सून चक्क लाजत म्हणाली,
बदन जवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे! इश्श! हे कसले भलतेच श्लोक!
बिचाऱ्या सात्विक सोज्वळ सासरेबुवांनी सूनबाईंच्या अज्ञानाला बघून फक्त... समोर गायली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता! असे पुटपुटत त्यांचा संस्कृती शिकवण्याचा उपक्रम त्वरित बंद केला!
एका नाटकातील एका कुजकट पात्राचे अतिशयोक्तीचे वाक्य आठवले, आहो ते घराणेच तसले!
अशा आयुष्यातील गमती जमती। आणखीन सांगितल्या असत्या पण चहा व स्नॅक्स आले आहेत. हा म्हातारचळ सुटलेला चक्रम थेरडा आणखी काय चऱ्हाट सांगत बसेल नेम नाही असा विचार घरच्यांनी केला. म्हणून माझे थोबाड गप्प राहावे यासाठी वेळोवेळी चविष्ट खाद्यपदार्थ मला खरोखरच मोठ्या प्रेमाने चरण्यासाठी देत आहेत. तेव्हा ब्रेक घेउन भाग २ हा इथेच पूर्ण करु...