कौटुंबिक ऐतिहासिक ग्रंथातील निवडक फुलं - भाग 1
कौटुंबिक ऐतिहासिक ग्रंथातील निवडक फुलं - भाग 1
माझ्या (Family chronicles) / खानदानी बखर / कौटुंबिक ऐतिहासिक ग्रंथातील...
एक मराठी विथ थोडेसे थोडेसे लिटिल लिटिल इंग्लिश
और
तुरळक थोडी थोडी हिंदी, अने टूट्यो फूट्यो गुजराथी अशी चौभाषिक भेट...
लॉकडाऊनमध्ये लॉकअप झालेले श्री घोळून घोळून लांबणलावे उर्फ गलितगात्र आजोबांच्या रिकामटेकड्या स्मृती (इराणी नव्हे, भारतीय) संग्रहातून...
निवडक फुलं...
अर्थात
वेली आणि वल्ली!
किंवा
कोलांटी
वेलांटी
आणि
गुलांटी!
--- * ---
आदरणीय स्वर्गीय पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीवर आधारित माझ्या आयुष्यातील काही अविस्मरणीय व्यक्ती...
---*---
भाग 1/3
प्रारंभ
आम्ही चार भावंडे तेव्हा दादरमध्ये भाड्याच्या जुन्या घरात राहात होतो. तळमजल्यावर आम्ही, तर पहिल्या मजल्यावर दिवंगत घरमालकाच्या वयस्कर विधवा आजीबाई "बा" व इतर भाडोत्रीदेखील राहात होते. त्यांच्याकडे मे महिन्यात शाळेच्या सुट्टीत त्यांच्या नाती कल्पू आणि मयूरी यायच्या.
घरमालक गुजराती होते आणि म्हणून ही आमच्या समवयीन अशी त्यांची नात कल्पू गुजराती ढंगात मराठी बोलायची. म्हणजे जिथे… "च" चा उच्चार "चालेल" असा पाहिजे तिथे चहातला "च" वापरायची. इतर शब्दांना चू छू शु सू याची जोड असायचीच.
दिवाळीच्या सुट्टीत कल्पू आली की आम्हाला गप्पांची पर्वणी असायची. तेंव्हा ब्लॅक अँड व्हाईट उर्फ कृष्णधवल टीव्हीवर मराठी व गुजराती सिनेमे सीरियल स्वरुपात चालायचे. एका सिनेमाचे नाव त्याच्या दिग्दर्शक/लेखक श्री कांती मडिया यांच्यासारखे अविस्मरणीय होते... "झेर तो पीधा जाणी जाणी." त्याची चाल गुजराती लोक ठराविक थरथरता हेल काढून "हे" गाणाऱ्या संगीतासारखी होती. आत्ता कुठल्यापण सुज्ञ सिने दर्शकाला सिनेमांचे शिर्षक "झेर तो पीधा जाणी जाणी!" यावरुनच पूर्ण गोष्टीची कल्पना आली असणारच!
म्हणजे एका हीरोवर दोन स्त्रिया प्रेम करत असणार. अन् त्यातील एक त्यागमूर्ती बनून स्वतःहून विष पिऊन इतर दोघांच्या मिलनासाठी मार्ग मोकळा करणार. हे मी गुजराती किंवा ज्योतिष न येतासुद्धा भाकीत करु शकलो असतो. पण कल्पूचे त्या टीव्ही सीरियलमधले जीव की प्राण ओतून तन्मयतेने बघणे वाखाणण्याजोगे होते!
उंच स्टूलावर बसुन दोन्ही पाय पोटाशी घेउन पूर्ण पुढे झुकुन ती सिनेमातल्या पात्रांशी एकरूप व्हायची! त्यांना क्षणी सल्ले द्यायची! ओरडायची रडायची कॉमेंट्स पास करायची. तिच्या परफॉरमेंसने आम्हाला टीव्हीचा पूर्ण पैन्पैसा वसूल झाला होता!
"ते तो ते अता मुद्दाम जानुन भुजुन ते हिरोच्या मनामंदी तिच्याविषयी नफरत पैदा करनार!" इति कल्पू...
हिरोला उद्देशून तिचा परोपकारी सल्ला सतत चालू असायचा. "अरे गांडा" (म्हणजे वेड्या) ते तो विल्लनबरोबर खोटे खोटेच प्रेमाचे नाटक करतेय! कारण म्हंजे तू ते दुसरीसंगे प्रेम करशीलने एने माटे! कारण ती दुसरीने टिच्यावर लाईइइइच उपकार केले अस्ते! ते तो ती ते विष आता एक्सचेंज करते आणि अख्खी बाटली एक घुंटमधे पियुन टाकते! ते तो तुला नाय समजते तिची कुरबानी!"
असा ओठ दात नखे खाऊन कल्पू सिनेमाची गोष्ट रंगवून आम्हाला टीव्ही बघत बघत सांगायची.
यासगळ्या मायाजालात आम्ही कसे काय पास व्हायचो देवा
लाच ठाउक. कदाचित माझी आई माझ्या बुढ्ढिम्मा (हो त्या टिचरचे तेच टोपण नाव होते. खरे नाव मिस लोपेझ.) तर बुढ्ढिम्मा टिचरला सफरचंद गुपचूप भेट द्यायची हे एक कारण असू शकेल. असो! तर पुन्हा वळू कल्पू पुराणाकडे.
या कल्पूचे तिच्या सर्व मित्र-मैत्रिणींबद्दल मत मुळीच चांगले नव्हते आणि अमुक मैत्रिण कशी बऊ एकदम ढालगच्च आहे ते सांगयची. अर्थातच कल्पू तर बिच्चारी साधी भोळी!
पण आम्हाला त्या मैत्रिणिंचा फार हेवा वाटायचा. कारण त्यांच्या थोड्या फार कागाळ्या सांगितल्यावर त्या सगळ्यांबद्दल कल्पूचे एक ठोकताळ वाक्य असायचे.. ऐ तो चौथी माथी उठी गयो... ऐ तो छठी माथी उठी गयो. म्हणजे त्यांनी शाळा सोडली. या दुःखास्पद गोष्टीचा आम्हाला लहानपणी खूप हेवा वाटायचा! यांना कायमची मे महिन्याची सुट्टी. त्यांची किती मज्जा. अन् आम्हाला मात्र सजा! कारण आमच्या गळ्यात मात्र अभ्यसाचे लोढणे!
अन् असा लोढणं शब्द म्हटला की कल्पू गुजराती प्राचीन प्रख्यात प्रियकर खेमरो लोढण यांच्या प्रेम कहाणीत बुडून जायची. असो. हा सर्व उपक्रम चालू असताना तिची आजी बा सांगायच्या, "कल्पूला तर टीव्हीवर पण अभ्यास सिखावे छे. ते कसले झेर पिध्या जानि ने जाणीचा त्यानला लई अभ्यासा मंदी सिखवा माटे बोलाव्यो छे."
अशी ही आजीला सिनेमा बघणे म्हणजे कित्ती कठिण जबरदस्ती ने अभ्यासा साठी टिव्ही बघणे अशी शेंडी लावणारी कल्पू! आजच्या ऑनलाइन शिक्षणाची ही एक प्रकारे आग्रदूतच होती.
कल्पू सर्व स्टेशनांवर थांबते अशी एखाद्या धीमे स्लो ट्रेनच्या गतीने वयाच्या 17/18 वर्षाला कशीबशी एकदाची एसएससी पास झाली आणि आमच्याकडे अति उल्हासाने पेढे घेउन आली!
हर्षोल्हासित होऊन ती आम्हाला सांगू लागली, "ते तो तुम्हाला खरे वाटलेच नसते. मने भि पेल्ला विश्वास पड्यो नथी. पण मी तो पास झाले ने समद्यांना फसवून! ए तो बद्दा संतोषी मातानो चमत्कार छे!"
साहजिकच माझ्या आईने अशा वेळी अशा एसएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नेहमीचा प्रश्न विचारतात तोच विचारला. "मग आत्ता पुढे काय करणार?" अर्थात तिला विज्ञान की वाणिज्य की कला, कुठले पुढील शिक्षणाचे क्षेत्र घेणार असे मतित होते. यावर कल्पूचे उत्तर एकदम लाजून, मान आणि डोके वेलावून, गालातल्या गालात हसत, होते, "तुम्ही तो आता बोलणारच्च!" (२ वेळा) (च चहातला)
माझी आई क्षणभर गोंधळली. आपल्या साध्या पुढील अभ्यासाच्या दृष्टीने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर व ही लाजवंतीलाही लाजवेल अशी प्रतिक्रिया किंवा रिस्पाॅन्स तिला अपेक्षित नव्हता.
"अगं पण आम्ही काय बोलणारच्च?" आईचे मराठी उच्चार पण क्षणभर कल्पूच्या सानिध्यात अपभ्रंषित झाले! त्यावर कल्पू आधिकच लाजून म्हणाली, "तुम्ही तर बोलणारच्च! की कल्पू आता लगेच म्हंजे ईमिजियेटली लगीन करुं टाकायचे म्हणून! पण मी बा ना सांगून ठेवले! अझून दोन महीना माटे माझा इतर बद्दा मित्र-मैत्रिण साथे मी नुस्ती मौजमस्ती करणार! नंतर तुम्ही काय तो लग्नाचा बार उडवून द्यायचा आहे तो द्या!"
आमची प्रतिक्रिया खरोखर बघण्यासारखी होती! काही महिन्यातच कल्पूचे लगीन होऊन ती सासरी गेल्यामुळे आमची गाठ भेट तुटली! पण बिलंदर कल्पू आमच्या खानदानात एक अजरामर रोल मॉडेल होऊन गेली..
अशी ही बहुरंगी कल्पू. तिचे खरे नाव कल्पना असावे बहुतेक. पण ती आम्हा भावंडांच्या स्मरणात कल्पू म्हणूनच अजरामर आहे.