कोणाचे कर खरोखर सुंदर ?
कोणाचे कर खरोखर सुंदर ?
सर्व वाचक व श्रोत्यांना नम्र अभिवादन करून
आकस्मिक आठवलेल्या , उत्स्फूर्त सुचलेल्या, सुसाट सुटलेल्या , कपोलकल्पित, काल्पनिक गोष्टी संग्रहातून
अशीच आणखीन एक डोके गरगरवणारी गोष्ट , पॅन्डेमोनियम आजोबा उर्फ धुमश्चक्री उर्फ थैमान उर्फ वैतागवाडी ऊर्फ गलितगात्र समूह सादर करीत आहे ....
डिग डिग डिग डिग डिग डिग ढिश्श!
गोष्टीचे शिर्षक :
" कोणाचे कर खरोखर सुंदर ? "
सर्वात सुंदर हात !
एका भारतीय लोक कथेवर आधारित गोष्ट ...
खूप पुर्वी पण नाहीं, आणि असेच एकदा ईथे तिथे जवळपास, एका नदी काठी तीन किशोर सुंदर ललना आपले चरण नदीच्या झूळ झूळ वाहणाऱ्या पाण्यात सोडून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्या होत्या.
नदीतील मासे त्यांच्या चरणांना स्पर्श करीत होते. त्याने किंचित चरणांना होणार्या गुदगुल्या फारच आल्हाददायक वाटत होत्या.
निसर्गाकडून होत असलेल्या ह्या फुकटच्या सेवेचा आनंद त्या तिन्ही ललना घेत होत्या.
अशा रम्य वातावरणात, स्वतःचे नाजुक कोमल मेहेंदीने नटलेले आणी सुवर्ण अलंकारांनी सजलेले हात बघून स्वतः वरच मोहीत होऊन त्यातील एक ललना म्हणाली, "बाई बाई बाई, माझे कर खरोखर कित्ती कित्ती सुंदर आहेत ! इश्श ! माझीच मला नज़र लागेल बाई!"
ते ऐकून लगेच दुसरी ललना बोलली, "अय्या! त्यात काय एवढे कौतुक?
असतील सुन्दर! पण माझ्या कोपर्या पासून नखां पर्यंत नटलेल्या सजलेल्या हातान्इतके सुन्दर तर नक्कीच नाहीं!"
ह्यावर तिसरी गप्प बसली असेल का?
तिसरी ललना आपले अल्प से इंग्रजी ज्ञान पाजाळत म्हणाली
" इन दॅट केस, म्हणजे तसेच असेल तर, कुठल्याही स्पर्धेत माझे बाजूबंदा पासून नखाच्या टोका पर्यंत रत्नजडित हिरे माणकांनी मढलेले हात सगळ्यात सुंदर केंव्हाही ठरतील !
झाले ! एवढ्या विषयावरून तिघीं मध्ये वाद सुरु झाला आणी तो अगदी विकोपाला जाणार इतक्यात त्या तिघींना नदी काठी एक गरीब म्हातारी काठी टेकत टेकत येताना दिसली.
त्यातली एक स्वतःला जरा अतिशहाणी समजणारी, आणी कुठलाही वाद जागीच मिटवण्यापेक्षा गाव भर पसरवण्यात हुशार असलेली ललना म्हणाली,
" उगाच आपण कशाला इतक्याशा गोष्टी वरुन वाद घालायचा? आपण ह्या म्हातारीलाच विचारू कोणाचे कर खरोखर सुंदर!"
आणि लगेच म्हातारीला तीने हाक मारली
" अगं ए थेरडे, इकडे ये लवकर. सांग बरे खरोखर कोणाचे हात सर्वात सुंदर ?"
पण म्हातारी धापा टाकत म्हणाली
सांगते बायानो सांगते! पण आधी जरा मला पाणी प्यायला द्या. घसा अगदी कोरडा पडून खुप तहान लगली आहे।
तिचे ते वाक्य ऐक्ल्यावर तिन्ही ललना अशा काही खवळून निघाल्या! बापरे! आणी एकत्रित बोलल्या,
"अत्ता ग बया.! थोबाड बघा ह्या थेरडीचे ! आम्हाला पाणी आणायला सांगते. तूझ्या घरच्या दास्या वाटलो काय ग आम्ही ?"
आली मोठ्ठी शहाणी! पाणी मागतेय.!
आता पाणी मागशील अन मग दुसरी कामे सांगशील! आम्ही काय रिकामटेकड्या वाटलो हिला? आमच्या रेशमी कपड्यांवरुन, दाग दागिन्यां वरुन तुला समजले नाही आम्ही श्रीमंत घरातल्या अहोत ते?
कधी आरशात आपले थोबाड पाहिले आहे का? अरेरे! हिला कुठला आरसा परवडतोय ? तो तर सोडा, पाण्यात तरी आपले प्रतिबिंब पाहिले आहे का कधी ?
आमचेच चुकले! हिला विचारुन उगाच महत्त्व दिले ते!
असल्या भिक्कारड्या थेरडीला खऱ्या सुंदरतेची काय जाण अथवा पारख असणार ?
असे बोलून तिघी आपापसात म्हातारीची कशी चांगली जिरवली अन लायकी दाखवून दिली अशा आनंदाने खिदळत, नाके मुरडत, पूर्वीचा वाद विसरुन, आजचा दिवस सार्थक झाला ह्या अविर्भावात निघणार, इतक्यात तिथे त्यांना गावातील धोबिण, नदी काठावरुन आपले धूणे आटोपून निघताना दिसली.
धोबिणीच्या डोक्यावर भले मोठे कपड्यांचे बोचके, खांद्यावर एक भरलेली घागर, कंबरेवर दुसरी भरलेली कळशी, असे सर्व ओझे सावरत चालली होती.
इतक्यात धोबिणीची नजर म्हातारीवर पडली। थकलेली म्हातारी शांत पणे उसासे देत नदीकाठी एक वडाच्या झाडाखाली बसलेली धोबिणीने पाहीली.
दमून, थकून बसलेल्या म्हातारीला पाहून ती लगेच तिच्या जवळ गेली.
तिला प्यायला कळशीतले पाणी दिले. म्हातारीची तहान भागल्यावर धोबिणीने तिचे हाथ पाय तोंड धुवायला घागरीतले नदीचे स्वच्छ थंडगार पाणी धारेनी ओतून दिले .
कंबरेला बांधलेल्या एका छोट्या शैलीतून धोबिणीने आपली न्याहारीची छोटीशी पोटली काढली.
जरी फक्त साधे लोणचे भाकरी होती, तरी धोबिणीने आपुलकीने, आग्रहाने म्हातारीला ते देऊ केली. म्हातारीने पण भूक लागल्यामुळे तो अल्पोपाहर पटापट खाल्ला !
म्हातारीने सर्व न्याहारी संपवून कृतज्ञ नजरेने धोबिणीकडे पाहिले। तिची नजर सहज धोबिणीच्या हातानकडे गेली।
धोबिणीचे हात जात्यावर दळणे दळून, खल बत्त्याने मसाले कुटून, धुणी भांडी करुन, अन अगणीत कष्टाची कामे करुन, राठ अन कणखर झाले होते. खोल भेगा आणी जखमा पडल्या होत्या. मातीच्या चुलीवर भाकर्या भाजून बोटांवर निखार्याचे असंख्य चटके बसले होते.
म्हातारीने प्रेमाने धोबिणीचे कष्टाने थकलेले हात स्वतःच्या हातानी अलगद धरले. अन कठोर परीश्रमाने झिज झिज झिजून गेलेल्या तिच्या उघड्या तळव्यांवर हळू फुंकर मारली. !
जवळच, त्या तिन्ही ललना हा सर्व प्रकार धोबिणीला नाके मुरडत बघतच होत्या.
"काय बाई शायनिंग मारतेय चोंबडी! असू दे! असेल तिचीच भिक्कार्डी मावशी!"
इतक्यात त्यांच्यातील एक ललना अचानक आश्चर्यचकित स्वरात उद्गारली, "अगो बाई! अरे देवा ! हे काय! बघा बघा बघा ! तिचे हात बघा !"
आणि खरोखर अघटितच घडत होते.
धोबिणीचे रिकामे भुंडे हात बांगड्या पाटल्या, शिंदे शाही तोडे, सर्व प्रकारच्या सुवर्ण अलंकारांनी भरुन गेले होते ! बोटां मध्ये हिरे मोती अन पाचूच्या अंगठ्या होत्या! अन सर्वात कहर म्हणजे, तिचे कठीण राकट हात एकदम मऊ कोमल हात झाले होते.
अचानक त्यांच्या विस्मयित विस्फारलेल्या नजरे समोर म्हातारीचे देवी स्वरूपात परिवर्तन झाले !
प्रेमाने देवी त्या धोबिणीला उद्देशून म्हणाली,
"तुझी कळशी आणि घागर नेहेमी नदीच्या निर्मळ पाण्याने ओथंबून वहात असेल. आणी तुझी न्याहारीची थैली तुला अवडेल त्या पदार्थाने सदैव भरलेला असेल! "
मग त्या किशोर ललनांना उद्देशून देवी वदली, "स्व-स्तुती किंवा दर्प, सदैव सौन्दर्याला मारक ठरतो !
जसे कृत्रिम अत्तराला खऱ्या फूलांसारखा मातीचा गंध लाभत नाही, तसेच दुसर्याचे शोषण करून टिकलेले बाह्यातील सौन्दर्य, हे, नैसर्गीक सौंदर्या पुढे केव्हाही फिक्के ठरते.
आता तुम्हाला धडा शिकवायला मी असा विषाणू पाठवते की जेणेकरून तुमचे सर्व नोकर, चाकर, दास्या, मोलकरणी, दुरावतील! मग बघतेच तुमचे हात किती नाजूक आणि कोमल रहातात ते! "
असे म्हणून नदीची देवी अंतर्धान झाली ।
गोष्टीचा शुभ संदेश /बोधः
जे हात दुसर्यांच्या मदती साठी आणि सत्कार्याला सदैव तत्पर असतात, तेच खरे सुंदर हात.
नुसते अलंकृत आणि नटलेले हात सुंदर नव्हेत .
लेखकाचे आणखीन अखेरचे फक्त शंभर सव्वाशे शब्द-
1) ही गोष्ट लेखकानी खालील लोकांना सस्नेह अर्पित केली आहे. .
अ) माझ्या जखमेची सुश्रुशा करणारे अविनाश व अभिषेक कुळकर्णी
आ) स्वैपाक, धूणीभांडी , केर, कचर्याचे साफ सफाई कामगार, तसेच ईतर सर्व श्रमिक ज्यांच्या कष्टाळू करां मुळे जिवन टिकून आहे.
2) लेखक अलिशा सांतीकरी, सिध्देश भाईंदरकर व चंद्रकांत संत त्यांच्या तकनिकी सहाय्यासाठी ॠणी आहे.