संस्कृतीला दिशा देऊ नका पण तिची दशा करू नका !
संस्कृतीला दिशा देऊ नका पण तिची दशा करू नका !


वट पौर्णिमेचा सण म्हणे काही पुरुषांनीही साजरा केला हीच बायको सात जन्मी मिळावी म्हणून! फक्त हे करताना ते साडी नेसले नाहीत हे नशीब! स्त्रियांनी पुरुषांची बरोबरी करणे एक वेळ समजू शकतो पण स्त्रियांची बरोबरी करण्यासाठी पुरुषांना माकड चाल करायची गरजच काय? आज स्त्रिया पुरुषांचे कपडे वापरू लागल्या आहेत म्हणून अभिनेते सोडता कोणी साडीत दिसले नाही पण भविष्यात स्त्रीयांना खुष करण्याच्या नादात काही मूर्ख पुरुष साडी नेसून रस्त्यावरून चालताना दिसले नाहीत हे नशीब! हे असे स्त्रियांचे सण, उत्सव पुरुष साजरे करून संस्कृतीत अशी कोणती मोलाची भर घालत आहेत त्यापेक्षा स्त्रीयांनी हे व्रत करायचे बंद केले तरी ते संस्कृतीच्या हिताचे ठरेल; कारण आम्ही तशीही संस्कृतीची वाट लावायचा विडाच उचललेला आहे, आम्हीच जर आमच्या सणाची अशी थट्टा चालवली तर बाकीचे आपल्या संस्कृतीचा आदर काय खाक करणार? मीडियाने तर अक्कल गहाण ठेवली आहे. येथे शेतकऱ्यांचा प्रश्न धगधगत असताना कशाला पुरुषांनी वडपौर्णिमा साजरी करण्यासारख्या फालतू गोष्टींना डोक्यावर घेताय? त्या मूठभर पुरुषांनी वडपौर्णिमा साजरी केली म्हणून फार काही प्रबोधन होणार नाही उलट ते थट्टेचाच विषय होणार आहेत? ज्यांनी आता वडपौर्णिमा साजरी केलेय त्यांनी गणपतीत ववसेही करा! स्त्री पुरुष समानता प्रत्यक्षात आली तरी स्त्री तिच्या संरक्षणाची अपेक्षा पुरुषाकडूनच करणार त्यामुळे पुरुषांनी पुरुषांसारखे वागणेच योग्य आहे आजही सुशिक्षित स्त्रीयांना त्यांच्यापेक्षा जास्त पगार घेणारा नवरा हवा असतो हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. स्त्रीयांनी पुरुषांची बरोबरी केली तर काहीच हरकत नाही पण पुरुषांनी स्त्रीयांची बरोबरी केली तर मात्र पुढची पिढी नक्कीच वाया जाणार! आपल्या संस्कृतीत असणारे सण फक्त इतक्यासाठी आहेत की स्त्री पुरुष नात्यातील गोडवा आणि प्रेम टिकून राहावेत फक्त स्त्रीया आपल्यासाठी काहीतरी करता आहेत म्हणून आपणही ते करण्याचा पुरुषांचा प्रयत्न म्हणजे मूर्खपणा आहे! हे हर वेळीच आवरले नाही तर संस्कृतीला दिशा तर मिळणार नाहीच पण संस्कृतीची झालेली दशा उघड्या डोळ्यांनी कोणालाही पहावणार नाही.