ओढ
ओढ
प्रत्येक स्त्रीच्या मनात माहेरची ओढ असतेच. मग ती स्त्री वीस वय वर्षाची असो किंवा सत्तर वय वर्षांची. तिला आपल्या माहेरी जाण्यासाठी कोणत्याही कारणांची अथवा आमंत्रणाची गरज नसते. जेव्हा जेव्हा तिला आपल्या आईबाबांनी आठवण येते तेव्हा तेव्हा ती आपल्या माहेरी जाण्यासाठी आतूर होते.
माहेरच्या अपार आठवणी तिला तिकडे जाण्यासाठी ओढ लावणाऱ्या असतात. तिच्या माहेरी येण्याची आतुरतेने वाट पाहत असणारी तिची आई तिला घरच्या अंगणात पाहून आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या मंद हास्याला लपवू शकत नाहीत. माहेरी तिच्या बालमित्र मैत्रिणीना जाऊन भेटण्याची ओढ नकळतच तिच्या मनात येते. माहेरच्या अंगणातील झाडाखाली बसून आपले बालपण आठवून आई-बाबा बरोबर मोलाचे क्षण व्यतीत करण्याची ओढ तिच्या मनात रुंजी घालत असते.
माहेरच्या अंगणातील बहार पाहून हळूच तिचे मन आपल्या संसारात डोकावते. आपल्या मुलांची आणि आपल्या नवऱ्याच्या आठवणीत मन ओढावले जाते. आपल्या भावाच्या लहान मुलांना पाहून तिला आपली मुले आठवतात आणि तिला आपल्या घराची ओढ लागते. खरंच आहे स्त्री मन हळवे असते. तिच्या मनावर अधिराज्य गाजवू शकणारे तिचे माहेर आणि सासर. दोघा घराची मान मर्यादा राखणारी स्त्री आपल्या आईबाबांनी दिलेल्या संस्कारांचा अनमोल ठेवा कायम जतन करून ठेवते.
